जैसी करनी वैसी भरनी.
         Date: 06-Mar-2019

 जैसी करनी वैसी भरनी.

 

पुलवामाचा डाव त्यांच्यावरच उलटला.

 

गेल्या काही महिन्यातील पाकिस्तानच्या हालचाली पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की पुलवामाचा हल्ला एक विशिष्ट उद्देश मनात ठेऊन करण्यात आला होता. जाणूनबुजून भारताला उसकवायचे जेणेकरून तो काहीतरी चुकीचे पाऊल उचलेल असे पाकिस्तानला वाटत होते. सर्जिकल स्ट्राईकद्वारे उरीच्या हल्ल्याचा प्रतिशोध भारताने घेतला की ही फक्त हवा होती अशी शंका लोकांच्या मनात निर्माण करण्यासाठी खेळलेली ही खेळी होती. उरी या चित्रपटामुळे पाकिस्तान आधीच खवळले होते.

 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनंतर भारताने दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचा प्रस्ताव नाकारला. तसेच सार्क परिषदेला उपस्थित राहण्याचे सुद्धा नाकारले. त्यामुळे पाकिस्तानात भारतविरोधी वातावरण तापले.

 

राजकीय कूटनीतीचा भाग म्हणून पाकिस्तान दरवर्षी काश्मीर एकता दिवस साजरा करतो. परंतु या वर्षी मात्र पाकिस्तानने लंडनमध्ये प्रथमच या विषयावर एक सेमिनार घेतले. थोडक्यात आंतरराष्ट्रीय समुदायाचे या विषयावरील लक्ष हटविण्याच्या उद्देशाने ब्रिटिशाना साकडे घालण्याचा पाकिस्तानचा डाव होता. प्रत्येक मंचावर काश्मीर प्रश्न उकरून काढून भारताविषयी द्वेष पसरविणे हेच पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचे उद्दिष्ट होते. काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी त्यांनी यूएनच्या महासचिवांनाही पत्र लिहिले.

 

आर्थिकदृष्ट्या पाकिस्तान पार रसातळाला गेला आहे. पाकिस्तानच्या रुपयात प्रचंड प्रमाणात घसरण झाली आहे. एका डॉलरच्या तुलनेत १४० पाकिस्तानी रुपये अशी अवस्था आहे. आणि आयातीसाठी फक्त दोन महिने पुरतील एवढेच पैसे पाकिस्तानकडे शिल्लक आहेत. असे असूनही त्यांच्या चालू वर्षाच्या बजेटमध्ये ३२ टक्के संरक्षण खर्चासाठी दिले गेले आहेत. आणि जास्तीतजास्त भाग हा कर्जाच्या भरपाईसाठी राखून ठेवण्यात आला आहे. सौदी अरेबिया आणि युएई यांच्याकडून आलेला निधी चीनच्या कर्जाची परतफेड करण्यातच निघून जातो आहे. देशाच्या कल्याण आणि विकासावर खर्च करण्यासाठी निधीच शिल्लक नाही.

 

पाकिस्तानी लष्कराने अलीकडेच अनेक शस्त्रप्रणालींच्या चाचण्या घेतल्या. नुकतेच त्यांनी नासर रणनैतिक अणु मिसाईलची चाचणी घेतली. पाकिस्तानचा एकमेव शत्रू म्हणजे भारत. आणि म्हणूनच भारताला लक्ष्य करणे हेच एकमेव उद्दिष्ट त्यांच्यापुढे आहे. भारताकडून असलेल्या वाढत्या धोक्याच्या भीतीमुळेच त्यांच्या बजेटमध्ये वाढ झाली आहे.

 

उरी हल्ल्यानंतर भारताने त्याचा बदला घेण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केले या भारताच्या दाव्याला पाकिस्तानने फेटाळून लावले. आणि हा सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही असे भासविण्यासाठी पाकिस्तानी मीडियाला हाताशी धरले. इतके प्रयत्न करूनही अनेक पाकिस्तानी नागरिकांचा स्वतःच्याच सरकारवर विश्वास बसला नाही. तसेच, एलओसी आणि बलुचिस्तानमध्ये होणाऱ्या नुकसानांबद्दल मीडिया एक चकार शब्दही काढत नाही.

 

म्हणूनच आम्ही भारतीय सुरक्षा दलावर अंतर्गत हल्ला करू शकतो हे दाखविण्यासाठी पुलवामाचा हल्ला त्यांनी घडवून आणला. भारत एकट्या पुलवामाचं कारण पुढे करून युद्ध घोषित करू शकत नाही याची जाणीव त्यांना होती. युद्ध घोषित करण्यासाठी याहून कितीतरी पटीने भीषण दहशतवादी हल्ल्यांची गरज आहे हे त्यांना माहित होते.

 

अफगाणिस्तानातील पाकिस्तानी राजदूताने असाही इशारा दिला होता की जर भारताकडून कोणताही स्ट्राईक झाला तर त्याचे पडसाद अफगाणिस्तान शांतता वार्तेवर होतील. त्याच्या या वक्तव्यावरून अफगाण सरकारने त्याची चांगलीच खरडपट्टी काढली होती. पुलवामानंतर वाढत्या तणावाला कमी करण्यासाठी त्यांच्या परराष्ट्र मंत्र्याने यूएनला मध्यस्थी करण्यासाठी दोन वेळा पत्रं देखील लिहिली. भारताने दोघांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी तिसर-याची मागणी धुडकावून लावल्यामुळे प्रत्येक पत्रात भारताविरुद्ध चिथावणीचीच भाषा वापरली गेली.

