इतिहासाचार्य वि.का. राजवाडे- उत्तुंग बुद्धिमत्ता, अलौकिक क्षमतेचा संशोधक...
         Date: 07-Jul-2022
इतिहासाचार्य वि.का. राजवाडे- उत्तुंग बुद्धिमत्ता, अलौकिक क्षमतेचा संशोधक...
 
 
आज आषाढ शुद्ध अष्टमी, इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा जन्मदिन आणि एक जबरदस्त योगायोग असा कि आज ७ जुलै म्हणजे राजवाडेंनी स्थापन केलेल्या भारतीय इतिहास संशोधन मंडळ, पुणे या संस्थेचा आज ११२ व वर्धापनदिन त्यानिमित्त या अलौकिक संशोधकाला आदरांजली वाहण्याचा प्रयत्न.
 
 
Itihasacharya vi ka rajwade
ब्रिटिश काळात १८२६ ला जेम्स ग्रँड डफ याने A history of the Mahrattas हे मराठ्यांच्या इतिहासावर पहिलं विस्तृत पुस्तक लिहिलं. ब्रिटिश आणि मराठे यांच्यात शिव छत्रपतींच्या काळापासून सतत संघर्ष होत आला होता आणि १८१८ ला इंग्रज मराठे युद्धानंतर मराठ्यांच्या पराभवापर्यंत हा संघर्ष चालू होता. त्यामुळे कोणत्याही फिरंग्याने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास हा संतुलित असू शकत नाही, मराठ्यांच्या कर्त्यत्वाचा अभिमान असलेल्या एखाद्या मराठी माणसानेच मराठ्यांचा इतिहास लिहावा असा मतप्रवाह त्या काळात बौद्धिक, राजकीय चळवळींचे केंद्र असलेल्या पुण्यात निर्माण झाला होता. यामुळेच अनेक दिग्गज मराठी इतिहास संशोधक तेव्हा निर्माण झाले त्यापैकी वि. का. राजवाडे, वासुदेवशास्त्री खरे, बळवंतराव पारसनीस, रियासतकार सरदेसाई, भावे हे आघाडीचे संशोधक होते. या सगळ्यात शास्त्रीय इतिहास संशोधनाचा पाया घालून इतिहासासह संस्कृत आणि मराठी व्याकरण, गुप्त भाषा (कोडेड लँग्वेज) यात आपल्या अफाट कर्तृत्वाने भर घालणारे राजवाडे हे एक अद्भुत व्यक्तिमत्व होतं!
 
 
इतिहासाचार्य राजवाडे...
 
 
एकेकाळी लोहगडचे किल्लेदार असलेल्या कुटुंबात राजवाड्यांचा २४ जून १८६३ मध्ये रायगड जिल्ह्यात वरसई येथे जन्म झाला परंतु त्यांचं कार्यक्षेत्र जवळपास सर्व भारत राहिलं कारण त्याकाळातल्या दळणवळणाच्या तुटपुंज्या साधनांच्या साहाय्याने राजवाडे अख्खा भारत उभा आडवा फिरले. एक व्यक्ती आपल्या ६३ वर्षांच्या आयुष्यात काय काय करू शकतो हे बघायचं असेल तर राजवाडेंची ग्रंथसंपदा बघावी! बुद्धिमत्ता, शारीरिक क्षमता आणि कार्यक्षमता यांचा अद्भुत संगम म्हणजे राजवाडे.
 
