नुरानांग बॅटल:- अविस्मरणीय शौर्यगाथा !!!
         Date: 18-Dec-2018
 नुरानांग बॅटल:- अविस्मरणीय शौर्यगाथा !!!
 

Heroes get Remembered, Legends never die....

 

किती खरे आहे ना? आणि आपल्या सैनिकांना तर हे अगदी चपखल बसतंय; ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिलाय. अश्याच या वीरांपैकी एक नाव आहे 'जसवंत सिंग'. हे नाव ऐकल्यानंतर मी जसजशी इंटरनेट चाळत गेले तसतशी या नावाभोवती गुंफलेल्या अनेक अधिकृत-अनधिकृत कहाण्या मला सापडत गेल्या. त्यातल्याच काही गोष्टी तुमच्यासमोर मांडण्याचा हा माझा एक प्रयत्न.

 

रायफलमॅन जसवंत सिंग रावत यांच्या पराक्रमाची गाथा दोन प्राथमिक दृष्टिकोनातून सांगितली जाते. एक आहे स्थानिकांच्या मुखातून येणारी तर दुसरी आहे अधिकृत सरकारी सूत्रांकडून. आपण दोन्ही बघुया.

 
 

तर ही गोष्ट आहे १९६२ च्या भारत आणि चीन यांच्यामधील युद्धाची. सामान्य भारतीय नागरिकाला विचारले तर त्याला एवढेच आठवते की या युद्धात आपला पराभव झाला होता. पण या पराभवातही एक सोनेरी अक्षरात लिहून ठेवावी अशी घटना घडली होती आणि ती म्हणजे 'बॅटल ऑफ नुरानांग'. हेच ते युद्ध ज्यामुळे अरुणाचल प्रदेश आजही भारताचा भाग आहे, चीनचा नव्हे.

 

स्थानिकांच्या मुखातून....

१७ नोव्हेंबर १९६२ रोजी पहाटे पहाटे या युद्धाला सुरुवात झाली होती आणि पुढचे ७२ तास ते चालू होते. '४ गढवाल रायफल्स'ना वारंवार चिन्यांच्या हल्ल्याचा सामना करावा लागत होता. या आधीचे दोन हल्ले परतवून लावण्यात त्यांना यश आलेले असले तरीही चिन्यांची तिसरी चढाई मात्र महाभयंकर होती. '४ गढवाल रायफल्स' ना माघार घेण्याचे आदेश मिळाले होते परंतु तरीही येथे काहीतरी खास होते. असे काहीतरी घडत होते ज्याची कल्पनाही चिन्यांनी केली नव्हती. ४ गढवाल रायफल्सचा रायफलमॅन जसवंत सिंग रावत हा त्यांची वाट अडवून उभा होता. संपूर्ण बटालियन पोस्ट सोडून गेली असली तरी जसवंत सिंगने एकट्याने पोस्टवर थांबून लढण्याचा निर्णय घेतला होता. काही स्थानिकांच्या मते त्याला या कामात 'सेला' आणि 'नुरा' नावाच्या दोन मोंपा मुलींनी मदत केली तर काहींच्या मते ती गावातील 'बूम ला' नावाची एक स्त्री होती. सतत ३ दिवस त्यांनी शत्रूला वर येऊ दिले नाही. संपूर्ण पोस्टवर निरनिराळ्या ठिकाणी बंदुका ठेऊन त्याद्वारे जसवंत सिंगने सतत गोळीबार चालू ठेवला होता. विशेष म्हणजे या बंदुका त्याने अश्या प्रकारे रचल्या होत्या की चिन्यांना पोस्टवर नक्की किती भारतीय सैनिक आहेत याचा अंदाजच येत नव्हता. अर्थातच हा सगळा विरोध केवळ एका व्यक्तीकडून होतोय असा विचारही ते करू शकत नव्हते. मदतनीस स्त्रियांनी या बंदुकांमध्ये गोळ्या भरण्याचे काम केले. अर्थातच चिन्यांना हा विश्वास बसला की पोस्टवर अजूनही बरेच भारतीय सैनिक शिल्लक आहेत. परंतु दुर्दैवाने जसवंत सिंगांस दारुगोळा पुरविणारा माणूस चिन्यांच्या हाती लागला आणि खरी परिस्थिती समजल्यावर संतापाने खदखदणाऱ्या चिनी सैनिकांनी आता मात्र पूर्ण ताकदीनिशी हल्ला चढविला. 'सुला' चा एका बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाला, 'नुरा'ला चिन्यांनी ताब्यात घेतले आणि जसवंत सिंगांनी मात्र शिल्लक असलेल्या शेवटच्या गोळीने स्वतःचे जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. चिन्यांना त्यांना मूर्ख बनविले गेल्याचा इतका संताप आला होता की त्यांनी जसवंत सिंगांचे शीर कापून धडापासून अलग केले व आपल्यासोबत घेऊन गेले. परंतु असे म्हटले जाते की तोपर्यंत जसवंत सिंगांनी एकट्याने सुमारे ३०० पेक्षा जास्त चिनी टिपले होते.

 

सरकारी वृत्त.

१७ नोव्हेंबर १९६२ रोजी भारत चीन युद्धाच्या समाप्तीमधील शेवटचे ७२ तास सुरु झाले होते. अरुणाचल प्रदेशमधील नुरानांगवर चिनी सैनिकांचे वारंवार हल्ले होत होते. त्यांनी यापूर्वी मोंपासारखे कपडे घालून घुसखोरी करण्याचा प्रयत्न पण केला होता पण तो परतवून लावण्यात भारतीयांना यश आले होते. परंतु त्यानंतरचे त्यांचे दोन हल्ले अधिक जोरकस होते. यावेळी त्यांनी अधिक दारुगोळ्यासह चढाई सुरु केली होती. भारतीय लष्कराच्या सूत्रांनुसार त्याच्या चौथ्या हल्ल्याने जसवंत सिंगांच्या शौर्यगाथेस जन्म दिला.

