आम्ही भारताच्या सहकार्याचे स्वागत करतो, अफगाण भूमीवर भारतविरोधी कृती करू देणार नाहीः तालिबान
         Date: 11-Apr-2021
 
 
 

india-taliban_1 &nbs 
 
 
(अफगाणिस्तान शांतता प्रक्रियेचा भाग असलेल्या आणि शांतता चर्चेत तालिबानचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या डॉ. मुहम्मद नईम वार्ड यांनी संडे गार्डियनशी साधलेल्या संवादाचा मुक्त अनुवाद )
 
 
नवी दिल्ली: १ मे ची अंतिम मुदत जवळ येताच जगाचे लक्ष अफगाणिस्तानाकडे आहे कारण जो बिडेन यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या सरकारने संकेत दिले आहेत की, अफगाणिस्तानात असणाऱ्या अंदाजे २५०० सैनिकांना परत बोलावण्याची कोणतीच शक्यता नाही. त्यामुळे तालिबानकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
 
 
इंटरनेशनल इस्लामिक युनिव्हर्सिटी, इस्लामाबाद येथून पीएचडी करणारे संपूर्ण अफगाणिस्तान शांतता प्रक्रियेचे केंद्रस्थान असलेल्या डॉ. मुहम्मद नईम वार्ड यांनी आज संडे गार्डीयनशी संवाद साधला.
 
 
वार्ड हे अफगाणिस्तानातील चक जिल्ह्यातील आहेत. ते दोहामधील तालिबानी राजकीय कार्यालयाचा भाग आहेत आणि शांतता चर्चेत तालिबानचे प्रतिनिधीत्व करत आहेत. येत्या काही दिवसांत भारत सरकार आणि तालिबान प्रतिनिधी यांच्यात होणाऱ्या संवादात वाढ होण्याची शक्यता असल्याने या संवादांमध्ये वार्ड यांची महत्त्वपूर्ण भूमिका असेल.
 
 
भारत, हक्कानी नेटवर्क, आयसी ८१४ अपहरण आणि पाकिस्तान या विषयावर वॉर्ड यांनी भाष्य केले.
Q: १ मे ची मुदत जवळ येत आहे आणि अमेरिकेच्या प्रशासनाने असे सूचित केले आहे की ते अफगाणिस्तानात तैनात असलेले सैनिक परत बोलावणार नाहीत. तुम्ही या डेव्हलपमेंटकडे कसे बघता आणि अमेरिकन सैनिक मागे न घेतल्यास १ मे नंतर काय अपेक्षित आहे ?
 
 
A: आमची अपेक्षा आहे की कराराच्या अटींनुसार अमेरिका आपला दिलेला शब्द पाळेल आणि वेळेवर अफगाणिस्तानातून माघार घेईल. कराराचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास कराराचे उल्लंघन करणार्‍यांना त्याची योग्य किंमत चुकवावी लागेल.
 
 
Q: अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान न सोडून जाण्याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या कारणांमध्ये नमूद केलेले एक कारण म्हणजे हे सैनिक एकदा निघून गेल्यावर तालिबान नागरी सरकार उलथून टाकेल. १९९६ मध्ये तालिबानने काबूलचा ताबा घेतला आणि माजी राष्ट्रपती मोहम्मद नजीबुल्लाह यांना फासावर लटकवले तेव्हाची सगळ्या जगाने पाहिलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होईल. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे?
 
 
A: काबुल प्रशासनाने परदेशी लोकांना अफगाणिस्तानात ठेवण्यासाठी आणि मागील २० वर्षांपासून त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाचे रक्षण करण्यासाठी दिलेले हास्यास्पद कारण आहेत.
अफगाणिस्तानातील परकीय कब्जा संपल्यानंतर आम्ही देशातील राजकीय प्रक्रियेद्वारे सर्व अफगाण पक्षांशी करार करण्याचा निर्धार केला आहे. असा करार ज्यामध्ये अफगाणिस्तानचे ४० वर्षांचे स्वप्न साकार होईल आणि देशावरील भ्रष्टाचाराचे संकट दूर होईल.
दोहामध्ये सध्या अफगाणिस्तानशी चर्चा सुरू आहे. आम्हाला आशा आहे की ही चर्चा कराराचा मार्ग मोकळा आणि सुकर करेल.
 
 
Q: अमेरिकेने अलिकडे भारतासह वेगवेगळ्या देशांना शांतता प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विचारणा केली आहे आपण या कृतीचे स्वागत करता का की अफगाणिस्तान शांतता प्रक्रियेतील भारतचा सहभागाकडे तुम्ही समस्या म्हणून बघता?
A: देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सशक्त इस्लामिक प्रणालीच्या स्थापनेसाठी काम करण्याच्या हेतुने पुढे आलेल्या कोणाचेही आम्ही स्वागत करतो.
 
 
Q: तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमधील संबंधांचे वर्णन कसे करता?
A:अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीचे एक नेतृत्व आणि एकच बोली आहे; आपण सर्व एकत्र आहोत. इस्लामिक अमिरातीमध्ये अशी कोणतीही गोष्ट (हक्कानी नेटवर्क) नाही.
 
 
Q: भारतीय सुरक्षा तज्ज्ञांमधील एक चिंता ही अशी आहे की तालिबान पाकिस्तान आयएसआयने ( ISI ) दिलेले आदेश पाळते आणि ते जे काही सांगतील त्याप्रमाणे काम करते. उदाहरणच द्यायच झालं तर कंधार आयसी ८१४ अपहरण करणाऱ्या मसूद अझरसारख्या दहशतवाद्यांना तालिबानी लढाऊ विमानांनीच सुरक्षित बाहेर काढले होते. तालिबान अगदी नियमितपणे नसेल पण कधीकधी जीएचक्यू (GHQ) रावळपिंडीतून येणाऱ्या सूचना पाळतं का?
A: ते खरे नाही. इस्लामिक अमीरात स्वतंत्र आहे. आपल्या लोकांच्या मूल्यांचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी ते जिहाद करत आहेत.म्हणूनच अफगाणिस्तानातील मुस्लिम लोक आपल्या पाठीशी उभे आहेत.
भारतीय विमानाच्या अपहरण संदर्भात बोलायचं झालं तर या घटनेत इस्लामिक अमिरातीने भारताला मदतच केली होती आणि अपहरण केलेल्या प्रवाशांना वाचवून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुक्त केले होते. त्यावेळच्या भारतीय अधिकाऱ्यांनी आणि माध्यमांनीही याचा उल्लेख केला आहे.
भारतीय विमानाचे अपहरण हे भारत ते अफगाणिस्तान असे केले गेले नव्हते तर ते प्रथम अमृतसरमध्ये उतरले, नंतर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये, नंतर दुबईमध्ये आले आणि शेवटी ते दुबईहून कंधार येथे दाखल झाले. सर्व प्रवाशांच्या जीवनास प्राधान्य इस्लामिक अमीरातने दिले होते, त्यांना सर्व सुविधा पुरविल्या गेल्या, सर्वकाही तत्कालीन भारत सरकारच्या आवश्यकतानुसार केले गेले आणि त्यांच्यासह यशस्वी वाटाघाटीनंतर ही समस्या सुटली.
 
 
Q: सध्याच्या तालिबानी नेतृत्वात असे वाटते का की त्यांच्या भूतकाळातील नेतृत्त्वाने घेतलेले काही निर्णय घ्यायला नको होते त्यातलाच मसूद अझरला मदत करण्याचाचा निर्णय ?
A: अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमीरातचे धोरण सुरुवातीपासूनच आम्ही कोणाच्याही अंतर्गत कामात हस्तक्षेप करणार नाही आणि इतरांना आमच्या प्रकरणात हस्तक्षेप करु देणार नाही असेच राहिले आहे. आम्ही आपल्या देशाचे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम करीत आहोत.
 
 
Q: लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या भारतविरोधी दहशतवादी संघटना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर करू देणार नाहीत याची तालिबान हमी कशी देईल?
A: अफगाणिस्तानची इस्लामिक अमीरात आपल्या धोरणानुसार कोणालाही अफगाण मातीचा उपयोग कोणाविरूद्ध करण्याची परवानगी देणार ​​नाही आणि दुसर्‍या कोणालाही आपल्या कार्यात हस्तक्षेप करू देणार नाही.
 
 
Q: स्वतंत्र मीडियाद्वारेही असे जाहीर केले जात आहे की, मुक्त झालेल्या तालिबानी कैदी परत येत आहेत आणि हिंसक कारवाईत भाग घेवून कराराचा भंग करत आहेत या बद्दल आपला काय प्रतिसाद असेल?
A: अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमीरातमधील सुटका केलेले कैदी घरी गेले आहेत आणि त्यांच्या कौटुंबिक कामात व्यस्त आहेत. अल्लाहच्या दयेने अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीमध्ये मोठ्या संख्येने मुजाहिदीन आहेत. रणांगणावर त्यांची आवश्यकता नाही.
काबुल प्रशासनाने सबबी सांगून काही घरबंद लोकांना ताब्यात घेतले व छापे आणि बॉम्बस्फोटात शहीद केले ही काबूल प्रशासनाची समस्या आहे.
अफगाणिस्तानात दररोज एक-दोन प्रांतांमध्ये नागरीकांना मरणाला सामोरे जावे लागते आणि याची पुष्टी संयुक्त राष्ट्र आणि विविध मानवतावादी संघटनांनी केली आहे.
इस्लामिक अमीरातने अलीकडेच काबुल प्रशासनात शहीद झालेल्या किंवा दुसऱ्यांदा इस्पितळात किंवा प्रांतांमध्ये फिरताना अटक केलेल्या कैद्यांची यादी दिली आहे. अशावेळी प्रत्येकाला स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार आहे.
 
 
Q: अफगाणिस्तानातील लोकांबरोबर भारताची पूर्वापार चालत अलेली सद्भावना लक्षात घेता तालिबान्यांना भारत सरकारकडून काय अपेक्षा आहे?
A: अफगाणिस्तानातील लोक ४० वर्षांहून अधिक काळ युद्धाजन्य परिस्थितीचा सामना करत आहेत आणि आता त्यांना शांततेची आणि समृद्धीची जास्त गरज आहे.
आपल्या सर्व शेजारी आणि इतर देशांकडून आशा ही आहे की अफगाण लोकांना देशाचे स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि देशाच्या पुनर्बांधणीत जितकी शक्य होईल तितकी मदत आणि सहकार्य ते करतील.
 
 
Q: अफगाणिस्तान शांतता प्रक्रियेत सहकार्य मिळवण्यासाठी संबंधित भारतीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तालिबानी नेतृत्व पुढाकार घेईल का?
A: अफगाणिस्तानची इस्लामिक अमीरात आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आपल्या लोकांच्या कल्याणासाठी फायदेशीर असलेल्या सर्व प्रयत्नांचे व सहाय्याचे स्वागत करते.
अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमीरातला आपल्या शेजारील देशांशी आणि जगाशी सकारात्मक संबंध ठेवायला नक्कीच आवडेल.