भारतासमोरील अदृश्य युद्ध.
         Date: 16-Mar-2021

भारतासमोरील अदृश्य युद्ध.

 

- प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Media Monitoring Desk)

 

लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन,  काश्मीर यांच्या भाषणाचा सारांश.

 

लष्करी अधिकाऱ्यांच्या एका मोठ्या गटापुढे अतिथी व्याख्याता म्हणून बोलण्यास लेफ्टनंट जनरल सय्यद गेले असताना गेल्या तीस वर्षात जम्मू आणि काश्मीर मध्ये घडलेल्या महत्त्वाच्या विविध घटना त्यांनी  त्यांना सांगितल्या. या घटना फारच थोड्या लोकांना ठाऊक होत्या याचे त्यांना खूप आश्चर्य वाटले. सैन्यातील आयुष्य इतके धकाधकीचे आहे की इथे मागील घटनांचा अभ्यास करून मग पुढे जाण्याइतका वेळही कुणाकडे नाहीये. त्यांनी मागील घटनांचा अभ्यास केला तर युद्धाच्या नोंदी पाहून महत्त्वाच्या स्थानिक घडामोडी आणि तेथील लोकांची प्रवृत्ती त्यांच्या लक्षात येईल. स्थानिकांची प्रवृत्ती, त्यांचे मार्ग आणि त्यांची माध्यमे यांचे काळजीपूर्वक  विश्लेषण केले तर त्यांना उपयुक्त माहिती मिळेल. परंतु हे तितकेसे सोपे नाही. कारण पूर्वी जे घडलेय त्यातले बरेचसे काळाच्या ओघात गडप झालेय. किंवा त्यातील बरेचसे लोकांसमोर आलेच नाहीये. केवळ ठोस गोष्टीचीच नोंद केली गेली आहे. परंतु त्यात कोणती रणनिती वापरलेली आहे ते सांगितलेले नाही.

 

ज्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये अभिमानाने आपली सेवा दिली आहे आणि आज जे सेवा देत आहेत त्यांना जम्मू आणि काश्मीरमधील धार्मिक आणि वैचारिक कट्टरतावादाला सामोरे जावे लागले आहे. दहशतवादी बनण्याकरिता किंवा ओव्हर ग्राउंड वर्कर्स (ओजीडब्ल्यूज ) होण्याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी कशा पुरवल्या जातात हेच मोठे आव्हान आहे. पूर्वी अनेक संस्था या भारतविरोधी आणि जहाल इस्लाम धर्म मानणाऱ्या नव्हत्या. मग हे सगळं केव्हा बदललं? कुणीच याविषयी एखादी तारीख किंवा वेळ सांगू शकणार नाही. काळ हळू हळू बदलला. तरीही हा बदल हेतुपुरस्सर घडविला गेला. भारताच्या धर्मनिरपेक्षतेशी जम्मू आणि काश्मीरचे सौम्य, कमी दुर्बोध आणि सहनशील इस्लाम मिळतेजुळते आहे. म्हणून जरी सामाजिक आणि राजकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात भारतविरोधी असला तरी भारतापासून जम्मू काश्मीर वेगळा होण्यापासून वाचला. पाकिस्तानला हे समजले होते की मध्यपूर्वेपासून जम्मू - काश्मीरला तोडायचे असेल तर इस्लाम कार्ड खेळावे लागणार. आणि म्हणूनच जम्मू - काश्मीरमध्ये धार्मिक विचारसरणीत बदल करण्याची योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. नव्वदच्या दशकात सुरु केलेली ही योजना आजही सुरु आहे. काश्मीरमध्ये ही योजना राबविण्यात ते यशस्वी झाले कारण इथल्या जवळपास सगळ्या मशिदीतल्या मौलवींनी त्याचा जोरदार प्रचार केला. या मौलवींनी राजकारण्यांच्या मदतीने भारतविरोधी लाट निर्माण केली. मीडियामध्ये किंवा विधानसभेत कोणताही गदारोळ न होता सैन्य, पोलीस दले आणि गुप्तचर संस्था यांच्या नकळत हे कसे घडले याचे कोडे आहे. पण याचे उत्तर एकदम सोपे आहे. युद्धाच्या अन्य मार्गांविषयी ते अनभिज्ञ होते. प्रॉक्सी वॉर अथवा थेट संघर्ष सोडल्यास इतरही युद्धाचे मार्ग आहेत हेच त्यांनी दुर्लक्षित केले. पाकिस्तानने यशस्वीपणे आपली इस्लामिक विचारधारा सगळीकडे पसरवली. त्यावेळी त्या क्षेत्रात दूरध्वनी नसतानाही आपले इप्सित पाकिस्तानने साध्य केले ही खरोखरच आश्चर्याची बाब आहे.