 

चिन्यांचे उद्दिष्ट अतिशय स्पष्ट होते. कसेही करून नुरानांग वर चढाई करून तो ताब्यात घेणे. त्यासाठी त्यांनी ४ गढवाल रायफल्स ज्याठिकाणी तैनात होती त्याच्या अगदी जवळच्या अंतरापर्यंत एमएमजी (मेडीयम मशीन गन) घेऊन जाण्यात यश मिळविले होते. आता एमएमजीच्या साहाय्याने त्यांनी भारतीय सैनिकांवर अतिशय महाभयंकर असा गोळ्यांचा वर्षाव सुरु केला होता. पण त्यांना हे ठाऊक नव्हते की हीच एमएमजी पुढील काही तासातच त्यांच्याच अंगावर आग ओकणार होती.

 

या एमएमजीमुळे ४ गढवाल रायफल्सच्या जवानांना त्यांच्या लाईट मशीन गन्सचा वापर करणेही कठीण झाले होते. अश्यावेळी लान्स नाईक त्रिलोक सिंग, रायफलमॅन जसवंत सिंग आणि रायफलमॅन गोपाळ सिंग या तीन शूर जवानांनी एका अत्यंत साहसी परंतु जवळपास आत्मघातकीच अश्या मोहिमेवर जाण्याचा निर्णय घेतला. वाटेतील खडक आणि झुडपांचा आडोसा घेत सरपटत त्या एमएमजीच्या जवळ जाऊन पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर त्रिलोक सिंग यांनी पुरविलेल्या कव्हरिंग फायरच्या मदतीने जसवंत सिंग आणि गोपाल सिंग या दोघांनी केवळ १५ यार्ड इतक्या कमी अंतरावरून हॅन्ड ग्रेनेड्स फेकून ती निष्क्रिय करण्यात यश मिळविले सुद्धा. त्यानंतर जसवंत सिंग यांनी स्वतः तेथे जाऊन अजूनही ती एमएमजी हातात घेऊन झगडणाऱ्या जखमी चिनी सैनिकांशी झटापट करून ती ताब्यात घेतली आणि परत सरपटत आपल्या खंदकाजवळ परतले. जर या कामात त्यांना यश मिळाले असते तर ती एक अनोखी अशी गाथाच बनली असती परंतु असे होणे नियतीला मंजूर नव्हते. खंदकाच्या अगदी जवळ पोहोचलेले असतानाच शत्रूच्या एका गोळीने त्यांच्या मस्तकाचा वेध घेतला आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्याच बरोबर त्रिलोक सिंग देखील अश्याच प्रकारे शत्रूच्या गोळीला बळी पडले. परंतु तोपर्यंत चिन्यांना मोठा धक्का बसलेला होता आणि गोपाल सिंग यांनी मात्र ती एमएमजी खंदकात आणण्यात यश मिळविले.

 

असे म्हणणे अजिबात चुकीचे ठरणार नाही की केवळ १५ मिनिटांच्या त्या साहसी कार्याने नुरानांग युद्धाचा पूर्ण रोखच पालटला. पुन्हा एकदा भारतीय सैनिकांच्या लाईट मशीन गन्स धडधडू लागल्या आणि आता मात्र चिन्यांना सपशेल माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर पुन्हा कधीही अरुणाचल प्रदेशावर ताबा मिळविणे चिनी सैनिकांना शक्य झालेले नाही.

 

या झाल्या प्रसिद्ध नुरानांग बॅटल च्या दोन कहाण्या. अश्या आणखीही अनेक आहेत. अर्थातच प्रत्येक कहाणी काही नवीन पैलू त्यात दाखविते आणि ती रचणाऱ्यांच्या दृष्टीने ते सर्व त्या त्या वेळी पटणारेही असते. काहीही असले तरीही नूरानांग येथे भारतीय जवान आणि चिन्यांमध्ये एक फार मोठी धुमश्चक्री उडाली होते हे खास आणि त्यामध्ये भारतीयांनी पराक्रमाची शर्थ करून चिन्यांना परतवून लावण्यात यश मिळविले होते हे देखील तितकेच खरे.

 

ज्या ठिकाणी जसवंत सिंग आणि त्यांच्या साथीदारांनी हा लढा दिला होता त्या ठिकाणास आता जसवंतगड असे नाव देण्यात आले आहे आणि आज जसवंत सिंगांना तेथील लोक जसवंत बाबा या नावाने ओळखतात. त्यांच्या काही खाजगी गोष्टी आजही तेथे जपून ठेवण्यात आलेल्या आहेत. स्थानिकांमध्ये अशी भावना आहे की आजही जसवंत सिंग यांचा आत्मा या जागेचे रक्षण करण्यासाठी येथे तैनात आहे. असो. मी म्हटल्याप्रमाणे अनेक कहाण्या आहेतच.

 

यानंतर १९६२ च्या युद्धातील एकमेव शौर्य पुरस्कार हा ४ गढवाल रायफल्सना देण्यात आला. जसवंत सिंग यांचे साथीदार लान्स नाईक त्रिलोक सिंग (मरणोत्तर) आणि रायफलमॅन गोपाल सिंग यांना वीरचक्र तर रायफलमॅन जसवंत सिंग रावत यांना मरणोत्तर महावीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

-प्राची चितळे जोशी.

ICRR Content Generation.