 
देशभर फिरून जुनी ऐतिहासिक कागदपत्रे जमवायची, ती साफसुफ करून, वाळवी उंदराने खाल्लेल्या भागात काय असेल याचा अंदाज बांधून, संदर्भ जुळवून त्यानंतर वाचून त्यावर विचार करून टीका लिहायची आणि ती पैशाची तजवीज करून छापायची असा अखंड उपदव्याप करत त्यांनी "मराठ्यांच्या इतिहासाची साधने" या नावाने संपादन आणि प्रस्तावनेसह २२ खंड छापले. वयाच्या ३४ व्या वर्षी पहिला खंड छापला आणि पुढच्या २३ वर्षात बाविसावा खंड छापला! या लेखाच्या शेवटी त्यांच्या सर्व साहित्याची यादी देतो आहे ती वाचल्यावर आपल्याला प्रश्न पडतो कि खरंच एक माणूस प्रवासाची साधने नसताना आणि डिजिटल उपकरणे नसताना एवढं काम करू शकते? हे २२ खंड लिहिताना त्यांनी निर्माण केलेली अन्य ग्रंथसंपदा तोंडात बोट घालायला भाग पाडते तिचाही धावता आढावा आपण घेऊ. राजवाडेंच्या फटकळ, तापट स्वभावामुळे त्यांचं फार कुणाशी पटलं नाही पण तरीही प्रत्येक जण त्यांच्या कर्तृत्वासमोर नतमस्तक व्हायचा हि त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाची पोचपावती होती!
 
 
शहाजी राजे यांचे चरित्र राधामाधवविलासचंपू याचं संपादन...
 
 
राजवाड्यांना चिंचवडच्या रबडे कुटुंबाच्या घराच्या तिसऱ्या माळ्यावर उंदरांनी कुडतडलेलं, पावसाने गळून चिकटलेलं एक हस्तलिखित मिळालं. ते चाळताना त्यांना अंदाज आला कि यात शहाजी राजे भोसले याच्याबद्दल काहीतरी महत्वाचं संस्कृत काव्यमय लिखाण आहे म्हणून राजवाड्यांनी ते साफ करून सुसंगत लावून वाचलं आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. हे हस्तलिखित शहाजी राजांच्या बंगलोरच्या दरबारात पदरी बाळगलेला मूळचा नाशिकच्या एका किल्लेदाराच्या घरात जन्मलेल्या बहुभाषिक पंडित जयराम पिंड्ये या विद्वानाने लिहिलेलं "राधामाधवविलासचंपू" हे शहाजी चरित्र होतं. लागलीच राजवाडे त्याच्या विशेषण- भाषांतराला लागले आणि त्यांनी त्याची एक वेगळी शुद्ध प्रत तयार करून ते छापण्याच्या मागे लागले. ते काव्यमय चरित्र असल्याने, सामान्य माणसाला कळायला त्रास होईल म्हणून त्यांनी त्याला जवळपास २०० पानांची प्रस्तावना लिहिली. हि प्रस्तावना म्हणजे "राधामाधवविलासचंपू" या शहाजी चरित्रात काय आहे याचं सार आहे.
 
 
आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रचंड कर्तृत्वाचे पोवाडे, कथा ऐकत ऐकत मोठे होत आलोय, त्यांच्या मागे उभ्या असलेल्या धीरगंभीर विशाल पर्वताचं नाव होतं शहाजी राजे! मराठ्यांमध्ये (सर्वजातीय मराठी भाषिक लोक म्हणजे मराठे असा याचा "भौगोलिक" अर्थ या संपूर्ण लेखात घ्यावा!) राष्ट्रभावना, धर्मभावना आणि राष्ट्र- धर्म यासाठी प्राणपणाने लढण्याची वृत्ती शहाजी राजांनी निर्माण करायचा प्रयत्न केला, याचा पुरेपूर विकास छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असा सिद्धांत राजवाड्यांनी मांडला आणि तो मनाला पटतोही.
 
 
शहाजी राजांची संपूर्ण कारकीर्द आदिलशाहीच्या पदरी गेली. मुस्लिम राजवट आपल्या तलवारीने मजबूत करताना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची उर्मी त्यांच्यात कशी निर्माण झाली याचं वर्णन या प्रस्तावनेत आहे. त्यांच्या काळात कुतुबशाही, आदीलशाही, निजामशाही आणि उत्तरेतली मुघलशाही यांच्या साठमारीत भारतीय समाजाचे काय हाल होत होते आणि त्यावर शहाजी राजे कसे व्यक्त होत होते याचा सुंदर आलेख यात राजवाडेंनी मांडलाय.
 
 
स्वराज्य स्थापनेच्या उर्मीपायी शहाजी राजांनी जर्जर झालेल्या आदिलशाहीतील एक ५ वर्षाचा राजपुत्र मुर्तझा आणि त्याची आई यांना आणून नाशिकच्या किल्ल्यावर ठेऊन त्यांच्या वतीने आदिलशाही चालवण्याचा एक प्रयत्न केला. सध्याच्या भाषेत आपण त्याला Government in Exile म्हणू शकतो. या प्रयत्नाने सगळ्या मुस्लिम शाह्या घाबरल्या कारण शहाजी राजांच्या मनात काय आहे याचा त्यांना अंदाज आला. हा प्रयोग जेमतेम २ वर्षं चालला पण त्यातून आलेले अनुभव छत्रपती शिवाजी राजांना स्वतंत्र राज्य उभं करताना उपयोगी पडले. शिवाजी राजाला सुरुवातीच्या काळात शहाजी राजांनी मोठ्या प्रमाणात सैनिकी साधने, किल्ले आणि दादोजी कोंडदेवांसह कित्येक मुत्सद्दी आणि मैदानी सैनिकी मोहिमांमध्ये कसलेले रांगडे सेनानी कसे दिले हे जयराम पिंड्येने यात वर्णन करून सांगितलं आहे. यामुळे राधामाधवविलासचंपूची प्रस्तावना हि राजवाड्यांची भारतीय इतिहासावर आणि मराठी माणसावर झालेली दैवी कृपा आहे असं मानायला हरकत नाही!
 
 
राजवाडे आणि संत परंपरा...
 
 
संत परंपरेने यावनी राजवटीत स्वत्व हरवत चाललेल्या हिंदूंना सनातन धर्मासोबत घट्टपणे जोडून ठेवलं अन्यथा अख्खा भारत मुस्लिम झाला असता असं राजवाडे म्हणतात. समर्थ रामदासांवर लिहिलेल्या दीर्घ लेखातही याचा उल्लेख त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात अतिशय आदराने वाचल्या जाणाऱ्या श्री नृसिंह सरस्वतीच्या जीवनावर आधारित काव्यमय "श्रीगुरुचरित्र" यावर राजवाडेंचे विचार त्यांच्या स्वभावाला धरून होते. ते म्हणायचे श्रीगुरुचरित्र हि एक अद्भुत कादंबरी आहे आणि प्रत्येक संप्रदायाने आपल्या संप्रदायाच्या प्रसारासाठी अशी अद्भुत कादंबरी रचली पाहिजे!
 
 
पण याउलट राधामाधवविलासचंपू मध्ये भारतात रसायन, भौतिक शास्त्राची हेळसांड झाली कारण संपूर्ण भारतीय समाज अवाजवीपणे भक्तिमार्गाला लागून "संन्यासप्रवण" झाला आहे, इथे मुस्लिम आक्रमकांच्या लाटांमागून लाटा येतात आणि "टाळकुटा" हिंदू समाज त्यापासून रक्षण करण्या ऐवजी आपल्याला मेल्यानंतर मोक्ष कसा मिळेल याच चिंतेत आहे असं ते म्हणतात! शास्त्रीय संशोधनाकडे समाजाने पराकोटीचं दुर्लक्ष केल्यामुळेच शहाजी आणि शिवाजी राजांना तोफा आणि दारुगोळ्यासाठी पोर्तुगीज, डच आणि इंग्रजांवर कायम अवलंबून राहावं लागतं असा त्यांचा वाजवी राग होता. गावंढळ, अर्धशिक्षित तुर्की कारागीर आपल्या पदरी बाळगून मुघल त्यांच्याकडून तोफा ओतून घेतात आणि त्या जोरावर ते "टाळकुट्या" हिंदूंना भिवडवतात असं ते पोटतिडकीने म्हणतात! विज्ञान साधनेबद्दलची हि निरीक्षणे त्यांच्या काळात ते काळाच्या किती पुढे होते हे दाखवायला पुरेशी आहेत.
 
