गलवानला १५ जूनला नेमकं काय घडलं?
         Date: 24-Jun-2020

गलवानला १५ जूनला नेमकं काय घडलं?

 

गलवान येथे काय घडले याविषयी अनेकांनी आतापर्यंत खूप काही लिहिले आहे. परंतु त्यातून हाती ठोस असे काही न लागता अनेक विरोधाभासी कथांची सरमिसळ आपल्या मेंदूत होतेय. अनेकांनी केवळ अटकळ बांधलीय तर अनेकांनी स्वतःची मते आपल्यावर थोपवली आहेत. त्यामुळे कित्येक प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत. यु ट्यूब मुलाखती, इंडिया टुडे टीव्ही, अनेक वर्तमानपत्रे, गलवान व्हॅली आणि थांगत्से येथील आर्मी ऑफिसर्स यांच्याशी बातचीत केल्यानंतर मुद्देसूद घटना मांडण्याचा हा प्रयत्न.

 

जसं की आपल्याला माहित आहे की ही घटना घडण्याच्या दहा दिवस अगोदरच पेट्रोलिंग पॉईंट १४ विषयी दोन्ही बाजूनी लेफ्टनंट जनरल-लेव्हल वर चर्चा झाली होती. आणि या चर्चेनंतर दोन्ही बाजू एलएसीजवळ ठाण मांडून बसल्या होत्या.

 

चीनने गलवान नदीच्या शिखरावर जी निरीक्षण पोस्ट उभारली होती ती खरंतर भारताच्या बाजूच्या एलएसीमध्ये होती हे चर्चेदरम्यान सिद्ध झाले. आणि ती हटविण्यासाठीचा करार करण्यात आला आणि चिन्यांनी ती हटवली. या भागात नियंत्रण ठेवणाऱ्या बिहार १६ या बिहार इन्फंट्री बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी संतोष बाबू यांनी चिन्यांनी पोस्ट हटविल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या चिनी काउंटर पार्टशी चर्चा सुद्धा केली.

 

पण १४ जून रोजी एका रात्रीत चिन्यांनी पुन्हा आपल्या हद्दीत त्यांची नियंत्रण पोस्ट उभारली.

 


galwan valley dispute_1&n

 

हे लक्षात आल्यावर १५ जूनला संध्याकाळी पाच वाजता कर्नल बाबू यांनी स्वतः तिथे जाऊन पाहणी करण्याचे ठरवले. चिन्यांची काहीतरी गल्लत होऊन त्यांनी चुकून येथे पोस्ट उभी केली असावी असे कर्नल बाबू याना वाटले. बटालियनमधील इतर सैनिक ती पोस्ट आपणच उध्वस्त करू असे म्हणत असतानाही त्यांना थोडे सबुरीने घेऊया असे म्हणून कर्नल बाबू तेथील परिस्थितीची पाहणी करण्यास निघाले. कर्नल बाबू यांनी पूर्वी या भागात कंपनी कमांडर म्हणून काम केले होते. ते अतिशय शांत, संयमी आणि थंड डोक्याचे म्हणून ओळखले जातात.

 

सर्वसाधारणपणे तपासणीसाठी कंपनी कमांडर (मेजर रँक) ला पाठविले जाते. परंतु यावेळी हे काम  युनिटमधील 'यंगस्टर्स' वर न सोडण्याचा निर्णय कर्नल बाबूंनी घेतला. कारण याठिकाणी आततायीपणा चालणार नव्हता. परिस्थिती शांतपणे हाताळणे गरजेचे होते. आणि या दुर्गम भागात तैनात केलेल्या सैन्यामध्ये दोन्ही बाजूनी खेळीमेळीचे वातावरण होते.

 

संध्याकाळी ७ वाजता कर्नल बाबू ३५ जणांची टीम घेऊन चिन्यांनी उभारलेल्या पोस्टकडे केवळ चौकशीकरिता म्हणून निघाले होते. जेव्हा ते पोस्टजवळ पोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तेथे उपस्थित असलेले सैनिक नेहमीचे नाहीयेत. तसेच पीएलएचे नेहमीचे सैनिकही ते वाटत नव्हते. पीएलए एरवी ज्या सैनिकांना अश्या पोस्ट करीता तैनात करते त्यापैकी हे वाटत नव्हते. आपल्या सैनिकांसाठी ही नक्कीच आश्चर्याची बाब होती. मे च्या मध्यात तिबेटमध्ये तैनात केलेल्या सैन्यापैकी हे सैनिक होते असे नंतर निदर्शनास आले.

