घटनेबाहेर जाऊन एअरक्राफ्ट कॅरिअर बनविण्याची जपानची तयारी?
         Date: 29-Nov-2018

घटनेबाहेर जाऊन एअरक्राफ्ट कॅरिअर बनविण्याची जपानची तयारी?

जपान सध्या त्यांच्या नौदलाच्या सेवेत असलेल्या एका हेलिकॉप्टर कॅरिअर मध्ये दुरुस्ती व आधुनिकीकरण करून त्याचे रूपांतर एका विमानवाहू युद्धनौकेत करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त मंगळवारी सूत्रांकडून समजले आहे. इतर देशांसाठी संरक्षण क्षेत्रातील आवश्यक आणि सर्वसाधारण प्रकारातील हा निर्णय असला तरी ज्या देशाची घटना ही आक्रमणाच्या नाही तर स्वसंरक्षणाच्या मूल्यांवर आधारित आहे अश्या जपानसारख्या देशाने असा निर्णय घेणे हे खरंच विशेष आहे.

 

 

पूर्व चिनी समुद्रातील सेंकाकू बेटांजवळील पाण्यात चीनच्या नौदलाचा वाढत वावर आणि तेथे स्थिरावण्याची त्यांची तयारी लक्षात घेता इझुमो या आपल्या हेलिकॉप्टर कॅरिअर चे रूपांतर विमानवाहू युद्धनौकेत करून आपल्या संरक्षण क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय जपानसाठी अपरिहार्यच होता असे म्हणायला हरकत नाही खरेतर.

 

जपान सरकार आपल्या संरक्षण धोरणांमध्ये काही बदल घडविण्याच्या विचारात आहे जेणेकरून एकदा या नौकेचे रूपांतर पूर्ण झाले की त्यावर लढाऊ विमाने वाहून नेता येतील. संरक्षण धोरणातील हे बदल पुढील महिन्यापर्यंत लागू होतील असा सूत्रांचा अंदाज आहे.

 

सध्या MSDF (मेरीटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स) च्या सेवेत असलेली १९,५०० टनी 'इझुमो' ही नौका २४८ मीटर लांब असून १४ हेलिकॉप्टर्स वाहून नेण्याची क्षमता राखून आहे.

 

जपानच्या घटनेतील युद्धविरोधी कलम क्रमांक ९ प्रमाणे जपान आपल्या सेवेत विमानवाहू युद्धनौकेचा समावेश करू शकत नाही कारण त्यांना केवळ स्वसंरक्षणासाठी लष्कर वापरण्याची मुभा असून आक्रमणाची नाही.

 

असे असले तरीही इझुमो चे रूपांतर युद्धनौकेत करण्याविषयी जपानचे संरक्षण मंत्री ताकेशी इवाया यांनी बराच आशावाद व्यक्त केलेला आहे. मंगळवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले,"केवळ विमाने वाहून नेण्याव्यतिरिक्तही इतर अनेक कारणांसाठी ही नौका आम्हास उपयोगी पडणार आहे".

 

इझुमो चे नूतनीकरण पूर्ण झाल्यास ही नौका F-35B ही लढाऊ विमाने वाहून नेऊ शकेल ज्यांमध्ये कमी अंतराच्या ठिकाणावर मारा करणे व जमिनीपासून सरळ उभ्या रेषेत टेक ऑफ व लँड करणे इत्यादी वैशिष्ठ्ये असतील. F-35B विमाने आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याबद्दल सध्या विचारविनिमय सुरु असल्याचे ताकेशी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

 

जपानचा सध्याचा सत्ताधारी पक्ष लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (LDP) देशाच्या घटनेची पुनर्बांधणी करण्याच्या विचारात आहे आणि त्याचमुळे त्यांनी इझुमोचे रूपांतर विमानवाहू युद्धनौकेत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मे महिन्यात प्रकाशित केलेल्या एका अहवालात त्यांनी अश्या प्रकारच्या विमानवाहू नौकेचे वर्णन 'मल्टीपर्पज मदर शिप' असे केले आहे.

 

याव्यतिरिक्त मंगळवारीच Nikkei या व्यावसायिक वृत्तपत्रात 'जपानचे सरकार सध्याच्या जुन्या होत चाललेल्या F-15 या विमानांपैकी काही विमानांच्या बदल्यात यूएस कडून १०० नव्या F-३५ विमानाची खरेदी करण्याचा विचार करीत असल्याचे वृत्त छापून आले आहे. एका F-35 विमानाची किंमतच १० बिलियन येन पेक्षा जास्त होते म्हणजेच ही अतिरिक्तची खरेदी १ ट्रिलियन येनचा आकडा ओलांडणार हे नक्की. या नवीन F-35 विमानांमध्ये F-35A आणि F-35B या दोहोंचा समावेश असल्याचा खुलासाही या बातमीत Nikkei ने केला आहे. सध्या जपानचे हवाई दल २०२४ च्या आर्थिक वर्षापर्यंत ४२ F-35A ही विमाने आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याच्या विचारात आहे. सध्या जपानच्या ताफ्यात २०० F-15 विमाने असून त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त विमानांचे आधुनिकीकरण होऊ शकत नाही.

 

युनाइटेड स्टेट्स चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जपानला लष्करी साहित्य खरेदी करण्यासाठी वारंवार मिळणाऱ्या इशाऱ्यामुळेच जपान सरकार अमेरिकेकडून तुकड्या तुकड्यामध्ये ही खरेदी करण्याचा विचार करण्यास विवश झाल्याचे Nikkei चे वार्ताहर म्हणतात.

 

दरम्यान जपान सरकार या नव्या 'मदर शिप'च्या बारकाव्यांबद्दल अत्यंत काळजीपूर्वक आणि सखोल विचार करीत आहे. या बोटीच्या वापराचा मुख्य उद्देश तसेच सर्वसाधारण प्रसंगी या नौकेवर नक्की कीती विमाने वाहून नेता येऊ शकतील या शक्यतेविषयी सखोल अभ्यास सुरु आहे. ही नौका एक युद्धनौका म्हणून ओळखली न जाता जपानच्या अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण अश्या केवळ स्वसंरक्षणास अनुकूल अश्या घटनेस धक्का पोहोचणार नाही यासाठीच हा सर्व खटाटोप असल्याचे समजते.

 

या नौकेचा डेक हा अत्यंत उच्च तापमानास सहन करण्याची क्षमता असणारा असणे गरजेचे असेल कारण तेथूनच फायटर विमाने टेक ऑफ घेतील तसेच लॅन्डही करतील.

 

जपान सरकारचा सध्याचा दृष्टिकोन असा आहे की घटनेनुसार जपानला आक्रमण करणारी विमानवाहू नौका आपल्या नौदलात ठेवणे शक्य नाही. त्यामुळेच देशाच्या नागरिकांना हा विश्वास वाटणे गरजेचे आहे जरी ही नौका जपानच्या नौदलात असली तरीही ती देशाच्या केवळ 'स्वसंरक्षणार्थ' असलेल्या धोरणांना अनुसरूनच कार्यरत असेल.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: thejapantimes

Japan eyes introduction of multipurpose aircraft ‘mother ship’