 
भारतीय विवाह संस्थेचा इतिहास...
 
 
राजवाडे यांची हि लेखमाला प्रचंड वादग्रस्त ठरली. आर्यांच्या समाजजीवनाचा विकास कसा झाला यावरची हि लेखमाला आता पुस्तक रूपात उपलब्ध आहे, अनेक विस्फोटक सिद्धांतांमुळे ती त्या काळात अतोनात वाद निर्माण करून गेली. याचा पहिला लेख पुण्याच्या ज्या छापखान्याने छापला त्याला सनातनी लोकांनी छापखाना जाळायची धमकी दिली त्यामुळे पुढचे लेख तसेच राहिले. हे समजल्यावर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेंनी राजवाड्यांना बाकीचे लेख गिरगावच्या आपल्या छापखान्यात छापायचा प्रस्ताव दिला. पण राजवाडेंनी सगळे लेख एकदम द्यायला नकार दिला. मग करार असा झाला, राजवाड्यांनी एक लेख पाठवायचा, डांगेंनी तो अंकात छापून त्याची प्रत राजवाड्यांना पाठवली कि ते पुढचा लेख पाठवणार. हे असं का? असा प्रश्न डांगेंनी विचारल्यावर ते म्हणाले, लेख छापूनही तुमचा प्रेस कुणी जाळला नाही याची खात्री पटल्यावरच पुढचा लेख पाठवीन! हि लेखमाला सुरु असताना डांगे स्वातंत्र्यचळवळीत तुरुंगात गेले आणि बाकीचे लेख अप्रकाशित राहिले. ते पुढे पुस्तकात समाविष्ट केले आहेत.
 
 
राजवाडे आणि संस्थानिक...
 
 
ऐतिहासिक कागदपत्रे मिळवण्यासाठी राजवाडे कित्येक संस्थानिक, सरदारांचे वंशज यांच्याकडे खेटे घालायचे. पैसे देऊन त्यांच्याकडची अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे विकत घ्यायचा प्रस्ताव द्यायचे. पण बरेच संस्थानिक आढेवेढे घ्यायचे किंवा सरळ नाही म्हणायचे. अशावेळी राजवाड्यांच्या आतला जमदग्नी उफाळून बाहेर यायचा. एका संस्थानिकाने पैसे देतो तुमच्याकडची कागदपत्रे मला अभ्यासासाठी द्या म्हणूनही ती द्यायला नकार दिल्यावर राजवाडे म्हणाले "ठीके नका देऊ. तुम्ही मेल्यावर तुमची विधवा ते कागद मलाच विकेल!"
 
संस्थानिक इतिहास संशोधकांना आणि अभ्यासकांना सहकार्य करत नाहीत यावरून राजवाडे संतापून म्हणायचे, "हे थोर इतिहासपुरुष ज्यांचा आम्हाला अभ्यास करायची इच्छा आहे ते या संस्थानिकांचे कुणीच लागत नाहीत, आम्हा संशोधकांचे मात्र आजे-पणजे लागतात असा या संस्थानिकांचा भाव असतो!"
 
 
वासुदेवशास्त्री खरेंनी (मूळचे गुहागर) मिरज संस्थानात संस्कृत शिक्षकाची नोकरी करून ती करता करता मिरज संस्थानातील ५ लाख ऐतिहासिक पत्रे वाचून त्यातील २५ हजार पत्रे संपादित करून स्वखर्चाने छापली आणि याकामी संस्थानाने खरे शास्त्रींना कोणतीही आर्थिक सहाय्यता केली नाही हे पाहून राजवाडे संतापून म्हणाले या दरिद्री मिरज संस्थानाला याचं महत्व कळायचा प्रश्नच येत नाही!
 
