बलुच स्वातंत्र्य, यहुदी हितसंबंध आणि इराणविरोधी महाआघाडीत पाकिस्तानची ससेहोलपट!
         Date: 22-Jul-2019
बलुच स्वातंत्र्य, यहुदी हितसंबंध आणि इराणविरोधी महाआघाडीत पाकिस्तानची ससेहोलपट!
 
(ICRR Af-Pak) 

 
गेल्यावर्षी पाकिस्तानी राजकीय क्षेत्र एका बातमीने ढवळुन निघालं, बातमी होती एका इस्रायली खाजगी विमानाच्या पाकिस्तान भेटीची. हे विमान इस्राईलहून निघुन अरबस्तान मार्गे पाकिस्तानच्या रावळपिंडी सैनिकी विमानतळावर उतरले आणि परत गेले अशी ती बातमी होती. पुढे इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू या विमानात होते अशीही अफवा पसरली. दोन्ही बाजुनी अनेक आरोप प्रत्यारोप होऊन अखेर हे वादळ शमलं.सौदी राजपुत्राच्या मध्यस्तीतुन इस्राएलसोबत संबंध स्थापित करण्याच्या बाबतीत पाकिस्तानी प्रजेची मानसिकता काय आहे हे जाणुन घेण्याचा हा एक प्रयोग होता असं या घटनेबाबतीत जाणकारांचं मत होतं.
 
 
या घटनेचा भाग दुसरा आता चालु आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पण ही साधारण अमेरिका भेट नाही. सध्या पाकिस्तान चीनच्या कुशीत शिरल्याने अमेरिका त्यांना काडीची किंमत देत नाही. पण पाकिस्तान प्रयत्न सोडत नाही. यावेळी पाकिस्तानने सौदी राजपुत्राला गळ घालुन ट्रम्पना पटवण्याचा प्रयत्न केला. राजपुत्राने त्याचा खासंखास अमेरिकी मित्र अर्थातच ट्रम्पचा यहुदी जावई जेर्ड कुशनर याला मध्ये घालुन इम्रानच्या अमेरिकी भेटीला परवानगी मिळवली. यासंदर्भात अरब न्यूज आणि एक्स्प्रेस ट्रिब्यून पाकिस्तान यांनी बातमी छापली. अशाप्रकारे अखेर काल इम्रानचा अमेरिकी दौरा सुरु झाला. यात काय हाती लागतं हा अगदी वेगळा मुद्दा आहे पण एक पाकिस्तानी नेता एका यहुदी व्यक्तीची जाहीर मदत घेतो ही मोठी घटना आहे.
 
 
जेर्ड कुशनर कोण आहे?
 
 
ट्रम्प यांची महत्वाकांक्षी मुलगी ईवांका ट्रम्प हिचा यहुदी उद्योगपती नवरा म्हणजे जेर्ड कुशनर. यांनाच ट्रम्प यांच्या नव्या मध्य-पूर्व धोरणाचा शिल्पकार मानतात. कुशनरच्या अथक प्रयासानेच अमेरिकेने इस्राएलमधील अमेरिकन दूतावास तेल अवीवमधुन जेरुसलेमला हलवण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर अन्य अनेक देशांनी आपले दूतावास जेरुसलेमला हलवले. पॅलेस्टाईनसाठी हा एक मोठा राजनैतिक आणि भावनिक धक्का होता. जेरुसलेम दोघांसाठी एक मोठा भावनिक मुद्दा असताना अमेरिकेने पॅलेस्टाईनच्या मताला काडीची किंमत नं देता हा निर्णय घेतला.
 
 
कुशनरचे कौशल्य एवढ्यापुरते मर्यादित नाही. त्यांनी पॅलेस्टिनी राजवटीचे सर्वात मोठे पाठीराखे असलेल्या सौदीच्या राजपुत्राला आपल्या गळाला लावुन त्याला "इस्राएल जे देत आहे ते घ्या आणि गप्प बसा" हे सांगायला भाग पाडले. हा पॅलेस्टाईन आणि सर्वच मुस्लिम जगतासाठी जबरदस्त मानसिक आघात होता. यानंतर काही महिन्यात रोज उठुन इस्राएल विरोधात फतवे काढणाