रोहिंग्या - नवीन संकट
         Date: 02-Aug-2019

रोहिंग्या - नवीन संकट

 

म्यानमार मध्ये मुस्लिम दहशतवादी गट कमी प्रमाणात आहेत आणि जे आहेत ते अगदीच दुबळे आणि कसलेही नियोजन नसलेले असे आहेत. त्यातील काहींचे थोड्याप्रमाणात दक्षिण आशियातील मुस्लिम गटांशी संबंध होते. पण या संबंधांमुळे त्यांना कोणताही फायदा झाला नाही.

 

म्यानमार मधील बहुतेक सर्वच रोहिंग्या सेंट्रल आणि राखीने राज्य सरकारच्या नजरेत येण्याचे टाळतात. ते आपला चेहरा लपवून जातात जेणेकरून स्थानिक बौद्ध लोक सुद्धा त्यांना ओळखणार नाहीत. आपला जीव वाचविणे हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे. या प्रदेशातून हाकलले जाण्याची भीती त्यांच्या मनात सतत आहे.

 

२०१२ मध्ये राखीने प्रांतात सांप्रदायिक हिंसाचाराचा उद्रेक झाल्यामुळे तिथे अरकान रोहिंग्या साल्व्हेशन आर्मी (एआरएसए) उदयास आली. या आर्मीने २०१६-२०१७ मध्ये म्यानमारच्या सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्यामुळे आणि त्यानंतर तब्बल ७,५०,०००  पेक्षा जास्त लोकांनी आपला देश सामूहिकरित्या सोडून बांगलादेशात  केलेल्या प्रस्थानाच्या नाट्यामुळे म्यानमार जगाच्या नजरेत आले.

 

या दोन्ही घटना तीन प्रश्न उपस्थित करतात.

 

१. म्यानमार बाहेरील किंवा म्यानमार मध्ये असलेले रोहिंग्या त्यांना मिळत असलेल्या वागणुकीमुळे कट्टरपंथी बनून दहशतवादाकडे वळण्याची शक्यता आहे का?

 

२. दहशतवादी कृत्ये करण्यासाठी आंतरराष्ट्रीय इस्लामी गट रोहिंग्या आणि त्यांचे समर्थक यांचा वापर करून घेत आहेत का?

 

३. त्या प्रदेशातील आणि प्रदेशाबाहेरील इस्लामिक गट रोहिंग्यांच्या प्रश्नावर बाजू घेत असल्याचे दाखवून आपला दहशतवादाचा हेतू साध्य करून घेतील का? त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेतील का?

 

अनेक घटनांच्या एकत्रित परिणामस्वरूप दहशतवादी कृत्ये घडतात. हिंसेचा उद्रेक हा अनेक छोट्या मोठ्या घटनांचा परिपाक असतो. यातील मुख्य घटक म्हणजे राजकीय जहाल पक्ष. जे अश्या गोष्टींना खतपाणी घालत असतात.

 

२०१६ पूर्वी रोहिंग्यांना अतिशय कठोर वागणूक दिली गेली. त्यांना म्यानमार मधून हद्दपार केले गेल्यामुळे यूएनने या घटनेला निर्वंशीकरण आणि जेनोसाईड असे म्हटले आहे.

मोठ्या प्रमाणात बांग्लादेशात आश्रय घेतलेल्या रोहिंग्याच्या रूपाने कट्टरतावाद्यांना जणू आयते कुरणच मिळाल्यासारखे झाले. २०१६ पूर्वी बांग्लादेशात ज्या रोहिंग्यांची संख्या २,५०,००० एवढी होती तीच आता दहा लाखांवर गेली आहे. या लोकांच्या छावण्या बेकायदा आणि अतिशय गलिच्छ असून संपूर्णपणे विदेशी मदतीवर चालतात. म्यानमार आणि बांग्लादेश यांच्यामध्ये यांना स्वदेशी पाठविण्याविषयी चर्चा होत असली तरी त्यांना एवढ्यात मायदेशी परत पाठविण्याची शक्यता नाही.

 

या निर्वासितांचे, जास्तकरून त्यातील स्त्रिया आणि बालकांची जगण्यासाठी रोज नवीन धडपड चालूच आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय हिंसाचाराच्या कोणत्याही चळवळीत भाग घेण्याची त्यांची परिस्थिती नाही. जहालमतवादी बनणारे यातले अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके असतील.

