अफगाणिस्तानशी शांती वार्ता करण्यासाठी मदत करण्याचे ट्रम्प यांनी पाठविले इम्रान खान याना पत्र
         Date: 04-Dec-2018
 अफगाणिस्तानशी शांती वार्ता करण्यासाठी मदत करण्याचे ट्रम्प यांनी पाठविले इम्रान खान याना पत्र.

अफगाण तालिबानच्या दहशतवाद्यांशी शांती वार्ता करण्यासाठी मदत आणि सहकार्य करण्याची विनंती ट्रम्प सरकारने पत्राद्वारे केली असल्याची माहिती इम्रान खान यांनी दिली आहे.

 

या गोष्टीची खातरजमा परराष्ट्र आणि माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी केली. बंडखोरांना चर्चेस प्रवृत्त करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत लागेल. अफगाण प्रश्न सोडविण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत महत्त्वाची वाटते असे ट्रम्प यांनी खान याना पत्राद्वारे कळविले असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

 

 

ऑगस्ट मध्ये पंतप्रधान झालेल्या खान यांच्याशी प्रथमच ट्रम्प यांनी पत्राद्वारे संपर्क केला असावा असे एका ऑफिसर ने म्हटले. ट्रम्प यांच्या पत्राबाबत बोलताना या ऑफिसर ने सांगितले की या पात्राबाबत अजून तरी अधिकृतरीत्या काही सांगितले गेले नाही. दोन आठवड्यापूर्वीच ट्रम्प यांच्या पाकिस्तान बाबत च्या ट्विट वरून अप्रत्यक्षरीत्या खान आणि ट्रम्प यांच्यामध्ये ट्विटर वर बाचाबाची झाली होती. पाकिस्तान आमच्याकडून पैसे तेवढे घेतो पण आमच्यासाठी काहीच करीत नाही या कारणास्तव आम्ही त्यांना देऊ केलेली मदत स्थगित केली आहे असे ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला सांगितले. त्यांच्या या विधानावर खान यांनी टीका ही केली होती.

 

अफगाण प्रश्नावर पाकिस्तानशी बोलणी करण्यासाठी अफगाण शांती वार्तेसाठी म्हणून खास नेमलेले राजदूत झालमय खालिलजाद मंगळवार पर्यंत पाकिस्तानमध्ये पोहोचणे अपेक्षित होते. खालिलजाद यांच्या या पूर्वीच्या भेटी जरी चांगल्या झाल्या असल्या तरी त्यातून ठोस असे काहीच निष्पन्न झाले नाही.

 

१७ वर्षानंतर शांती वार्ता पुढे जाण्यासाठी आणि संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी ट्रम्प प्रशासन उत्सुक आहे.गेल्या काही महिन्यात खालिलजाद अनेक तालिबान नेत्यांना आणि पुढाऱ्यांना भेटले आहेत परंतु त्यांना त्यात काहीच यश आले नाही. कुठल्याही परिस्थितीत परदेशी लष्कराने आमचा देश सोडून जावा यावरच विद्रोही अडून बसले आहेत. तसेच ते फक्त यू.एस.च्या अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करतील असा त्यांचा आग्रह आहे.

 

गेल्या काही महिन्यात ट्रम्प यांनी पाकिस्तानवर खूप टीका केली आहे. त्यातील काही टीकेला तर उपरोधाची धार होती. तालिबानी दहशतवाद्यांचा जे हक्कानी नेटवर्क या नावाने ओळखले जाते त्यांचा बंदोबस्त करण्यात पाकिस्तान अपयशी ठरले असल्याचे कारण देऊन गेल्यावर्षी त्यांनी पाकिस्तानला देऊ केलेली लष्करी मदतही थांबविली. पाकिस्तान अफगाणी बॉर्डरवर या विद्रोह्यांना आश्रय देत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.

 

आपल्या अलीकडील ट्विट मध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की ," अमेरिकेने आतापर्यंत पाकिस्तानला शेकडो डॉलर्सची मदत करूनही पाकिस्तानने त्यांच्या लष्करी तळाजवळच आश्रय घेतलेल्या अल-कायदाचा लीडर ओसामा बिन लादेन याचा ठावठिकाणा अमेरिकेला लागू दिला नाही. २०११ मध्ये अमेरिकेकडून तो मारला गेला."

 

यावर रागावलेल्या खान यांनी ट्विट केले की ट्रम्प यांनी आमची उगीचच निंदा चालविली आहे. त्यांनी सांगितले की दहशतवादविरोधी युद्धात त्यांच्या देशातील ७५,००० हून अधिक जण ठार झाले आहेत. आम्ही अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी मोहिमेला सहकार्यच करू इच्छितो.

 

परंतु सोमवारी आलेल्या पत्रामध्ये ट्रम्प यांचा सूर बदललेला आहे. अफगाण युद्ध थांबविण्यासाठी पाकिस्तानची नितांत गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने या गोष्टीचे स्वागतच केले आहे. हे युद्ध पाकिस्तान आणि अमेरिका यांनी मिळून लढले तरच यशस्वी होईल असे आता अमेरिकेला वाटू लागले आहे. पाकिस्तान तर या नवीन पार्टनरशिप बद्दल खूप आशावादी आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: The Washington Post
 

Trump sends letter to Pakistan asking for help with Afghan peace process