 

पीएलएचे नवीन सैन्य येणार असल्याची बातमी भारतीय सैन्याला मिळाली होती. पण हे सैन्य एलएसीच्या  आतील भागात असेल असे सांगण्यात आले होते. भारतीय सैन्याला पाहताच या नवीन सैन्याने लगेच भांडण सुरु केले. चिनी सैनिकाने कर्नल बाबूंना चिनी भाषेत काहीबाही बडबडत ढकलून दिले.

 

युनिटचा कमांडिंग ऑफिसर हा वडिलांच्या जागी असतो असे लष्करातील सैनिक मानतात. कमांडिंग ऑफिसरला मारहाण करणे किंवा त्याचा अनादर करणे म्हणजे आपल्या पालकांचा अपमान केल्यासारखे आहे. त्यामुळे भारतीय सैनिकांनी ताबडतोब याचे उत्तर म्हणून चिन्यांवर हात उचलला. आणि त्यांच्यात कोणत्याही शस्त्राशिवाय घमासान लढाई सुरु झाली. ही मारामारी अर्धा तास चालली. दोन्ही बाजूनं सैनिक जखमी झाले. पण यात भारतीयांची सरशी झाली.

 

नवीन चिनी सैनिकांची उपस्थिती आणि काहीच घडलेले नसताना चिनी सैनिकांनी अचानक मारलेला  ठोसा काहीतरी मोठे घडणार याची नांदी होती. जखमी सैनिकांना कर्नल बाबूंनी उपचाराकरिता  पाठविले आणि त्यांच्याकरवी अजून कुमक मागवली. वातावरण तापलेले असतानाही बाबूंनी आपल्या सैनिकांना शांत राहण्यास सांगितले.

 

नवीन चिनी सैनिकांना कर्नल बाबूंनी जबरदस्तीने चिन्यांच्या बाजूकडील एलएसीमध्ये नेले. त्यांना त्यांच्या बाजूला नेऊन कर्नल बाबूंना अजून चिनी सैनिक येत आहेत की नाहीत याची पाहणी करायची होती. हा यांच्यातील लढाईचा दुसरा टप्पा होता. तासाभरानंतर पुन्हा दुसरी लढाई सुरु झाली.

 

कर्नल बाबूंची शंका खरी ठरली. मोठ्या संख्येने चिनी सैनिक गलवान नदीच्या किनाऱ्यावर आणि नदीजवळील उंच कठड्यावर जागा हेरून आक्रमणाच्या तयारीत होते. खूप काळोख झाला होता. आणि पटकन डोळ्यांना काही दिसत नव्हते. अचानक कर्नल बाबू आणि इतर सैनिकांवर चिन्यांनी मोठ्या मोठ्या दगडांनी मारा सुरु केला.

 

साधारण नऊच्या सुमारास कर्नल बाबूंच्या डोक्यात एक मोठा दगड घातला गेला. त्या माराने जखमी झालेले कर्नल बाबू गलवान नदीत पडले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही लढाई एकाच ठिकाणी न होता एलएसीच्या वेगवेगळ्या भागात एकाच वेळी झाली. साधारण ४५ मिनिटांच्या या दुसऱ्या लढाईत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी अथवा मृत होऊन गलवान नदीत पडत होते. साधारण ३०० च्या वर सैनिक एकाचवेळी वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत होते. मल्लयुद्ध आणि काटेरी तारा लावलेल्या रॉड्स नी चिनी सैनिकांनी हल्ला केला होता. हे रॉड्स बिना आवाजाचे लोखंडी होते. कमांडिंग ऑफिसर कर्नल बाबू या दुसऱ्या टप्प्याच्या लढाईत हुतात्मा झाले. त्यानंतर दोन्हीकडील मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात एक तास गेला.

 

नदीतून जखमी भारतीय सैनिक आणि काही सैनिकांचे मृतदेह बाहेर काढत असताना आपल्या सैनिकांना काळोखात क्वाडकॉप्टर ड्रोनचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू आला. संपूर्ण व्हॅलीवरून ड्रोन संथपणे फिरत होता. नुकसान किती झाले आहे किंवा अजून किती भारतीय सैनिक जिवंत आहेत किंवा ते कुठे आहेत आणि त्यांच्यावर केव्हा, कश्याप्रकारे, कुठून हल्ला करायचा याची पाहणी हा ड्रोन करीत होता. आधीच कर्नल बाबूंच्या हौतात्म्याने भारतीय सैनिक भयंकर संतापले होते. त्यात या ड्रोनची भर पडली.