 
संस्थानिक, धनिक लोक संशोधकांना आर्थिक सहाय्यता नं करता नाट्य, कला, संगीत याच्या प्रसारासाठी वारेमाप पैसे खर्च करतात हे बघून राजवाडे म्हणाले, "या धनिक, संस्थानिकांकडे कबुतरे, वारवनिता, नृत्य, गायन, वादन, नाटक यात उडवायला पैसे आहेत पण संशोधकांना द्यायला एक दमडी नाही कारण अभ्यास आणि संशोधन याचं महत्व कळण्याची इंद्रिये अद्याप त्यांना यायची आहेत!" त्यांचा हा सात्विक संताप अजिबात गैर नव्हता.
 
 
राजवाडे आणि संगीत...
 
 
पैसा फंड संस्थेला स्थापनेपासून पहिल्या १० वर्षात फक्त ८ हजार रुपये दान मिळालं पण एकट्या मुंबई शहरात नाटक कंपन्या महिन्याला २५ हजार रुपयाचा गल्ला जमवतात हे बघून राजवाडे म्हणाले, आपला समाज शिक्षण, सुधारणा आणि स्वातंत्र्यलढा याबाबतीत एवढा उदासीन असेल तर काही काळ नाटक कंपन्यांवर बंदी घालणे योग्य! संगीत याविषयावर त्यांची मते त्यांच्या उग्र, क्षत्रिय स्वभावाला धरून होती, ती जरी सगळ्यांना पटण्यासारखी नसली तरी त्यांच्या हृदयातील आग किती होती हे समजण्यासाठी आपण जाणून घेणे आवश्यक आहे.
 
 
राजवाडे यांच्या मते, तासंतास आलाप घेत गाणारी नाटके आणि गुई. सुई, पुई असे कोमल आवाज काढणारी तंतुवाद्ये ऐकून मनुष्य स्त्रैण होतो आणि त्याची लढायची इच्छा संपते म्हणून ब्रिटिशांना हाकलून द्यायला योग्य लढाऊ समाज निर्माण करायचा असेल तर नाटक कंपन्या आणि कोमल वाद्ये बंद करून रणवाद्यांचा प्रसार करावा! स्वभाषा, संस्कृती, इतिहास याच्या प्रसाराची आणि स्वातंत्र्याची आग सतत उरात बाळगणाऱ्या माणसाच्या या प्रामाणिक भावना होत्या!
 
 
राजवाडे आणि व्याकरण...
 
 
राजवाडे इतिहास संशोधक होते त्यापेक्षा मोठे वैय्याकरणी होते. मराठी धातुकोश ज्यात मराठी भाषेतील ३० हजार धांतूंचं त्यांनी टिपेसह संकलन केलं. त्यातील काही पाने चाळली कि आपल्याला लक्षात येतं कि आपण सध्या वापरतो ती मराठी लाखातला एक भाग शिल्लक आहे आणि उर्वरित आपल्या हाताने आपण नष्ट केली आहे. त्याशिवाय सर्वसामान्य नामादीशब्दव्यत्पत्तीकोश, व्यक्तिनामव्युत्पत्तीकोश, उपनामव्युत्पत्तीकोश, स्थलनामव्युत्पत्तीकोश हे ग्रंथ. ज्ञानेश्वरीची व्याकरण दृष्ट्या सुधारित आवृत्ती ज्यात ज्ञानेश्वरीतल्या मराठी भाषेच्या व्याकरणाचे नियम लिहिलेले आहेत. अशी फक्त व्याकरणाला समर्पित ग्रंथसंपदा आहे.
 
