शौर्यगाथा- ५:- 'ऑपरेशन स्लेज!'
         Date: 09-Dec-2021

शौर्यगाथा- ५

'ऑपरेशन स्लेज!'

 
General Kodandera Subayya 

नॉर्थन एरिया मधले गिलगिट हे महत्त्वाचे ठिकाण दगाबाजी करून पाकिस्तानच्या हातात अलगद पडले होतेच. आता गिलगिटहून कारगिल द्रास मार्गे लडाखची राजधानी लेह बळकावण्याचा पाकिस्तानचा मनसुबा होता. ही काहीशी अवघड योजना होती, कारण हा सगळा मार्ग सुमारे 300 मैलांचा आणि बऱ्यापैकी खडतर होता. वास्तविक धर्माधिष्ठित विभागणीच्या नावावर काश्मीर मागणाऱ्या पाकिस्तानला शांतताप्रिय बौद्ध आणि हिंदू बहुसंख्य लडाखला हात लावायचे कारणच नव्हते, मात्र तरीही जाणून -बुजून ही कुरापत काढण्यामागचा हेतू अगदी उघड होता- धर्माचे कारण पुढे करून पाकिस्तानला भारताचा भूप्रदेश हडप करायचा होता. गिलगिट- कारगिल मार्ग जरी बराच लांब होता, तरी त्या मार्गावर स्कर्दू सोडता अन्य कुठेही फारसा विरोध व्हायची शक्यता नव्हती. स्कर्दूला देखील केवळ जम्मू- काश्मीरच्या संस्थानी सेनेची पलटण होती. जरी ती 161 पायदळ ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली होती, तरी या पलटणीला सगळे आदेश राज्याच्या संस्थानी कार्यालयातूनच मिळत होते. ऑपरेशन स्लेज् नावाचा कट गिलगिटमध्ये शिजतोय याचा सुगावा लागल्यामुळे या पलटणीला दक्ष राहण्याचे आदेश दिले गेले, मात्र तातडीने कुमक का रवाना केली गेली नसेल याचा अंदाज करता येत नाही. फेब्रुवारी 1948 च्या सुमारास प्रचंड संख्येने हल्ला आल्याच्या बातम्या स्कर्दूहून येऊ लागल्या. तातडीने मदत पाठवण्याची विनंती येथील कमांडर कर्नल शेरजंग थापा वारंवार करत होते. किल्ल्यात या सैनिकांची कुटुंबे देखील होती. या सगळ्यांना घेऊन किल्ला सोडून माघार घेणे देखील आता अशक्य होऊन बसले होते. विमानांच्या सहाय्याने काही रसद पुरवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र वेढा घालणाऱ्या पठाणांनी अचूक गोळीबार करत तो उचलण्याची संधीच दिली नाही. अशा बिकट परिस्थितीमध्ये देखील फेब्रुवारी ते सप्टेंबर 1948 असे सहा महीने कर्नल थापांनी आणि त्यांच्या बहादूर सैनिकांनी अर्धपोटी राहून अक्षरश: एकाकी किल्ला लढवला. शिवाजी महाराजांच्या कित्येक मावळ्यांनी असे सहा-सहा, आठ-आठ महिने गड लढवले होते त्याची आठवण होते. शेवटी अन्नधान्य आणि दारुगोळा संपून गेल्यावर पठाण किल्ल्यात घुसले तेव्हा हातातल्या कुकऱ्या उचलून मारण्याचे त्राण देखील या सैनिकांमध्ये उरले नव्हते. किल्ल्यात अक्षरश: त्यांची कत्तल झाली. त्यांच्या कुटुंबांची काय दशा झाली असेल याचे वेगळ्याने वर्णन करायची आवश्यकता नाही.

