भारताचे परराष्ट्र धोरण आणि जयशंकर यांची आगामी केनिया भेट
          Date: 11-Jun-2021
  

India-kenya_1   
भारत कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना जगभरातील सुमारे ४० देशांनी काहींना काही मदत पाठविली. मदतीचा हात पुढे करण्यास इच्छुक असलेल्या देशांमध्ये केनियाचे नाव बघून मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या. केनियाने चहा, कॉफी आणि शेंगदाण्याच्या स्वरूपात १२ टन मदत पाठवल्यानंतर आश्चर्य, अविश्वास अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. केनियासारखा आफ्रिकन देश भारतासारख्या मोठ्या देशाला मदत पाठवू शकेल अशी अनेकांना अपेक्षा नव्हती. काहींनी या मदतीची चेष्टा केली तर अनेकांनी त्याला सुदाम्याचे पोहे वगैरेची उपमा दिली.
 
या केनियाच्या मदतीनंतर काही दिवसांतच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर १२ ते १४ जून कालावधीत केनियाला भेट देणार असल्याची बातमी आली आणि सहाजिकच केनिया पुन्हा एकदा चर्चेत आला. या भेटीचे महत्वाचे कारण म्हणजे केनियाचे पूर्व आफ्रिका आणि पश्चिम हिंद महासागराच्या जिओपॉलिटिक्स मध्ये असणारे महत्त्वाचे स्थान.
 
हिंद महासागर भारत आणि केनियाला वेगळे करत नाही तर केनिया आणि मध्य आणि पूर्व आफ्रिकन देशांना भारताशी जोडतो. आजही दोन्ही बाजूकडील वस्तू, चालीरिती, परंपरा,कल्पना मुल्यांची समुद्रापार देवाणघेवाण होते. गेल्या दशकात विशेषत: मोदींच्या काळात भारत-आफ्रिकेच्या संबंधांना गती मिळाली. भारताप्रमाणेच केनिया देखील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे. केनियासाठी विकासाच्या दृष्टीने भारत हा एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे. भारताने आज पर्यंत कर्ज, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि प्रगत वैद्यकीय उपकरणे देऊन सहाय्य केले आहे. आफ्रिकेतील संबंध घट्ट करण्यासाठी भारत आणि अमेरिका केनियामध्ये एकत्र काम करत आहेत.
 
केनिया पूर्व आफ्रिका प्रदेशात सोमालिया आणि टांझानिया दरम्यान हिंद महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे. कोविड-१९ पूर्वी केनिया सर्वात वेगाने विकसित होणारी आफ्रिकन अर्थव्यवस्था होती. जागतिक बँकेच्या मते, केनियामध्ये वाढणारी तरूण लोकसंख्या, एक गतिमान खाजगी क्षेत्र तसेच सुधारित पायाभूत सुविधा आहेत.
 
भारतीय विशेषत:गुजरातसारख्या पश्चिम किनारपट्टीच्या राज्यातील व्यापारी शतकानुशतके केनियाबरोबर व्यापार करीत आहेत. केनियाच्या पर्यटन उद्योगासाठी भारत तिसर्‍या क्रमांकाचा पर्यटक आहे.
 
पश्चिम हिंद महासागराच्या भौगोलिक राजकारणामध्ये केनियासारखे देश मोठ्या शक्तींमध्ये होणार्‍या स्पर्धेचे केंद्रबिंदू बनले आहेत. भारत, अमेरिका, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या मध्य-पूर्व शक्तींना केनियासारख्या आर्थिक उर्जास्थानांशी आपले संबंध दृढ करण्यास रस आहे. अमेरिकेने या वर्षाच्या सुरुवातीस सोमालियामधून आपले सैन्य काढून घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा, केनियात त्यांची पुन्हा तैनाती करण्यात आली कारण अनेक दशकांपासून ते अमेरिकेसाठी स्थिर भागीदार होते. अलीकडच्या काळात, ब्रिटन केनियाबरोबरच्या संरक्षण सहकार्यास बळकट करत आहे कारण त्याचे हिंद महासागरातील स्वारस्य वाढत आहे.
 
केनियामध्ये चीनने मोरोबासाच्या बंदराशी राजधानी नैरोबीला जोडणारी एक महत्त्वाची रेल्वे लाइन तयार केली आहे. केनियामधील लामू येथे चीन एक बंदर विकसित करत आहे, जे पूर्ण झाल्यावर आफ्रिकेतील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असू शकेल. चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकत जाणे केनियासाठी भविष्यात धोकादायक होऊ शकते. भारतासाठी या प्रकल्पांद्वारे केनियावर चीनचा वाढणारा प्रभाव नक्कीच चिंतेचा विषय आहे.
 
केनियन बंदरांवर भारतीय नौदल नियमित भेट देत आहे. केनियाच्या संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांना भारतीय सैन्य अकादमींमध्ये प्रशिक्षण दिले जाते आणि दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य मजबूत आहे. तथापि, चिनी आव्हानाच्या संदर्भात अजून काही करण्याची गरज आहे. भारत या कठीण वित्तीय आणि राजकीय परिस्थितीत अमेरिका आणि ब्रिटन सारख्या देशांशी असणारी भागीदारी आणखी मजबूत करून या प्रदेशातील वाढती चिनी घुसखोरी नियंत्रित ठेवण्यासाठी त्रिपक्षीय सहकार्य वाढवू शकतो.
 
भारताचे आफ्रिका धोरण आणि हिंद महासागर रणनीती पूर्व आणि दक्षिण आफ्रिकन समुद्री किनारपट्टीवर अवलंबून आहे आणि म्हणूनच केनियासारख्या देशांना वाढते भौगोलिक महत्त्व आहे. त्यामुळे केनिया तुलनेने लहान असला तरी सामरिकदृष्ट्या महत्वाचा आहे. केनियाबरोबरच्या भारताच्या बहुआयामी भागीदारीला बदललेल्या समकालीन वास्तविकतेत नवीन गतीची आवश्यकता आहे. हिंद महासागर अपुरी सुरक्षा, भौगोलिक राजकीय स्पर्धा अशा मोठ्या आव्हानांचा सामना करतो. विकासाच्या अजेंड्यावर पुरेसे लक्ष केंद्रित करणे आणि आर्थिक, सामरिक सहकार्य वाढविणे आवश्यक आहे. उपलब्ध साधनांविषयी आणि त्यांच्या प्राथमिकतेवर चर्चा होणे आवश्यक आहे जी अशा आव्हानांचा सामना करण्याची आणि ती लिलया पेलण्याची दिशा देते.जयशंकर यांची आगामी भेट हेच प्रतिबिंबित करत असावी