चायनीज कम्युनिस्ट पार्टीची काळीकुट्ट शंभरी
         Date: 09-Jul-2021

 

चायनीज कम्युनिस्ट पार्टीची काळीकुट्ट शंभरी.

 

- प्राची चितळे जोशी.

 

चायनीज कम्युनिस्ट पार्टीला ( CCP ) १ जुलैला १०० वर्ष पूर्ण झाली. चीनमध्ये याचं सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं. ट्विटरवर या सेलिब्रेशन विरोधात #100YearsOfDarkness हा हॅशटॅग जोरात चालला. चायनीज कम्युनिस्ट पार्टी विरुद्ध अनेक लोकांनी या हॅशटॅग अंतर्गत मोहीम चालवून या पार्टीची काळी बाजू जगासमोर मांडलीय. चायनीज कम्युनिस्ट पार्टीने या १०० वर्षात जगाला काय दिलं त्याचा आपण आढावा  घेऊया.

 

१९८९ मध्ये या पार्टीच्या अत्याचाराविरुद्ध लोकशाही आणि मानवाधिकार यासाठी तियानानमेन स्क्वेअरवर चीनमधील जवळपास ४०० शहरातील लाखोंच्या वर विद्यार्थी आंदोलन करण्यासाठी जमले. यांचे आंदोलन पार्टीला घातक असल्याने पार्टीने निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांची निर्घृणपणे हत्या करून हे आंदोलन चिरडले.

 

चीनमध्ये माणसाच्या अवयव प्रत्यारोपणाचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार चालतो. अवयव प्रत्यारोपणाची चीन ही मोठी बाजारपेठ आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणात अवयव चीनकडे कसे काय उपलब्ध होतात? चीनमध्ये अनेक राजकीय कैदी आहेत. पण त्या कैद्यांचा पुढे काय होतं हे त्यांच्या नातेवाईकांना माहीतही नसतं. अनेक उयघूर मुस्लिम्स, ख्रिश्चन, तिबेटियन याना त्यांच्या अवयवांसाठी ठार मारले जाते. त्यांचे अवयव काढून घेतले जातात. केवळ चिनी नसलेल्या लोकांवरच असे अत्याचार होतात असं नाही तर चिनी फालुन गॉंग या आध्यात्मिक प्रथेमध्ये असलेल्या लोकांना अचानक गायब करण्यात येतं. पुढे त्यांचा शोध लागत नाही. या लोकांचे अवयव काढून घेऊन त्यांना मारून टाकण्यात येतं. चीनमध्ये दरवर्षी १ लाखाच्यावर इंद्रिय प्रत्यारोपण शस्त्रक्रियांची नोंद आहे. शिवाय इंटरनॅशन मार्केट आहेच.

 

सीरिया आणि उत्तर कोरियाच्या बरोबरीने मानवी तस्करीमध्ये चीन अव्वल क्रमांकावर आहे. चीनमध्ये १२ वर्षाच्या आतील मुलांना उत्तर कोरिया, म्यानमार, व्हिएतनाम, मंगोलिया, पूर्व चीन इत्यादी अनेक देशांतून तस्करी करून आणले जाते आणि त्यांना जबरदस्तीने लैंगिक व्यापारात ढकलले जाते. यासाठी चीनमध्ये कोणताही कायदा केलेला नाही. १४ वर्षावरील मुलांना कायदेशीरपणे लैंगिक व्यापारात घेतले जाते. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने चीनला या कारणास्तव टियर-३ चा दर्जा दिलेला आहे. चीनमध्ये लैंगिक व्यापाराला आळा घालण्यासाठी कडक कायदे नाहीत.


ccp_1  H x W: 0
 

समुद्रामध्ये अमर्याद मासेमारी करून तेथील जैवविविधतेला मोठा धोका चीन पोचवतंय. जगातील सर्वात मोठा, १७००० जहाजांचा ताफा समुद्रात उभारून बेकायदेशीरपणे अनियंत्रित मासेमारी करून सागरी संपत्तीचा ऱ्हास चीन करतंय. जगातील सगळ्यात मोठं आणि वाढतं अवैध व्यापाराचं वन्यजीव प्राणीमार्केट चीन चालवतं. 

 

चीन उयघूर मुस्लिमांवर करत असलेले अत्याचार सर्वश्रुत आहेत. तरीही त्यावर एक नजर टाकूया.

चीनमध्ये मुस्लिम धर्मियांना कोणतेही धार्मिक स्वातंत्र्य नाही. त्यांना त्यांच्या धर्माची ओळख असलेली टोपी घालण्यास सुद्धा मज्जाव आहे. लाखो लोकांना बंदी बनवून त्यांना सुधारणा छावणीत टाकण्यात येते. तिथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात. स्त्रियांवर सर्रास बलात्कार करण्यात येतात. त्यांना गर्भपात करण्यास भाग पाडले जाते. अनेकांना गुलाम म्हणून राबविण्यात येते. त्यांना आपले अवयव दान करण्यास जबरदस्ती केली जाते.

 

चीनची महासत्ता बनण्याची अभिलाषा आपण जाणतोच. त्यासाठी कोणत्याही थराला चीन जात आहे. हाँगकाँग, मकाऊ, मांचुरिया, पूर्व तुर्कस्तान, मंगोलिया, शॅक्सगम, अकसाई चीन, द पामीर व्हॅली, तिबेट या सर्व ठिकाणावर चीनने अतिक्रमण केले आहे. भारताच्या अरुणाचल प्रदेशावर चीन आपला दावा केव्हापासून ठोकतोय. तैवान आणि साऊथ चायना सी वर सुद्धा चीन दावा करतोच आहे. तैवानला सतत हल्ल्याच्या धमक्या देऊन चीनने जेरीस आणलंय.

 

अनेक देशांना मोठ्या प्रमाणात कर्ज देऊन त्यांना आपले मांडलिक बनवलंय. बेल्ट अँड रोड प्रकल्पाच्या नावाखाली अनेक देशांमध्ये अधिकृत घुसखोरी करून त्यांची नैसर्गिक साधनसंपत्ती चीन लुटतंय. देशाचा विकास होईल या प्रलोभनाखाली अनेक देश चीनच्या अधीन झाले आहेत.

 

आपल्या शेजारील देशात वॉटर डिप्लोमसी करून कृत्रिमरीत्या ओला किंवा सुका दुष्काळ करण्यात चीन वाकबगार आहे. अंहुई, युनान आणि तिबेट मधील नैसर्गिक स्त्रोतांचे मोठ्या प्रमाणात शोषण करून तेथील पर्यावरणाला चीन खूप मोठा धोका पोचवतोय.

 

अनेक देशांची महत्त्वाची आणि गुप्त माहिती नवीन तंत्रज्ञानाने हॅक करून चीनने आजवर त्या देशांना खूप मोठा धोका निर्माण केला आहे.

 

आणि......

 

चीनमुळे आलेलं महामारीचं संकट तर या सगळ्यावरचा कळस आहे.

 

१०० वर्षात चिनी कम्युनिस्ट पार्टीने केवळ हुकूमशाहीच केली आहे. मानवी हक्क, स्वातंत्र्य, स्वायतत्ता हे शब्दच चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या शब्ब्दकोशात नाहीयेत. अनेक गोष्टी इथे नमूद केल्या नाहीयेत. थोडक्यात सांगायचे तर चीन हा संपूर्ण जगाला धोका आहे.