भारत- फ्रांस वाढत्या मैत्रीमुळे भारताची वाढती सामरिक शक्ती हीच पाकिस्तानची खरी पोटदुखी
         Date: 06-Feb-2021

भारत- फ्रांस वाढत्या मैत्रीमुळे भारताची वाढती सामरिक शक्ती हीच पाकिस्तानची खरी पोटदुखी
 
 

Indo French Defense deal
 
 
एप्रिल २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन देशांमध्ये सर्वप्रथम फ्रान्सचा दौरा केला.पॅरिसशी नवी दिल्लीचे संबंध नजीकच्या काळात अधिक घट्ट होऊ शकतात याचे ते स्पष्ट संकेत होते आणि फ्रान्स हळूहळू या तिन्ही सामरिक (म्हणजे संरक्षण, अवकाश आणि आण्विक उर्जा) क्षेत्रांमध्ये भारताला भरीव तंत्रज्ञान पुरवठा करणारा देश म्हणून विकसित झाला.भारताची प्रचंड बाजारपेठ आणि प्रगत सामरिक तंत्रज्ञानाची भारताची मागणी लक्षात घेता फ्रान्सने देखील भारताकडे झुकते माप दिले.
 
 


फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मार्च २०१८ दरम्यान भारताला पहिली अधिकृत भेट दिली. या भेटी दरम्यान भारत आणि फ्रान्स यांनी द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि जागतिक महत्त्व या विषयांवर विस्तृत चर्चा केली. दोन देशांनी नवीकरणीय ऊर्जा, स्मार्ट सिटी, अणुऊर्जा, पर्यावरण, रेल्वे, ड्रग्स प्रतिबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी १४ सामंजस्य करार केले.अध्यक्ष मॅक्रॉन यांनी फ्रान्सला युरोपमधील भारताचा सर्वोत्कृष्ट भागीदार बनवण्याची इच्छा व्यक्त केली.
 
 
 

सर्वात महत्वाचा करार संरक्षण क्षेत्रात झाला.त्याअंतर्गत दोन्ही देशांच्या सशस्त्र सेना एकमेकांच्या सैन्याच्या तळांचा वापर करण्यास आणि लष्करी उपकरणांची देवाणघेवाण करण्यास सक्षम असतील.या करारावर तत्कालीन संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ले यांनी स्वाक्षरी केली.दोन्ही देशांचे सैन्य युद्ध सराव, प्रशिक्षण आणि आपत्ती कार्यात मदत पुरवण्यात सहकार्य करेल. संरक्षण, सुरक्षा, अवकाश आणि उच्च तंत्रज्ञानामध्ये द्विपक्षीय सहकार्याचा भारत आणि फ्रान्सचा दीर्घ इतिहास आहे आणि दोन्ही देशांच्या सैन्यामधील करार म्हणजे इतिहासाचे सोनेरी पाऊल आहे असे उद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काढले होते तर संरक्षण क्षेत्रातील ही नवी सुरुवात असल्याचेही मॅक्रॉन यांनी सांगितले.
 
 

ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना पाकिस्तान त्यांचा नैसर्गिक मित्र असलेल्या चीन बरोबर सी-पेकच्या ( CPEC) हिंदोळ्यावर झोके घेत होता आणि 'गेम चेंजर' दुनियेत रममाण झालं होता.
 
 

आयएएएफने सप्टेंबर २०१६ मध्ये फ्रान्सबरोबर झालेल्या ५९,००० कोटी रुपयांच्या कराराअंतर्गत अण्वस्त्रे डागण्यास सक्षम असलेल्या ३६ राफेल्सची मागणी केली. त्यातली काही अगदी तातडीने भारताला मिळाली तर बाकी २०२२ अखेरपर्यंत येणे अपेक्षित आहेत. भारताने मागणी केलेल्या ३६ राफेल लढाऊ विमानांचं उत्पादन सध्या वेगाने सुरु आहे.अजून राफेल घेण्यासाठी आणि भारत-फ्रान्स संबंध अजून घट्ट करण्यासाठी गेल्या महिन्यात फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे वाणिज्य सल्लागार इम्यॅन्युअल बोने यांनी भारताच्या पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची भेट घेतली. ३६ विमानांचा करार आधीच झालेला असून अजून ३६ विमानांचा करार भारत करू शकतो.
 