 
invisible war_1 &nbs
 

भारतीय सुरक्षा दलांच्या (एसएफ) विरोधातील पाकिस्तान आणि फुटिरदवाद्यांची ही मोहीम वाढण्यास आणि टिकून राहण्यास जम्मू काश्मीरमधील अदृश्य जाळ्याचा हात आहे. जम्मू काश्मीर मधील मीडिया, कायदा, आर्थिक बाजू, सरकारी सेवा आणि शिक्षण पद्धती यांच्या जोरावर पाकिस्तान आणि फुटीरतावादी तेथे सक्रिय कार्य करताना दिसतात. याचमुळे संगणक आणि टेलिफोन नसतानाही जाळे  वेगाने आणि खोलवर पसरले गेले. दहशतवादी कारवायांसाठी लागणारा पैसा जम्मू काश्मीरमध्ये छुप्या रीतीने पोचत होता आणि अजूनही पोचतोय. म्हणूनच या पैशाचा ओघ थांबविण्यासाठी ५ ऑगस्ट २०१९ मध्ये मोबाईल इंटरनेट सेवा नियंत्रित करूनही येणाऱ्या पैशावर काहीच परिणाम झाला नाही. त्यांचे मानवी जाळे खूप मोठे आहे.

 

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही मोहीम अजूनच विस्तारली. लोकांच्या मनाची पकड घेणे, अनेक छुपे कार्यक्रम घेणे आणि त्याची जाहिरात करणे, शत्रूला काहीच सुगावा लागू न देता आपली विचारधारा नवीन पिढीमध्ये रुजवणे, दहशतवादी कारवायांसाठी भरती करून घेणे याकामी आधुनिक तंत्रज्ञानाचा फार यशस्वी उपयोग करून घेण्यात येतोय. तसेच दहशतवाद्यांकडून या तंत्रज्ञानाचा वापर करून विविध  क्षेत्रांवर हल्ला केला जाऊ शकतो. शिक्षण, बँकिंग आणि करमणूक साधने ही अशी तीन महत्त्वाची  ठिकाणे आहेत ज्यांच्यावर सहज हल्ला होऊ शकतो. अशाप्रकारे सायबर हल्ला हा आधुनिक युद्धाचा एक प्रकार आहे. सायबर हल्ल्याने प्रशासन आणि कारभार मोठ्या प्रमाणात अडचणीत आणून देश लुळापांगळा केला जातो.

 

भविष्यात, सैन्य, पोलीस आणि गुप्तचर संघटनांना या आधुनिक युद्धाचे स्वरूप आणि महत्त्व ओळखून वागले पाहिजे. सायबर सुरक्षा, सांस्कृतिक सुरक्षा, प्रसारमाध्यमे सुरक्षा यासाठी आवश्यक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. संस्कृती, धर्म आणि विचारसरणी यांचा अभ्यास भारतीय सैन्यात पूर्वी असायचा. आता सुद्धा हा अभ्यास समाविष्ट केला पाहिजे.  १९८३ मध्ये नॉर्दन कमांडचे लेफ्टनंट जनरल एम.एल. छिब्बर काळाच्या एक पाऊल पुढे होते. त्यांनी जम्मू काश्मीरच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभ्यास करण्याचा आदेश दिला होता. परंतु कुणीच ते तितक्या गंभीरतेने घेतले नाही. ही तीच वेळ होती जेव्हा पाकिस्तानच्या मुख्यालयात जम्मू काश्मीरमध्ये प्रॉक्सी वॉर ' ऑपरेशन टॉपॅक ' राबविण्याविषयी रणनीती आखली जात होती.

 

देशाच्या सीमा जरी स्थिर आणि शांत दिसल्या तरी देशांतर्गत अशांतता पसरवण्याचे कार्य करणाऱ्या अदृश्य शक्तींना वेळीच आळा घातला पाहिजे. मने काबीज करणे, वैचारिक भेद, हिंसा, धमकी, लुळे सरकार, तटस्थ इलेक्ट्रॉनिक नेटवर्क आणि पायाभूत सुविधा हे आधुनिक काळाचे युद्धाचे मापदंड असू शकतात.

 

केवळ राष्ट्रीय सुरक्षेत सामील असणाऱ्याच नव्हे तर बहुतांश सुशिक्षित जनतेला भविष्यातील धोक्यांविषयी जागरूकता असणे आवश्यक आहे. राष्ट्राला असणारा धोका हा केवळ मूर्त किंवा दृश्यमान असतो असे वर्षानुवर्षे समजून आपण फार मोठी चूक केली आहे. तसेच हा धोका प्रत्यक्ष युद्धाने नाहीसा करता येऊ शकतो. मग आपण सुरक्षित असू असे समजण्याचीही चूक आपल्या हातून झाली आहे. परंतु जे अदृश्य आणि अमूर्त धोके आहेत त्यांचे आव्हान हे सगळ्यात मोठे आहे आणि ते पेलण्यासाठी राष्ट्रातील केवळ सैन्यातील लोकच नव्हे तर सामान्य जनतेचाही सहभाग आवश्यक आहे.

 

लेफ्टनंट जनरल सय्यद अता हस्नाईन हे भारतीय सैन्यातील श्रीनगर कॉर्पसचे माजी कमांडर असून कट्टरतावादी इस्लाम विषयी त्यांचा अभ्यास आहे. ते काश्मीरच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीचे कुलपती आहेत आणि रणनीती आणि नेतृत्व यावर भारतात आणि इतर देशात ते व्याख्यान देतात.

 

Source : Youtube, google, Wikipedia, chanakyaforum.org