हिंडेनबर्ग, अदानी आणि क्लाईव्ह हॅमिल्टनचे "सायलंट इन्व्हजन"
         Date: 24-Feb-2023
हिंडेनबर्ग, अदानी आणि क्लाईव्ह हॅमिल्टनचे "सायलंट इन्व्हजन"
 
 
(ICRR- Intelligence / Counter Intelligence)
 
 

Silent Invasion- Clive Hamilton 
हिंडेनबर्गचा अदानी मार्गे सामान्य ऑस्ट्रेलियन्सना दणका- क्लाईव्ह हॅमिल्टनच्या "सायलंट इन्व्हजन" चा नवा अंक सुरु?
 
 
अदानी उद्योगसमूह एक भारतीय औद्योगिक क्षेत्रातील मोठं नाव आहे. रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, गॅस अशा पायाभूत सुविधा, खाणी आणि ऊर्जानिर्मिती यात अदानीचा मोठा दबदबा आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात चिनी उद्योगांच्या अनभिषिक्त साम्राज्याला टक्कर देत अदानीने मोठ्या प्रमाणात खाणी मिळवल्या आहेत. याशिवाय रेल्वे आणि अन्य गुंतवणूकही आहे. तिथला कोळसा भारतात आयात करून वीजनिर्मिती केली जाते आणि यावरून एकदा राजकीय वादही झालेला होता.
 
 
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात चिनी उद्योगांनी चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या मदतीच्या आणि सक्रिय प्रोत्साहनाच्या जोरावर आपला अक्राळ विक्राळ विस्तार केलेला आहे. ऑस्ट्रेलियन खासदार सॅम दस्तीयारी हा चिनी गुप्तचर संस्था युनायटेड फ्रंट वर्क्स डिपार्टमेंट (UFWD ) च्या पे-रोल वर असल्याच्या बातम्या आणि त्यामुळे त्याचा २०१७ मधील राजीनामा घेण्यात आल्याच्या बातम्याही आलेल्या आहेत. या दोन्ही देशातील पाशवी चिनी प्रभावाला ज्यांनी ज्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला त्यांना प्रचंड दडपशाहीचा सामना करावा लागलेला आहे. या पार्श्वभूमीवर अदानीने आपली अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक ऑस्ट्रेलियाच्या खाण, रेल्वे आणि बंदर उद्योगात केल्यामुळे चिनी कम्युनिस्ट सरकारने आपला मोहरा अदानी आणि अन्य महत्वाकांक्षी उद्योगांकडे वळवला.
 
 
याशिवाय हजारो ऑस्ट्रेलियन्सनी आपला पैसा अदानीच्या उद्योगात वेगवेगळ्या फंडांच्या माध्यमातून गुंतवलेला आहे. हिंडेनबर्गचा अदानी विरोधातला रिपोर्ट छापून आल्यानंतरही तिथल्या बाजारात त्याचा फार परिणाम झाला नव्हता जो आता जागतिक पातळीवर यूएफडब्ल्यूडी ने केलेल्या आक्रमक मीडिया कॅम्पेन मुळे दिसू लागला आहे. चीन समर्थित ऑस्ट्रेलियन खासदार रेक्स पॅट्रिक ने केलेल्या माहिती अधिकार याचिकेवरून अशी माहिती बाहेर आली कि फ्युचर फंड ने अदानी गॅस मध्ये ३३.१ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. आणि हि बातमी बाहेर आल्यावर त्याचे शेयर्स आदळल्याने सामान्य ऑस्ट्रेलियन गुंतवणूकदारांचे एकूण गुंतवणुकीच्या ७५% पैसे पाण्यात गेले. अदानीचे भारतात खाली आलेले शेयर्स मूल्य परत वर जात असल्याने ऑस्ट्रेलियन गुंतवणूकदारांची गुंतवणूक कायमची बुडणार नाही पण सध्यातरी बाजारात नकारात्मक भावना निर्माण करायला हे पुरेसं आहे.
 
 
क्लाईव्ह हॅमिल्टनच्या "सायलंट इन्व्हजन" पुस्तकाचा महत्वाचा बोध...
 
 
क्लाईव्ह हॅमिल्टन या ऑस्ट्रेलियन प्राध्यापकाला युनिव्हर्सिटी कॅम्पस वर एका निदर्शनाच्या दरम्यान चिनी विद्यार्थ्यांनी केलेली दंगामस्ती आणि स्थानिक विद्यार्थ्यांना दिलेला चोप यापासून ऑस्ट्रेलियात चिनी हस्तक्षेपाचा संघटित अभ्यास करायची इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी महत्प्रयासाने प्रचंड कष्टाने याचा अभ्यास करून यावर पुस्तक लिहिलं त्याचं नाव "सायलंट इन्व्हजन". पुस्तक लिहून झाल्यावर त्याचा एका प्रकाशकाजवळ ते छापण्याचा करार झाला पण त्या प्रकाशकाला चिनी लोकांनी धमक्या दिल्या आणि कोर्ट केसेसच्या धमक्या दिल्या, असे अन्य प्रकाशकांच्या बाबतही झाल्याने अखेर एका प्रकाशकाने मोठ्या विलंबाने ते पुस्तक छापलं! पण एकंदर या पुस्तकात दिलेली माहिती आणि क्लाइव्ह हॅमिल्टनला आलेले धक्कादायक अनुभव हे चीन एखाद्या देशाच्या मागे लागला कि काय करू शकतो याचा धडा देणारे आहेत. या लेखाच्या शेवटी उदाहरण म्हणून काही न्यूज टायटल्स दिलेली आहेत ती ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यावर सध्या चालू असलेल्या छुप्या आक्रमणाची काही उदाहरणे आहेत. प्रत्यक्ष समस्या फार खोल, गंभीर आणि मोठी आहे.
 