 

Air-Sol Moyenne Portée (ASMP). हे एक आकाशातून जमिनीवर मारा करणारं आण्विक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची निर्मिती फ्रान्सने केली आहे.या क्षेपणास्त्राची चाचणी ९ डिसेंबर २०२० रोजी फ्रान्सने राफेल या त्यांच्या अत्याधुनिक लढाऊ विमानातून केली. त्यामुळेच 'एअर-सोल मोईने पोर्टे' हे नाव भारतासाठी अतिशय महत्वाचं आणि चीन,पाकिस्तान साठी अस्मानी संकटासारख आहे कारण याचे उत्तर अजूनही त्यांच्याकडे नाही. पाकिस्तान ने जे. एफ. १७ च्या ब्लॉक ३ मधील लढाऊ विमानांची निर्मिती करण्याची घोषणा नुकतीच केली. त्याची तुलना राफेलशी ते करत असले तरी ती तुलना होऊच शकत नाही हे स्पेसिफिकेन बघून आणि त्यांचा तुलनात्मक विचार केला तर लगेच कळेल. भारताच्या वायू सेनेची ताकद कित्येक पटीने वाढली आहे.
 
 
 

ज्या गतीने भारत लष्करी सामर्थ्य वाढवत आहे त्याच वेगाने पाकिस्तान चीनी ताटाखालच मांजर होत चालला आहे. कलम ३७० हटल्यानंतर पाकीस्तान चा काश्मीर प्रश्नावर पूर्णपणे हरला असल्याची भावना एकूणच तिथल्या जनतेत झाली आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची कोंडी करणं अशक्य आहे हे लक्षात आल्यावर पाकिस्तान ने भारतावर धर्मावर आधारीत इस्लामोफोबिया आणि आरएसएस प्रणीत मोदी सरकार वगैरे नेहमीच्या वल्गना करायला सुरुवात केली.
 


"Ties with Pakistan at 'historic low', says French President's top diplomatic advisor"
 
 

प्रोफेट महंमद यांच्या व्यंगचित्रावरून तापलेले वातावरण आणि झालेला दहशतवादी हल्ला. फ्रान्सविरोधात पाकिस्तानमध्ये कट्टर पंथीयांद्वारे व्यापक निषेध पाहायला मिळाला.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर टीका केली.इस्लामाबादच्या टीकेच्या वेळी फ्रान्सचे बोन्ने यांनी भारताचे समर्थन केल्याबद्दल आभार मानले.जेव्हा तुर्की, पाकिस्तान आणि इतर देशांतील काही नेत्यांनी फ्रान्सवर हल्ला केला तेव्हा भारतीय समाजांकडून मिळालेले समर्थन खूप काही सांगून गेले.
 
 
 

या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे पाकिस्तानी प्रिंट मिडीया मधून भारत- फ्रान्स वाढत्या जवळीकतेवर गेल्या काही दिवसात होणारी सततची टीका आणि त्यामुळे आशियाई देशात निर्माण होणारी अस्थिरता वगैरेच्या गप्पा त्यातून दिसणारी भारताबद्दलची असूया, वाढत्या कर्जाचा भार, स्वतःला सक्षम करण्यासाठी, आपली सामरिक ताकद वाढवण्यासाठी आपण पैसे मोजून शकतं नाही आणि त्यातून येणार नैराश्य, फ्रान्स बरोबर पातळ झालेले संबंध हीच पाकिस्तानची आजची पोटदुखी आणि उद्याची डोकेदुखी आहे.
 
 
 

---- अक्षता बापट