 

पाकिस्तान लष्कर संघटित केले गेले आणि सगळ्या हॉस्पिटल्सना युद्धातील जखमींसाठी बेड ठेवण्याची पत्रे पाठविली गेली. यात अगदी बलुचिस्तानमधील हॉस्पिटल्सचा देखील समावेश आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी एलओसीच्या भेटीवर गेले असताना भारताला चेतावणी दिली. भारत नक्कीच काहीतरी हालचाल करेल या संबंधी पाकिस्तानला खात्री होती. 

 

म्हणूनच, हे स्पष्ट होतेय की हा आत्मघाती हल्ला भारताच्या लष्कराची प्रतिक्रिया आजमावण्यासाठीच संपूर्ण तयारीनिशी आखण्यात आला. भारताने काही कारवाई करण्याआधीच पाकिस्तान संघटित व्हायला लागला होता. गेल्यावेळसारखी परिस्थिती उद्भवायच्या आधी पाकिस्तानला तयारीत रहायचे होते. भारतात आता निवडणुकीचे वारे वहात आहेत. अश्यापरिस्थितीत भारताला प्रत्युत्तर देण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरत नाही.

 

भारताचा असा प्रतिसाद पाहून पाकिस्तान धक्क्यातून सावरले नाहीये. झालेल्या नुकसानासोबतच अतिशय अपमानास्पद वागणूक पाकिस्तानला मिळाली आहे. जेव्हा भारताने जाहीर केले की त्यांनी ज्या तळांविषयी पाकिस्तानला पुरावे दिले होते आणि तिथे असे तळच नाहीत असे पाकिस्तानने छातीठोकपणे सांगितले होते तेच तळ भारताने उध्वस्त केले. हवाई हल्ला होईल असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते. ते सर्जिकल स्ट्राईक साठी तयार होते. पण एअर स्ट्राईक होईल असे त्यांना वाटले नव्हते. बरं, हा स्ट्राईक झाला तो अगदी पाकिस्तानच्या भूमीत अगदी आतपर्यंत शिरून झाला. त्यामुळे त्यांना भारताने एलओसी ओलांडली हे तरी कमीत कमी कबूल करावे लागले.

 

भारताच्या विमानांना पाकिस्तानी हद्दीत घुसू देऊन पुन्हा सुखरूप परत जाऊ देण्याच्या पाकिस्तानी हवाई सुरक्षा दलाच्या अपयशाच्या कारणांची मिमांसा पाकिस्तानने केली नाही. या एअरस्पेसच्या उल्लंघनाच्या गोष्टीला किती वाढवायचे किंवा त्याचा कसा सूड घ्यायचा याचा विचार करण्यापेक्षा आपली इज्जत कशी वाचवायची याचा विचार पाकिस्तानने करणे आवश्यक आहे. असे असले तरी पाकिस्तानने वेगवेगळ्या प्रकारची २४ विमाने लॉन्च करून आपली ताकद दाखवायचा प्रयत्न केला आहे.

 

आठ भारतीय विमानांनी पाकिस्तान्यांची झोप उडविली आहे. खात्रीशीर लढाईत त्यांनी आपले F16 आणि MIG21 बायसन विमान गमाविले. असे असले तरी या हल्ल्यात त्यांनी भारतीय पायलटला मात्र ताब्यात घेतले. पाकिस्तान भारतीय लष्कराच्या ठाण्यांना लक्ष्य करीत असल्याच्या भारताच्या आरोपामुळे पाकिस्तान चिंतेत आहे. परंतु याची सुरुवात पाकिस्तानने केल्यामुळे प्रतिशोध घेण्याचा हक्क भारताकडे रहातो.

 

या सर्व भीतीमुळे त्यांना भारतीय पायलटला सुखरूप भारताकडे सुपूर्त करणे आणि शांततेच्या गप्पा करणे भाग पडले. पाकिस्तानने काय योजलं होतं आणि काय झालं. त्यांचे फासे त्यांच्यावरच उलटले. ते सतत असे काही झाले नाही असेच सांगत आहेत. परंतु प्रत्यक्ष जे नुकसान झाले आहे तेच सर्व काही बोलून दाखवत आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानने स्वतःच्या नागरिकांपासून त्यांच्या F16 विमान अपघाताची आणि पायलटच्या मृत्यूची बातमी देखील लपवून ठेवली. आपल्या देशासाठी प्राण अर्पण केलेल्या जवानांचा हे पाकिस्तानी कधी मान ठेवतील? दुसऱ्यासाठी जेव्हा आपण खड्डा खणतो तेव्हा त्यात आपणच पडतो ही गोष्ट ते कधी शिकणार? किती काळ ते लोकांपासून सत्य लपवून ठेवणार? एक ना एक दिवस ते जगासमोर येतंच.

 

 

-लेखक हर्ष काकर  भारतीय लष्करातील निवृत्त मेजर जनरल आहेत. त्यांच्या लेखाचा स्वैर अनुवाद.


-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: The Statesman

 

Pakistan’s Pulwama plan backfires.