एकीकडे स्कर्दूला वेढा घालून आता पाचशे सशस्त्र सैनिक आणि दोनशे पोर्टर स्कर्दूहून पुढे लेहच्या दिशेने निघाल्याची बातमी देखील येऊन थडकली होती. हातात जेमतेम पंधरा दिवस होते आणि श्रीनगर-लेह रस्त्यावर उभी होती झोजिला खिंड! सुमारे तेरा हजार फूट उंच असणारी ही खिंड ओलांडून लेहला पोचणे आणि लेहचे रक्षण करणे जवळजवळ अशक्य होते, कारण ऐन हिवाळ्याच्या दिवसांत ही खिंड बर्फाने पूर्ण भरून बंद झालेली होती. श्रीनगरकडून मनाली- रोहतांग मार्गे लेहसाठी कुमक रवाना झाली, मात्र ती पोचेपर्यंत लेहला कोणतेही संरक्षण असणार नव्हते आणि हल्ला कधीही होऊ शकणार होता. हा धोका ओळखून एक धाडसी योजना केली गेली. काही जवानांनी थोडी हत्यारे घेऊन झोझिला खिंड पर करून लवकरात लवकर लेहला पोचयचं आणि तेथील तरुणांना एकत्र करून तात्पुरते हत्यार चालवायचं प्रशिक्षण देऊन कुमक येईपर्यन्त लेह लढवत ठेवायचं अशी ती योजना होती. झोझिला खिंड ओलंडण्यासाठी त्या हवामानाची सवय असणाऱ्या जवानांचा शोध सुरू झाला आणि तो 2 डोग्रा या पलटणीत संपला. त्यावेळी कर्नल गोपाळ गणेश बेवूर 2 डोग्राचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांच्या पलटणीत प्रत्यक्ष लाहूल -स्पिती भागातले बर्फाळ प्रदेशाची सवय असणारे कित्येक सैनिक आणि दोन अधिकारी देखील होते. कॅप्टन प्रिथीचंद आणि कॅप्टन खुशालचंद हे ते दोन अधिकारी होते. त्यांना बोलावून सगळी परिस्थिती कथन केली गेली, आणि झोझिला खिंड पार करण्यासाठी कोणी तयार असल्यास विचारले गेले. हे काम करण्याची अर्थातच कोणतीही सक्ती नव्हती, मात्र कॅप्टन प्रिथीचंदांनी तातकाल ही जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या पलटणीच्या जवानांपैकी सुमारे दीड- दोनशे जवान स्वखुशीने जाण्यास तयार झाले, त्यातल्या 40 धट्टयाकट्ट्या, दणकट आणि कणखर जवानांची निवड केली गेली. या बर्फाळ पायपीटीसाठी अत्यावश्यक कपडे, सामान, अन्नाचे हवाबंद डबे, दारुगोळा हे सगळे त्या जवानांनाच वाहून न्यायचे होते, इतकेच नव्हे तर तिकडच्या तरुणांमध्ये वाटण्यासाठी अधिकाच्या बंदुका नेऊन तिथल्या तरुणांमध्ये वाटून त्यांना प्रशिक्षण द्यायचे होते शिवाय कोणत्याही क्षणी होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यासाठी तयार राहायचे होते! बर्फाचे कडे कोसळून हे वीर त्यात गाडले जाऊ नयेत म्हणून आधी त्या सगळ्या मार्गांवर मोठमोठ्याने नगारे पिटून नजीकच्या भविष्यात एखादी बर्फाचे घसरण होणार असेल तर ती आधीच घडवून आणण्याचा उपाय देखील केला गेला होता. अखेर सुमारे दहा दिवसांनी हे वीर सुखरूपपणे लेहला पोचले, आणि त्याच सुमारास मनालीमार्गे पाठवलेली कुमक देखील तिकडे येऊन पोचली. 24 मे 1948 रोजी काश्मीर डिव्हिजनचे कमांडर मेजर जनरल थिमय्या आणि एअर कामोडोर मेहरसिंग विमानाने लेहला येऊन पोचले. 3300 मीटर उंचीवरच्या एक सपाट भागात तात्पुरत्या कामचलाऊ धावपट्टीवर विमान उतरवण्याची ही चाचणी होती, आणि स्वत: सेनानी या चाचणीसाठी धोका पत्करून लेहला आला होता. आता विमानमार्गे लेहला शस्त्रास्त्रे आणि कुमक पाठवणे तुलनेने सोपे होते. त्याप्रमाणे मे च्या शेवटीच गुरखा पलटणीच्या दोन कंपन्या लेहला दाखल झाल्या. आता लेहला पुरेशी कुमक मिळाली होती. बर्फ वितळायच्या आत खिंड ओलांडून भारतीय सेना लेहला पोचेल असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या मनात देखील आले नसावे, आणि म्हणून पाकिस्तानने त्यांच्या योजनेनुसार जुलै 1948 मध्ये बर्फ वितळल्यावर लगेचच लेहवर हल्ला चढवला, मात्र जय्यत तयारीत असणाऱ्या भारतीय सेनेने चोख प्रत्युत्तर देऊन लेह आणि लडाख वाचवले.

