काश्मिरी फुटीरतावादी आणि पाकिस्तानी अतिरेकी संघटनांच्या बदलत्या भूमिका- भारत सरकारच्या आक्रमक रणनीतीचे फलित?
         Date: 08-Jul-2019

काश्मिरी फुटीरतावादी आणि पाकिस्तानी अतिरेकी संघटनांच्या बदलत्या भूमिका- भारत सरकारच्या आक्रमक रणनीतीचे फलित?

 

१९८९ मध्ये दहशतवादी कृत्यांमुळे जीवाच्या भीतीने हजारोंच्या संख्येने काश्मिरी पंडित काश्मीर सोडून इतरत्र गेले होते. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये झालेल्या अचानक बदलामुळे हुर्रियत या फुटीरतावादी गटाचे नेते मिरवाईझ उमर फारूक यांनी आपल्या पॉलिसीमध्ये बदल घडवून आणला आहे. त्यांनी आता काश्मिरी पंडितांना परत त्यांच्या जन्मक्षेत्री बोलावण्यात पुढाकार घेतला आहे.

 

फारूक यांनी शुक्रवारी हुर्रियत कॉन्फरन्स आणि काश्मिरी सिव्हिल सोसायटीची एक समिती या स्थलांतरित पंडितांना पुन्हा आणण्यासाठी स्थापन करण्यात येत असून या कामी काश्मीर खोऱ्यात  अजूनही रहात असलेल्या पंडितांनी सोडून गेलेल्या पंडितांशी बोलणी करावी असे आवाहन केले आहे.

 

गेल्या ३0 वर्षात फक्त आणि फक्त काश्मिरी पंडितांना काश्मीर मधून हुसकावून लावण्यात येत होते. त्यांची घरे, मालमत्ता हिसकावून घेतली जात होती. त्यांना धर्मांतरणास भाग पाडले जात होते. जे धर्मांतरणास सुद्धा तयार झाले नाहीत आणि काश्मीर सोडून जाण्यासही तयार झाले नाहीत त्याचा संहार करण्यात आला होता. त्यांच्या बायकांवर अत्याचार करण्यात आले. अनेक हिंदू मुलींना मुस्लिम युवकांशी निकाह करण्यास बळजबरी केली गेली. जीवाच्या आणि अब्रुच्या भीतीने हजारो पंडित काश्मीर सोडून भारतात इतरत्र ठिकाणी परागंदा झाले.

 

अशी परिस्थिती असताना असं नेमकं काय घडलं की काश्मिरातील उग्रवादी गट हुर्रियत या पंडितांना परत बोलावण्यात उत्सुकता दाखवतोय?

 

 

तर... भारत सरकारचं काश्मीर बाबत आणि देशाबाबतचं बदललेलं धोरण. भारत सरकारने नोटबंदी करून या फुटीरतावाद्यांना पहिला तडाखा दिला. त्यांना दहशतवाद्यांकडून काश्मीर खोऱ्यात दहशत पसरविण्यासाठी मिळणारा पैशाचा ओघ यामुळे अचानक कमी झाला. पैसा नसेल तर कशाच्या जोरावर हे उड्या मारणार? सगळ्याच नाड्या आवळल्या गेल्या.

 

यापूर्वी सीमेपलीकडून कोणताही दहशतवादी हल्ला झाला तरी निषेध व्यक्त करण्यापलीकडे भारत सरकार काहीही करीत नव्हते. परंतु नवीन आलेल्या सरकारने मात्र जशास तसे वागण्यास सुरुवात केली. पुलवामाच्या भ्याड हल्ल्याला बालाकोट च्या रूपाने कायमची अद्दल घडविली.

 

बालाकोटच्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे तळ उध्वस्त केल्याने सगळ्या फुटीरतावाद्यांचे कंबरडे साफ मोडले आहे. त्यांना देशाबाहेरून मिळणारी मदत आता थंडावली आहे. बालाकोटमुळे भारत पाकिस्तानात घुसून कधीही आणि काहीही करू शकतो याची भीती आता पाकिस्तानला असल्याने त्यांनी आपले दहशतवादी तळ पाकिस्तानातून हलवायला सुरुवात केली आहे असे आपल्या गुप्तचर संघटनेने म्हटले. तसेच एफएटीएफ च्या यादीत पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट होण्यापासून वाचविण्यासाठी हे तळ अफगाणिस्तानात हलविल्याचेही आपल्या सुरक्षा एजन्सीने सांगितले.

 

यामुळेच आता हुर्रियतला काश्मीरमधील शांतता दिसू लागली आहे. या सरकारने जर लोकांची मने जिंकली तर हातात आहे ते पण जाईल हे त्यांना कळून चुकले आहे. त्यात मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर उरली सुरली शक्यताही नाहीशी होईल आणि आपल्या हाती काही उरणार नाही या भीतीने काश्मीर मध्ये टिकून राहण्यासाठी त्यांचे हे सगळे प्रयत्न चालले आहेत.

 

काश्मिरी पंडितांना पुन्हा बोलावून घेणे, त्यांच्या सोबत काम करण्यास तयार असल्याचे सांगणे हे सर्व काश्मिरी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी चालले आहे. आता ३० वर्षानंतर परस्परसंवाद  साधण्यासाठी फारूक उत्सुक आहेत.

 

फारूक यांच्या या प्रस्तावाला पंडितांच्या शिष्टमंडळाचे नेते सतीश महालदार यांनी पुष्टी दिली. ते म्हणाले, " या संबंधी स्थापन करण्यात येणाऱ्या कमिटीमध्ये आम्ही नक्कीच असू. मिरवाईझ हा काश्मिरी जनतेचा नेता आहे. आणि आम्ही काश्मीरचे शरीर आणि आत्मा आहोत. आम्ही सर्व जण एकत्र येऊन काश्मीरच्या शांततेसाठी आणि काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्यासाठी लढू."

 

मिरवाईझ यांनी नव्वदच्या दशकात जे घडले त्यासंबंधी खेद व्यक्त केला. कोणतेही कारण असो पण   जे होतंय ते काश्मिरी पंडितांच्या दृष्टीने चांगलं होतंय. नवीन सरकारच्या धोरणामुळे देशाच्या आतले आणि देशाच्या बाहेरचे याना चांगलाच धडा मिळतोय. 

 

काश्मिरी फुटीरतावाद्यांची भूमिका खरंच बदलली आहे की नाही हे काळच ठरवेल पण नव्या गृहमंत्र्यांच्या भीतीने का होईना त्यांना आपण सर्वसमावेशक आणि मवाळ आहोत असं नाटक करावं लागतंय हेही काही कमी नाही.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Content generation)