भारताने उभारला चीन सीमेजवळ पूल- पंतप्रधान मोदींकडून झाले उद्घाटन.
         Date: 27-Dec-2018

भारताने उभारला चीन सीमेजवळ पूल- पंतप्रधान मोदींकडून झाले उद्घाटन.

 

भारताने ब्रह्मपुत्रा नदीवर रेल्वे-रस्ता पूल उभारला आहे. होय, या पुलावरून रेल्वे आणि वाहने एकाच वेळी धावू शकतात. या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

 

१९९७ साली माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कारकिर्दीत याची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि याचे बांधकाम मात्र दिवंगत पंतप्रधान अटलजी यांच्या कारकिर्दीत २००२ साली सुरु झाले. वाजपेयींनी याच्या बांधकामाला सुरुवात केली.

 

 

 

आसामच्या दिब्रुगढमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर असलेला हा पूल धेमाजी जिल्ह्याला जोडतो. नदीवरील पुलांमध्ये या पुलाचा चौथा क्रमांक लागतो. ४.९४ किमी लांब असलेला हा बोगीबील पूल देशातील सर्वात लांब असा रेल्वे आणि वाहने एकाच वेळी धावू शकणारा डबलडेकर पूल आहे. हा पूल तीनपदरी आहे. तसेच दुहेरी रेल्वेमार्ग असलेला हा पूल आशियातील दुसरा सर्वात मोठा पूल आहे. या पुलामुळे प्रवासाचा खूप वेळ वाचणार आहे. दिब्रुगढवरून अरुणाचलला जाण्यासाठी गुवाहाटीवरून ५०० किमी चा प्रवास करून जावे लागत असे. आता हे अंतर खूप कमी झाले आहे. या पुलावरुन १०० किमी च्या वेगाने रेल्वे गाड्या धावू शकणार आहेत. तब्बल दहा तासांचे अंतर यामुळे वाचणार आहे. हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने तयार होण्यासाठी जवळजवळ दोन दशके लागली असून हा पूल बनविण्यासाठी ५,८०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
 

हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एचसीसी) ने या पुलाचे बांधकाम हाती घेतले. प्रोजेक्ट डायरेक्टर आर.व्ही.आर. किशोर यांनी या पुलाची माहिती देताना सांगितले," आम्ही पुलाचे बांधकाम मजबूत व्हावे यासाठी पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञान वापरले असून उत्तम दर्जाचे तांबे यात वापरले आहे. हा पूल ४२ खांबांवर उभा आहे. बोगीबील पूल भूकंपाच्या झोन-व्ही मध्ये येतो. सात रिश्टर स्केल पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपाचा धोका असलेला भाग या झोन-व्ही मध्ये मोडतो. त्यामुळे या पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही यात भूकंपविरोधी तंत्र वापरले आहे." ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणारा हा पूल इंजिनीअरिंगचा उत्कृष्ट नमुना आहे.

 

भारत-चीन सीमेजवळ असल्यामुळे या पुलाचे सामरिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. अरुणाचल प्रदेशात चीनकडून अनेकवेळा घुसखोरी केली जाते. त्यामुळे येथे भारतीय सैनिकांना कायमच तैनात रहावे लागते. लष्कराचे रणगाडे सहजपणे जाऊ शकतील अश्याप्रकारे याची रचना केली गेली आहे. ६० टन वजनाचे रणगाडे वाहून नेण्याची क्षमता या पुलाची आहे. त्यामुळे लढाऊ विमाने सुद्धा येथून वाहून नेली जाऊ शकतात. घुसखोरी झाल्यास अथवा चीनने काही आगळीक काढल्यास इटानगरहून (अरुणाचल प्रदेशची राजधानी) सीमेवरील जवानांना युद्धसामुग्री पटकन पोचवता येणार आहे. या पुलामुळे दिब्रुगढ ते अरुणाचल प्रदेशमधील रेल्वे प्रवास ७५० किमी नी कमी होणार आहे. म्हणजेच आपल्या लष्कराला कमी वेळात मदत पोहोचू शकणार आहे.

 

बोगीबील पूल बांधला जावा हे वाजपेयीजींचे स्वप्न होते. त्यांनी भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांचे स्वप्न पूर्ण झालेले पाहताना आज मला खूप आनंद होतो आहे असे मनोगत या पुलाच्या उद्घाटन प्रसंगी मोदींनी व्यक्त केले.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Content Generation)