लेह वाचले तरी अजूनही द्रास-कारगिल भाग आणि शत्रूच्या ताब्यात असल्याने लेह-श्रीनगर रस्ता मोकळा नव्हता. तो लवकारत लवकर मोकळा करणे आवश्यक होते. आता पाकिस्तानची एक अख्खी पलटण द्रास-कारगिल भागात तैनात होती. आणि झोझिला खिंडीजवळच डोंगर- घळींच्या सहाय्याने शत्रूने आपले मोर्चे बांधले होते. 77 पॅरॅशूट ब्रिगेडला हे काम दिले गेले. या ब्रिगेडचे कमांडर होते ब्रिगेडिअर के. एल.अटल. त्यांच्या हाताखाली 5 मराठा लाईट इन्फन्ट्री, 1/5 गुरखा रायफल्स, 4 राजपूत आणि 1 पटियाला या पलटणी होत्या. वास्तविक शत्रूचे बळ फार मोठे नव्हते तरी भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांचे पारडे जड होते. कितीही डावपेच आखले तरी निव्वळ हल्ले करून पाडवा होणे अशक्य होते. अशक्य होते. त्यामुळे काहीतरी अनपेक्षित गोष्ट करून शत्रूला भयभीत करून नामोहरम करणे एवढा एकाच मार्ग दिसत होता. डोंगराच्या कडे कपारीत मोर्चे बांधल्यामुळे वक्राकार मार्गाने लक्ष्यावर आदळणारे तोफगोळे फारसे प्रभावी ठरत नव्हते. सरळ रेषेत लक्षयवर मारा करू शकतील अशा अस्त्रांची आवश्यकता होती, आणि असा अचूक मारा करू शकणाऱ्या तोफा फक्त रणगाड्याच्या असू शकत होत्या.. पण इतक्या उंचीवर रणगाडे..?

जनरल थिमय्यांनी तात्काळ 7 कॅवलरी रेजिमेंटच्या कमांडरना, कर्नल राजिंदरसिंग स्पॅरो यांना पाचारण केले. दुसरे महायुद्ध लढण्याचा अनुभव असणाऱ्या स्पॅरो यांना अशी अचाट साहसे करण्याचा छंदच होता. त्यांनी तात्काळ हे आव्हान स्वीकारले. जम्मू ते झोझिलाच्या पायथ्याशी असणाऱ्या बालतालपर्यन्त रणगाडे कसे न कसे नेता येणार होते, मात्र तिथून पुढे रस्ता नव्हता. आता पुढे आले ते मद्रास सॅपर्सचे वीर! मेजर थांगराजू यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या इंजिनियर फील्ड कंपनीने हे आव्हान स्वीकारले. कर्नल स्पॅरो यांचे रणगाडे बालतालला पोचेपर्यंत मेजर थांगराजू यांनी बालताल ते झोझिला खिंडीपर्यंतचा रस्ता भगीरथ प्रयत्नांनी पूर्ण केला होता. 1 नोव्हेंबर 1948 या ऐतिहासिक दिवशी अखेर झोझिला खिंडीत 7 cavalry चे स्टुअर्ट रणगाडे आणि त्यांच्या मागोमाग पायदळाचे जवान अशी आगेकूच सुरू झाली. समोर शत्रूला काही समजायच्या आतच रणगाड्यांच्या तोफांनी आग ओकायला सुरुवात केली. काही वेळाने जेव्हा धुक्यातून रणगाडे दिसायला सुरुवात झाली तेव्हा आधीच थंडी आणि भीतीने गर्भगळित झालेल्या शत्रूचे उरलेसुरले अवसान गळले आणि त्याने मोर्चे सोडून पळायला सुरुवात केली. केवळ ज्यांच्यावर हल्ले झाले तीच ठाणी नव्हे तर त्या भागातले सगळेच मोर्चे सोडून शत्रूने पूर्ण माघार घेतली. आता मात्र 77 पायदळ ब्रिगेडीने जराही उसंत न घेता 15 नोव्हेंबरला द्रास आणि 23 नोव्हेंबरला कारगील ताब्यात आले. 24 नोव्हेंबरला लेहमध्ये संपर्क साधला गेला आणि श्रीनगर ते लेह हा अतिशय महत्त्वाचा मार्ग पूर्णपणे भारतीय सेनेच्या अधिपत्याखाली आला. पायदळाचा दुर्दम्य लढा आणि रणगाड्यांचा अनपेक्षित मात्र अतिशय जोखमीचा आणि परिणामकारक वापर यांनी प्रतिकूल निसर्ग आणि वरचढ शत्रूला नामोहरम करत अक्षरश: विजयश्री खेचून आणली. पुढे भारतीय सेनेचे लष्करप्रमुख झालेल्या जनरल थिमय्या यांचे नाव भारतातल्या विशेष उल्लेखनीय लष्करप्रमुखांपैकी एक म्हणून अतिशय सन्मानाने घेतले जाते.