 

मदतीसाठी मागवलेली कुमक मोठ्या प्रमाणात येऊन ठेपली. त्यात १६ बिहार आणि ३ पंजाब रेजिमेंट यांचे घातक जवान सुद्धा होते. प्रत्येक पायदळ बटालियनमध्ये घातक जवानांची एक पलटण असतेच. ही पलटण जोरदार हल्ला करते आणि शॉक सैन्य म्हणून ओळखली जाते. चिन्यांकडेही होती. भारतीय सैनिक चिन्यांच्या बाजूकडील एलएसीमध्ये अधिक आत गेले होते. जेणेकरून चिन्यांनी एलएसीजवळ येऊन काही घातपात करू नये.आणि कर्नल बाबूंची  शंका बरोबर ठरली. मोठ्या संख्येने चिनी सैनिक रॉड्स आणि दगडांच्या तयारीने हल्ला करण्यासाठी टपून बसले होते.

 

रात्री ११ नंतर लढाईचा तिसरा टप्पा सुरु झाला आणि या टप्प्यात उत्तररात्र सरेपर्यंत चिन्यांची सरशी होत होती. सैनिक लढत लढत गलवान नदीच्या जवळ जाऊन पोचले. दोन्ही बाजूनी सैनिक गलवान नदीत पडत होते. काही जखमी अवस्थेत तर काही पाय घसरून दगडावर आपटून नदीमध्ये पडले.

 

पाच तासाच्या धुमश्चक्रीनंतर हळूहळू सगळं शांत झालं. दोन्ही बाजूनी जखमींना आणि मृतदेहांना हलविण्यात आलं.

 

माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान मंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी मीडियाशी बोलताना भारतीयांच्या दुप्पट चिनी सैन्याचं नुकसान झालं असं म्हटलं. १६ चिनी सैनिकांचे मृतदेह परत करण्यात आल्याचं त्यांनी असांगितलं. यामध्ये चीनच्या कमांडिंग ऑफिसरचाही समावेश होता. यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या चिन्यांचाही मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. परंतु याबद्दल अद्याप निश्चित माहिती मिळू शकली नाहीये.

 

तिसऱ्या लढाईनंतर अंधारामुळे दोन्ही बाजूकडील सैनिक एकमेकांच्या बाजूलाच राहिले असल्याचे जनरल सिंग यांनी सांगितले. परंतु त्यांना युद्धकैदी म्हणता येणार नाही असेही ते म्हणाले. १६ जून उजाडल्यानंतर अनेक सैनिक बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. दिवस सुरु झाल्यानंतर ही परिस्थिती दोन्ही बाजूंच्या मेजर जनरल यांच्याकडे सोपविली गेली आणि सैनिकांच्या देवाणघेवाणीसंबंधी चर्चा झाली.

 

दोन्ही बाजूनी सैनिक परत करण्यासाठी तीन दिवस लागतील. हा खूप मोठा धक्का आहे. हे युद्धबंदी नाही आहेत. आम्ही आपल्याकडे असलेल्या चिनी सैनिकांना वैद्यकीय उपचार देत आहोत. आणि ते आपल्या माणसांवर उपचार करत आहेत असे एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना सांगितले.

 

पूर्वी चर्चेत सहभागी झालेल्या सैनिकांना चीनने तैनात केले नव्हते तर जाणूनबुजून अतिशय आक्रमक असे वेगळेच सैनिक चर्चेनंतर तैनात करण्यात आले होते. असे १६ बिहार तुकडीचे म्हणणे आहे. १६ बिहार ही चिनी सैनिकांसाठी अपरिचित नाही. २०१७ च्या डोकालाम स्टँडऑफ दरम्यान हेच युनिट होते. गलवान व्हॅलीमध्ये हे युनिट दोन वर्षांपासून तैनात होते आणि चिनी सैनिकांशी त्यांनी खूप चांगले संबंध प्रस्थापित केले होते. म्हणूनच चिनी सैनिकांच्या आक्रमकपणामुळे त्यांना धक्का बसला. नवीन चिनी तैनातीमुळे ते चक्रावले. कर्नल बाबूंचा अश्या तऱ्हेचा मृत्यू त्यांना चटका लावून गेला. आता पेट्रोलिंग पॉईंट चौदा वर शांतता आहे. 

 

- प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Media Monitoring Desk )

 

Source : youtube, google, wikipedia, indiatoday, interviews on tv, indiatoday तव

 

Exactly what happened on 15th June?