 

इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुप (आयसीजी) ने म्हटले आहे की  एआरएसएची स्थापना इस्लामिस्ट म्हणून झालेली नाही. उलट "जगातील कोणत्याही दहशतवादी गटाशी त्याचा संबंध नाहीहे सिद्ध करण्याचा त्रास तिला होतोय. बाहेरील म्हणजेच आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांशी संबंध असल्याप्रकरणी एआरएसए कायमच संशयाच्या घेऱ्यात राहिली आहे. अनेक निरीक्षकांनी एआरएसए आणि अन्य दहशतवादी गट यांच्यात असलेल्या संबंधांचा परिस्थितीजन्य पुरावा दिला आहे. आणि या दहशतवादी गटांमध्ये इसिस आणि अल कायदा यांचा समावेश आहे.

 

२०१६ पूर्वी रोहिंग्यांचे दहशतवादी गटांशी अगदी किरकोळ संबंध असले तरी आता ते वाढण्याची शक्यता जास्त आहे. रोहिंग्यांचा उपयोग हे कट्टरपंथीय दहशतवादी कारवायांसाठी करून घेण्याची भीती वाढली आहे.  तसेच, दक्षिण आणि आग्नेय आशियातील मुस्लिम समुदाय म्यानमारमधील त्यांच्या सह-धर्मियांना दिलेल्या वागणुकीमुळे संतापले आहेत

 

म्यानमार आणि बांगलादेशातील भीषण परिस्थितीने आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांचे लक्ष वेधून घेतले आहे. आणि त्यामुळेच मलेशियाच्या माजी पंतप्रधानांनी संपूर्ण देशाची सुरक्षितता धोक्यात असल्याचा इशारा दिला आहे. गेल्या महिन्यात सिंगारपूरमध्ये आँग सॅन सू की यांनी रोहिंग्यांकडे निर्देश करून हा "दहशतवाद" आता म्यानमारच्या पलीकडे जाऊन पोचला असल्याचा इशारा केला.

 

२०१६ पूर्वी रोहिंग्यांच्या दुर्दशेविषयी इस्लामी दहशतवादी गटांना कसलाही कळवळा नव्हता. पण या दोन वर्षात घडलेल्या नाट्यमय परिस्थितीमुळे आणि निर्वासितांना दिल्या गेलेल्या प्रसिद्धीमुळे या गटांचे लक्ष रोहिंग्यांकडे वळले आहे. फिलिपाइन्समध्ये जसे नवीन इस्लामी दहशतवाद्यांना द्वार खुले व्हावे  म्हणून परदेशी बंडखोर घुसले तशीच परिस्थिती येथे ओढवू शकते.

 

इसिस आणि अल कायदाबरोबरच दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियाई अतिरेकी गट कोणत्या ना कोणत्या मार्गाने रोहिंग्यांशी जोडले गेले आहेत. उदाहरणार्थ, शेकडो जिहादी म्यानमारमधील दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण घेत आहेत किंवा बांगलादेशात जाण्यासाठी तयार आहेत असे वृत्त मीडियाने दिले आहे. हे वृत्त खरे आहे की नाही हे अजून स्पष्ट झाले नसले तरी रोहिंग्यांच्या वतीने दहशतवादी गटांच्या कारवाया वाढल्या आहेत याकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे.

 

रोहिंग्या संकट म्यानमारसाठी गेम चेंजरआहे असे आयसीजी ला वाटते. २०१६-२०१७ मधील राखीने मधील हिंसाचार हा यापूर्वी कुणीच पाहिला नव्हता. यामुळे या प्रांताचे धोरणात्मक वातावरण बदलले आहे.

 

रोहिंग्या प्रश्न जर संवेदनशीलतेने हाताळला गेला नाही तर दहशतवाद वाढणे हे अपरिहार्य आहे. हा प्रश्न तडीस नेण्यासाठी तो व्यावहारिकतेने सुद्धा हाताळावा लागणार आहे. संवेदनशीलता आणि व्यावहारिकता यांचा योग्य तो मेळ साधून बांगलादेशातील या निर्वासित रोहिंग्यांना आशेचा किरण वाटेल असे काहीतरी करणे गरजेचे आहे. अर्थात अशा उपाययोजनांमुळे भविष्यातील दहशतवादी हल्ल्यांचा धोका कमी होणार नाही, परंतु त्यात लक्षणीय घट होऊ शकेल. दुर्दैवाने असे काही घडण्याची चिन्हे नाहीत. लाखो रोहिंग्यांचे भविष्य अनिश्चित काळासाठी बांगलादेशाशी जोडले गेले आहे. आता त्यांच्या नशिबात शोषण, दहशतवाद, कट्टरपंथीय लोकांची मुजोरी, पिळवणूक, छळवाद हेच आहे.

 

अँड्र्यू सेल्थ यांच्या लेखाचा मुक्त अनुवाद.

 

-प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Media Monitoring Desk)

 

source: theinterpreter

 

The Rohingyas: a new terrorist threat?