 
राजवाड्यांनी महानुभव पोथ्यांच्या सांकेतिक भाषेचा उलगडा करून ती वाचण्याचे नियम लिहिले. महानुभव पंथाच्या पोथ्या या सांकेतिक भाषेत लिहिलेल्या होत्या त्यामुळे त्याचा अर्थ लागणं दुरापास्त होतं. एका छापखान्यात अशीच एक हस्तलिखित पोथी पडून होती, ती कुणीतरी राजवाडेंना देऊन सांगितलं कि बघा यातून काही उलगडा होतो का. राजवाडे वैय्याकरणी आणि उच्चकोटीचे भाषाशास्त्रज्ञ असल्याने शिवाय इंग्रजी, पारशी, फ्रेंच, हिंदी या भाषा आत्मसात असल्याने त्यांनी ती पोथी एक आव्हान म्हणून नेली. सतत अकरा दिवस तिच्यावर विचार करून वेगवेगळ्या पद्धतिने वाचून बघितली आणि अखेर त्यांना त्यातल्या सांकेतिक भाषेचा उलगडा झाला. लागलीच त्यांनी ती वाचण्याचे नियम लिहिले. या अद्वितीय कामगिरीमुळे महानुभव पंथाच्या ६ हजार अन्य पोथ्या आणि त्यातले विचार सामान्य माणसाला वाचता येऊ लागले!
 
 
कर्तृत्वाचा हिमालय...
 
 
एक माणूस आपल्या ६३ वर्षांच्या आयुष्यात काय काय करू शकतो हे बघून मती गुंग होते. या ६३ वर्षात पहिली २५ वर्षे शिक्षण आणि अनुभव घेऊन वाचण्यात गेली. म्हणजे उरलेल्या ३८ वर्षात राजवाडेंनी जे काही केलं ते अकल्पनीय आणि अविश्वसनीय आहे. समकालीन बंगाली इतिहास संशोधक, औरगंजेबाचे ख्यातनाम चरित्रकार सर जदुनाथ सरकार यांनी प्रामुख्याने इंग्रजी भाषेत लिखाण केलं आणि मराठी भाषा, भारतीय संस्कृती याचा जाज्वल्य अभिमान जोडीला ब्रिटिशांचा प्रचंड तिटकारा यामुळे राजवाडेंनी फक्त आणि फक्त मराठी भाषेत लिखाण केलं. जदुनाथ इंग्रजाळलेली विद्वान होते आणि ते पारसी, मुघल इतिहासातले उत्तुंग संशोधक होते त्या प्रभावामुळे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना "सीवा" आणि "संभा" म्हणायचे. हा एकेरी उल्लेख ऐकून, वाचून राजवाडेंचा तिळपापड व्हायचा. त्यामुळे जदुनाथ सरकार आणि ते संपर्क होता पण सख्य नव्हतं. तरीही जदुनाथ सरकार राजवाडेंच्या अफाट, अतुलनीय कर्तृत्वापुढे नेहमी नतमस्तक होते. राजवाडेंच्या तापट स्वभावामुळे समकालीन अन्य लेखक, संशोधक त्यांच्यापासून अंतर राखून राहिले पण अशा सर्वांना त्यांच्याबद्दल आदर आणि दरारा कायम राहिला.
 
 
राजवाडेंचा आपल्याला पडलेला विसर...
 