या संपूर्ण युदधामध्ये जितकी महत्त्वाची भूमिका आपल्या पायदळाच्या पलटणी आणि जवानांची होती, तितकीच किंबहुना कणभर जास्तच महत्त्वाची कामगिरी वायुसेनेच्या बहाद्दर विमानचालकांची देखील होती. अत्यंत प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि हवामान, प्रचंड धुक्याने वेढलेला डोंगराळ भाग, अपुऱ्या लांबीच्या किंवा अर्धवट धावपट्ट्या अशा अनंत अडचणी असूनही प्रत्येक आघाडीवर रसद आणि कुमक पुरवण्यात त्यांनी दाखवलेली तत्परता आणि कौशल्य यांच्याशिवाय काश्मीर इतके दिवस लढवत ठेवणे निव्वळ अशक्य होते. शब्दमर्यादेमुळे सगळ्यांचा उल्लेख करणे अशक्य आहे, मात्र सर्वांच्या वतीने तत्कालीन एअर चीफ मार्शल हृषीकेश मुळगांवकर यांचा सन्मानिय उल्लेख करून त्या सर्वप्रती आदर व्यक्त करेन.

1947 च्या डिसेंबरमध्ये हा प्रश्न यूनो मध्ये नेण्याची घाई जर पंतप्रधान नेहरूंनी केली नसती तर आपल्या सेनेने, गमावलेला सगळा भूभाग परत मिळवला असता यात शंका नाही. नेहरूंच्या या निर्णयाच्या समर्थनार्थ आणि विरोधात देखील पुष्कळ लिहिले आणि बोलले गेले आहे. मुळातच या युद्धातला विचित्र योगायोग असा होता की ज्या दोन देशांच्या सेना या युद्धात लढत होत्या त्या दोन्ही सेनांचे सेनाप्रमुख मात्र तिसऱ्याच देशाचे होते. आधीच या सगळ्या युद्धात तिसऱ्या राष्ट्राचा हस्तक्षेप होताच. असं असताना एका परक्या अधिकाऱ्याचे ऐकून हा प्रश्न आणखी चार देशांमध्ये चर्चेला नेऊन नेमकं काय साध्य झालं? भारतीय सेनेने आपलं रक्त सांडून जो भाग जिंकला आहे तो भारताचाच आहे आणि भारतातच राहील ही ठाम भूमिका घेणं खरंच इतकं अवघड होतं का? काश्मिरी जनतेला शेख अब्दुल्ला नेते म्हणून मान्य आहेत का याचं बहुमत घेण्याची गरज एकदा काश्मीर भारतात पूर्ण विलीन झाल्यावर का असणार होती? तत्कालीन राजकीय समिकरणं कळणं अवघड असेलही, परंतु सन्माननीय पंतप्रधानांच्या या एक निर्णयामुळे आजतागायत काश्मीर प्रश्न सुटू शकलेला नाही.

आपल्यावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या किंवा आनंदाच्या प्रसंगी आपण कसे वागतो आणि प्रकट होतो यावरून आपल्या आजूबाजूचा समाज आपल्याला जोखत असतो. मग ती व्यक्ती असो वा राष्ट्र! एकूणच काश्मीर प्रश्न आणि देशाच्या सुरक्षिततेबाबत भारतीय सेना जितकी खंबीर होती तितकेच भारताचे राजकीय नेतृत्व बोटचेपं आणि हलगर्जी आहे हे एव्हाना आपला लागूनचा दुसरा शेजारी असणाऱ्या चीनने जोखले होतेच. अत्यंत मानहानीकारक तरीही भारतीय सेनेची असीम शौर्यगाथा असणारं 1962 चं युद्ध पुढल्या भागापासून!

जय हिंद!