आयएनएस अरिहंत च्या साथीने भारताचे आण्विक त्रिकूट पूर्ण - नौसेना प्रमुख
         Date: 05-Dec-2018

आयएनएस अरिहंत च्या साथीने भारताचे आण्विक त्रिकूट पूर्ण - नौसेना प्रमुख.

 

पहिलीच पाणबुडी आयएनएस अरिहंतसह भारताने तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे आण्विक त्रिकूट पूर्ण केले असल्याची माहिती नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी दिली. आयएनएस अरिहंतचा नौदलामध्ये समावेश होणे हा २०१८ सालातील नौदलाच्या यशामधला मानाचा तुरा आहे. आणि यामुळे भारताच्या आण्विक क्षमतेमध्ये वाढ झाली आहे.

 
 

नौदल सध्या ५६ युद्धनौका आणि पाणबुड्यांचा समावेश आपल्या ताफ्यात करण्याची योजना आखत असल्याचे नौदल दिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलताना त्यांनी सांगितले. तसेच नौदलाच्या ताफ्यामध्ये विमानवाहू नौकांचा समावेश होण्याची प्रक्रिया सुरु आहे. ३२ युद्धनौकांची बांधणी सुरु झाली असून यामुळे आपले नौदल लवकरच सक्षम होईल असेही ते म्हणाले.

 

आयएनएस विक्रांतच्या बांधणीचे काम तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात येऊन पोचले असून लवकरच ते नौदलाच्या सेवेत रुजू होईल. फॉरेन मिलिटरी सेल्स (एफएमएस) कार्यक्रमांतर्गत नवीन लाइट युटिलिटी हेलीकॉप्टर आणि २४ मल्टी-रोल हेलिकॉप्टर्सची खरेदी केली जाईल आणि दीर्घकाळ असलेली नाविक हेलिकॉप्टरची कमतरताही लवकरच संपुष्टात येईल असे नौदल प्रमुखांनी आश्वासन दिले.

 

आगामी काही महिन्यांत एलपीडी, फ्लीट सपोर्ट वेस्सेल्स आणि एमएसएमई कॉन्ट्रॅक्ट्सला मूर्त रूप येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

भारताकडे हिंद महासागर हे एकमेव सागरी क्षेत्र असूनही चीनच्या तुलनेत आम्ही हिंद महासागरात नक्कीच सक्षम आहोत. लाम्बा म्हणाले की चीनला मागे टाकून लवकरच भारत जागतिक दर्जाचे नौदल बनेल. पाकिस्तानच्या नौदलापेक्षा भारतीय नौदल कैक पटीने पुढे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

भारतीय नौदलाचा विचार करता आपल्याला दोन सागरी किनारे नाहीत. आपल्याला हिंद महासागर हा एकच सागरी किनारा लाभला आहे. दोन आघाड्यांवर लढण्याविषयी बोलताना ते म्हणाले की हिंद महासागरात आपण ताकदवान आहोत.

 

हिंद महासागरावर आपली पकड मजबूत करण्यासाठी नौसैनिक कवायतींची खूप गरज आहे.

 

२६/११ च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या जवळपास १६४ लोकांची आणि जखमी झालेल्या अनेकांची आठवण करून देऊन ते म्हणाले की आता परिस्थिती सुधारली आहे. आणि सागरी हल्ल्यांना सामोरे जाण्यास आपले नौदल सक्षम आहे. आम्हाला वेळोवेळी घटनेची माहिती मिळते. आमचे गुप्तहेरखाते जागरूक आहे. तसेच आम्ही आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहोत.

 

चीनचे सागरी मार्गांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न पाहता हिंद महासागरात त्याला अजिबात पाय रोवू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. चीनने केलेले साऊथ चायना सी चे सैनिकीकरण आणि वर्चस्व तसेच व्हिएतनाम आणि फिलिपिन्ससारख्या देशांचे चीनने केलेली स्थिती बघता आपली परिस्थिती अशी होऊ नये म्हणून आपण सागरी मार्गावर सक्षम असणे गरजेचे आहे.

 

चीनचे पाकिस्तानातील ग्वादार बंदरात लक्ष घालणे हा त्यांचा हिंद महासागरात हातपाय पसरण्याचा डाव आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी आणि आपली हिंद महासागरावरील पकड घट्ट करण्यासाठीच आपले नौदल संपूर्णपणे सुसज्ज करीत असल्याचे त्यांनी संगीतले.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: INDIA TODAY

India has completed nuclear triad with INS Arihant Submarine, says Navy chief