 
ज्या राजवाडेंनी इंग्रजीवर प्रभुत्व असूनही केवळ मराठीच्या पराकोटीच्या अभिमानामुळे आपली अफाट ग्रंथसंपदा फक्त आणि फक्त मराठीतून निर्माण केली त्या राजवाडेंवर मराठी जनता आणि महाराष्ट्र यांनी केलेला अन्याय अक्षम्य आहे. गेल्या आठवड्यात राजवाडे लेखसंग्रह भाग १,२,३ विकत घेतले त्याच्या दुसऱ्या आवृत्तीच्या सुरुवातीला "प्रकाशकाचे निवेदन" म्हणून वरदा बुक्सच्या ह.अ.भावे यांनी ९ ऑक्टोबर १९९० ला लिहिलंय, "ह्या लेखांचा संग्रह व संपादन १९२८ साली (राजवाडेंच्या निधनानंतर २ वर्षांनी) भारतीय इतिहास संशोधन मंडळासाठी शंकर नारायण जोशी, वाईकर यांनी प्रसिद्ध केले. गेल्या बावन्न वर्षात ह्या अतिशय महत्वाच्या लेखांची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध होऊ नये यात आश्चर्य वाटत नाही. कारण मराठीत अशी विद्वत्तेची उपेक्षा नवीन नाही. आपण पाश्चात्य इतिहासकार टॉयनबी, ड्युरँड यांचा उदोउदो करतो पण इतिहासाचार्य वि.का. राजवाडे हे त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ होते हे महाराष्ट्राला केव्हा कळणार कोणास ठाऊक!" हे वाचून मन सुन्न झालं आणि मला मिळालेल्या प्रति याच वरदा बुक्सच्या ह.अ.भावे यांनी १९९० ला छापलेल्या आहेत याचा अर्थ आधीच्या ५२ वर्षात जे झालं तेच १९९० ते २०२२ या ३२ वर्षात आपण राजवाडे यांचं केलंय आणि ते म्हणजे निव्वळ दुर्लक्ष!
 
 
समारोप...
 
 
रोज राजवाडे यांचे लेखसंग्रह समोर दिसले कि मला राजवाडे यांचा वऱ्हाडातल्या एका माणसाजवळ झालेला संवाद आठवतो. एका वऱ्हाडी सधन माणसाने राजवाडे त्याच्या घरी गेले असता त्यांना विचारलं कि मी माझ्या आयुष्यात काय करू ते सांगा म्हणजे मी ते करायची सुरुवात करतो. राजवाडे संतापून म्हणाले, " तुम्ही तात्काळ मेलेले बरे, कारण एवढे मोठे होऊनही आजपर्यंत तुमचं तुम्हाला काय करायचं कळलं नाही असा माणूस दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टी काय आणि किती करणार?"
 
 
माझं या आयुष्यात काय करायचं हेच ठरत नसल्याने राजवाडे यांनी जे अफाट काम करून ठेवलंय त्याला न्याय देण्यासाठी मी काय आणि किती करणार हा प्रश्न मला भेडसावत राहतो. यातून काही सकारात्मक निर्मिती झाली तर तो सुदिन म्हणावा लागेल.
 
 
आज इतिहासाचार्य राजवाडे यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली आणि त्यांनी ७ जुलै १९१० ला स्थापन केलेल्या भारतीय इतिहास संशोधन मंडळ, पुणेला खूप खूप शुभेच्छा.....
 
 
राजवाडे ग्रंथसंपदा...
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १ -मराठी भाषा व व्याकरण
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड २ -मराठी ग्रंथ व ग्रंथकार
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ३ -संस्कृत भाषा विषयक
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ४ -अभिलेख संशोधन
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ५ -मराठी धातुकोष
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ६ -व्युत्पत्ती कोष
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ७,८ -समाजकारण व राजकारण
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ९ - आत्मवृत्त व लेख
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १० -प्रस्तावना खंड
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ११ -इतिहास
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १२ -संपादक राजवाडे
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १३ -समग्र संत साहित्य
खानदेशातील घराणी
 शहाजीराजे भोसले यांचे चरित्र
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १ ते २२ (संपादन आणि प्रस्तावना)
राजवाडेनामादिशब्द व्युत्पत्तिकोश
राजवाडे लेखसंग्रह- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी; साहित्य अकादमी प्रकाशन
राधामाधवविलासचंपू (संपादन आणि प्रस्तावना)
संस्कृत प्रतिशब्दशः भाषांतर
संस्कृत भाषेचा उलगडा
ज्ञानेश्वर नीति कथा
महिकावतीची बखर
ज्ञानेश्वरी (राजवाडे संहिता) : अध्याय १, ४, १२
ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण