२०१९ मध्ये चीनच्या लष्करापुढील पहिले लक्ष्य- युद्धासाठी केव्हाही सज्ज रहाणे.
         Date: 04-Jan-2019

२०१९ मध्ये चीनच्या लष्करापुढील पहिले लक्ष्य- युद्धासाठी केव्हाही सज्ज रहाणे.

 

येणाऱ्या नवीन वर्षात युध्द प्रशिक्षणावर जोर देणे आणि युद्धासाठी संपूर्ण तयारीनिशी सज्ज रहाणे या दोन गोष्टींना प्राधान्य देणे हे उद्धिष्ट चीन लष्करापुढे असेल असे एका अधिकृत वृत्तपत्राने म्हटले आहे.

 

पीएलए डेलीने आपल्या नवीन वर्षाच्या संपादकीय अहवालात म्हटले आहे की," सैनिकांच्या कवायती आणि युद्धसज्जता आणि आमच्या लष्करावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष देणे हे आमचे मूलभूत कर्तव्य आहे. कोणत्याही परिस्थितीत आमच्या कर्तव्यात कोणत्याही प्रकारची ढिलाई झालेली आम्ही खपवून घेणार नाही. लष्कराच्या सर्व सोयीसुविधा आणि गरजा तसेच आपत्कालीन परिस्थितीत कसे वागायचे याचे प्रशिक्षण यात आम्हाला सुधारणा केली पाहिजे. जेणेकरून आमच्यावर तशीपरिस्थिती ओढवेल तेव्हा आम्ही त्यास तोंड देण्यास समर्थ राहू आणि आलेल्या परिस्थितीवर संपूर्ण तयारीनिशी मात करू. आपले सैन्य विकसित करण्यासाठी संपूर्ण नियोजन आणि अंमलबजावणीद्वारे हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातील. नवीन कल्पनांचे स्वागत होईल आणि त्यांना उत्तेजन देण्यात येईल. पीएलए पक्षाच्या पुनर्बांधणी आणि एकीकडे सुद्धा या वर्षी लक्ष दिले जाईल."

 

 
 

२०१२ मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर शी जिनपिंग यांनी पीएलए ला प्रोत्साहनच दिले आहे. वेळोवेळी केले जाणारे युद्धसराव हे पीएलए किती सामर्थ्यवान आहे हे दाखवून देण्यासाठीच केले गेले असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. परंतु वर्षाच्या सुरुवातीलाच लष्करी सामर्थ्य वाढविण्याला प्राधान्य देतोय असे म्हणणे म्हणजे २०१९ मध्ये काहीतरी महत्त्वाचे होणार असल्याचे सूचित करणे असावे असेही मत निरीक्षकांनी नोंदविले.

 

"माझ्या आयुष्याची २० वर्षे मी पीएलएमध्ये घालविली आहेत. लष्करी प्रशिक्षण आणि सदैव युद्धसज्ज रहाणे याला आम्ही नेहमीच प्राधान्य देत आलो आहोत. पण वर्षाच्या सुरुवातीलाच युध्द प्रशिक्षण आणि युद्धसज्जता याची घोषणा करणे हे काहीतरी खासच आहे. याचा अर्थ काहीतरी नक्कीच शिजतेय आणि ते काय आहे ते आम्हाला ठाऊक नाही," असे पीएलए मधून २००४ साली निवृत्ती घेतलेल्या निवृत्त लेफ्टनंट आणि लष्करी विश्लेषक असलेल्या झिंग झिनपिंग याने सांगितले.

 

पीएलए ची लष्करी ताकद दाखविण्यासाठीच हे सर्व चालले आहे असे तैवानचे माजी उप-संरक्षण मंत्री लिन चोंग-पिन म्हणाले. "लष्करी प्रशिक्षण आणि युद्धासाठी सज्ज रहाणे या गोष्टी पीएलए गेल्या चार दशकांपासून करीत आहे. आमची संरक्षण सिद्धता वाढविण्याच्या दृष्टीने हे आवश्यक आहे. असे असूनही गेल्या चार दशकांपासून आम्ही कोणत्याच देशाशी युद्ध केलेले नाही. जेव्हा अमेरिकेने चीनवर दबाव आणायला सुरुवात केली तेव्हापासून याची सुरुवात झाली. पण मी खात्रीने सांगू शकतो की पीएलए कोणतेही युध्द करणार नाही. मग तो दक्षिण चीन समुद्र असो वा तैवानची सामुद्रधुनी असो." लिन म्हणाले.

 

दरम्यान, स्थानिक मीडिया आणि चिनी सैनिकी निरीक्षकांच्या मते, डिसेंबरच्या अखेरीस, कमीतकमी ३८ वरिष्ठ कर्नल्सना मेजर जनरल म्हणून पदोन्नती देण्यात आली. "या सर्व लोकांची निवड स्वतः अध्यक्ष शी जिनपिंग यांनी केली आहे. यांच्या निवडीमध्ये 'शी' नी जातीने लक्ष घातले आहे. त्यांना स्वतःचे लष्कर उभे करायचे आहेकिंवा असे म्हणूया 'शी फोर्स' तयार करायचे आहे." लिन यांनी माहिती दिली.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media monitoring Desk)

Source: South China Morning post

China’s military priorities for 2019: boost training and prepare for war.