 
भारत सरकार आणि उद्योग यांचे संबंध आणि भारतीय समाजाची मानसिकता....
 
 
समाजवादी समाजरचनेच्या काळात, भारतात एक भंपक स्वप्नाळू राज्यपद्धती होती त्यात उद्योजकांना उत्पादन करण्यासाठी लायसन्स घ्यावं लागत होतं, एक काळ असा होता कि भारतात स्कुटर विकत घेण्यासाठी ५ ते ९ वर्षाची वेटिंग लिस्ट होती. उद्योग आणि व्यापार करणं एक प्रकारे गुन्हेगारी असल्यासारखी अवस्था होती. अतोनात कर होते त्यामुळे लोक तो चुकवण्याचा मागे लागत होते आणि त्याची एक वेगळीच अर्थव्यवस्था निर्माण झाली होती.
 
 
अर्थव्यवस्था खुली झाल्यावर उद्योग आणि उत्पादन वाढत गेलं, सामान्य लोकांच्या हातात पैसे खेळू लागले आणि भरभराट सुरु झाली. भारतीय उद्योग विदेशात पसरू लागले आणि देशात शिक्षक, पोस्ट, बँक, मामलेदार कचेरी, पीडब्ल्यूडी याच्या बाहेर नोकऱ्यांच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या. पण भारतीय समाज अजून समाजवादी अर्थव्यवस्थेच्या मनस्थीतीतच आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार करणारे लोक चोर असतात, बक्कळ कमावतात, लुटतात हि आपली मानसिकता आहे. त्याउलट एअर इंडियाने नुकतीच हजारो कोटी रुपयांची नव्या विमानांची ऑर्डर बोईंग ला दिल्यानंतर अमेरिकी राष्ट्रपतीने स्वतः प्रसिद्धी पत्रक काढून त्याचा अमेरिकन समाजाला कसा फायदा होईल याची माहिती दिली. तिथे सरकार उद्योग प्रवण आहे आणि म्हणून सगळ्या जगातील तरुण तिथे जाऊन नोकरी करण्याची स्वप्ने बघतात.
 
 
भारतात सरकारने उद्योगस्नेही वातावरण निर्माण केल्यास तो राज्यकर्ता गुन्हेगार म्हणून बदनाम होतो. अशाने देशात उद्योग कोण उभारणार? भारतीय राजकारणी सत्तेत असताना उद्योगस्नेही असतात आणि विरोधी पक्षात असताना उद्योग शत्रू!
 
 
अशा विचित्र स्थितीत मोदी सरकारने उघड उघड उद्योग स्नेही भूमिका घेतल्याने ते टीकेचे धनी आहेत पण आमच्या मुलांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या हि हव्यात आणि त्याकरता उद्योग वाढले कि त्यावरून आम्हाला "अदानी- अंबानीचे सरकार" अशी टीकाही आम्हाला करायची आहे, हा मूर्खपणा आपण किती दिवस करणार?
 
 
सरकार- व्यापार- उद्योग- सैन्य या खांबांवर देश चालतो. केंद्र सरकारने आपल्या जगभर पसरलेल्या उद्योगांना वेळ पडल्यास आपले सैनिक पाठवून मदत करावी कारण त्यामुळे आपल्या देशात भरभराट येईल. सुदैवाने सध्या भारतीय सरकार जगभरात आपले व्यापारी हितसंबंध जपण्यासाठी आपले राजनैतिक आणि सैन्य अधिकारी तातडीने तैनात करत आहे, त्याचे फायदे आपल्याला दिसत आहेत. पण समाजाने खुलेपणाने उद्योग व्यापाराला स्वीकारलं पाहिजे.
 
 
सध्याच्या राज्यकर्त्यांना राजकीय फायद्यासाठी झोडपण्यात उपयोगी म्हणून जर आपल्या देशी उद्योगांना आपण निर्लज्जपणे बदनाम करणार असू तर ते करण्यापूर्वी आपल्या शेजारच्या देशात सध्या काय स्थिती आहे याचा अभ्यास जरूर करावा.
 
 
 
 
 
---- विनय जोशी
1) New Zealand PM Ardern says China has become ‘more assertive’ (APNews)
2) New Zealand Is Done with Speaking Softly to China (Rand Report)
3) Chinese interference is dangerous – but also often ineffective and counterproductive (Lowi Institute)
4) Australia puts Beijing-linked group under scanner for foreign influence amid politics over ‘delay’ (The Print)
5) Countering China’s Influence Operations: Lessons from Australia (CSIS)