भारतीय हवाई दलात फेब्रुवारी पासून चिनूक हेलिकॉप्टर्सचा समावेश होणार.
         Date: 30-Nov-2018

भारतीय हवाई दलात फेब्रुवारी पासून चिनूक हेलिकॉप्टर्सचा समावेश होणार.

 

बोईंग या अमेरिकन कंपनीने बनविलेली सीएच-४७ चिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स फेब्रुवारी महिन्यापासून आपल्या हवाई दलात समाविष्ट होण्यास सुरुवात होणार असल्याचे वृत्त आहे.

 

ही हेलिकॉप्टर्स भारतात येतील तेव्हा त्यांची जोडणी पूर्ण झालेली नसेल. गुजरात मधील ओखला या बंदरावर जहाजांमधून त्यांची पाठवणी करण्यात येणार आहे. ओखलाच्या आसपासच अमेरिकनांकडून खास या हेलिकॉप्टर्स साठी एका जुळवणी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. ओखला बंदरावर उतरविण्यात आलेली हेलिकॉप्टर्स या प्रकल्पात आणून त्यांच्या जुळवणीचे काम पूर्ण करण्यात येईल. एकदा त्यांची चाचणी परीक्षा पार पडली की मग लगेचच ती आयएएफ च्या ताब्यात देण्यात येतील.


 

सर्व चाचण्या पार पडल्या की ही हेलिकॉप्टर्स चंदीगढच्या दिशेने भरारी घेतील. त्यानंतर त्यांना कायमस्वरूपी चंदीगढच्याच तळावर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच तेथे दोन हँगर्स आणि देखभाल व दुरुस्ती विभाग उघडण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथे टेक्निकल व लॉजिस्टिक फॅसिलिटीज देखील उपलब्ध करून दिल्या जातील.

 

सप्टेंबर २०१५ मध्ये भारताने यूएस बरोबर १५ चिनूक हेलिकॉप्टर्स आणि २२ अपाचे हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा करार केला होता. यातील अपाचे हेलिकॉप्टर्स मात्र देशात इतरत्र तैनात केली जातील.

 

ही हेलिकॉप्टर्स कंटेनर्स मधून समुद्रीमार्गे पाठविण्यात येणार आहेत त्यामुळे सर्वच्या सर्व हेलिकॉप्टर्स एक किंवा दोन कन्साईनमेंट्समध्ये भारतात पोहोचतील. दुसरा पर्याय होता एएन-१२४ सारख्या महाकाय सामानवाहू विमानांचा वापर करणे. परंतु त्यात ही सर्व हेलिकॉप्टर्स भारतात पोहोचण्यासाठी अनेक फेऱ्या घालाव्या लागल्या असत्या. अर्थात ते वेळखाऊ काम होते. तसे पाहिले तर आयएएफ साठी बनविण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या चिनूक हेलिकॉप्टरने आकाशात भरारी घेतलेली आहेच, पण ती जून महिन्यात यूएस येथे. मागील महिन्यात आयएएफ च्या चार वैमानिक आणि चार तंत्रज्ञांनी चिनूक हेलिकॉप्टर्सच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेतील डेलावेअर येथील प्रशिक्षण केंद्रास भेट दिली.

 

सुमारे १० टन वजन उचलण्याची चिनूक हेलिकॉप्टर्सची क्षमता असून त्यामुळे वजनी सामानाची ने-आण करण्यात अडचणींचा सामना करणाऱ्या आयएएफ साठी ही हेलिकॉप्टर्स फारच उपयोगी ठरतील. आतापर्यंत या कामासाठी सोव्हियत बनावटीच्या एमआय२६आय या हेलिकॉप्टर्सचा वापर केला जात होता. ही हेलिकॉप्टर्सदेखील चंदिगढ येथेच तैनात आहेत. आयएएफ च्या सेवेत एकेकाळी चार एमआय२६आय हेलिकॉप्टर्स तैनात होती परंतु आता त्यापैकी केवळ एकच वापरायोग्य राहिले आहे. चिनूक हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने शस्त्रास्त्रे, वाहने, रस्ते बांधणीसाठी लागणारी तसेच अभियांत्रिकी कामांसाठी लागणारी उपकरणे याचबरोबर सैनिक आणि त्यांना लागणाऱ्या साधन सामुग्रीची ने-आण करणे यापुढे सोप्पे होणार आहे. विशेष करून उत्तर आणि ईशान्येकडील दुर्गम डोंगराळ प्रदेशात.

 

तसे पाहिले तर चंदिगढ शहरासाठी चिनूक हेलिकॉप्टर्स काही नवीन नव्हेत. २०१५ साली नेपाळ येथे पूर आला असता तेथील मदतीसाठी युकेच्या ब्रिटिश रॉयल एअर फोर्स ची तीन चिनूक हेलिकॉप्टर्स हवाईमार्गे चंदिगढ येथेच आणण्यात आली होती व तेथून त्यांनी त्यानंतर नेपाळच्या दिशेने उड्डाण केले. त्यांची जुळवणी पूर्ण होऊन उड्डाण चाचणी पूर्ण होईपर्यंत त्यांनी चंदीगढमध्येच काही दिवस मुक्काम ठोकला होता.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: The Tribune.

Chinook delivery to start in Feb.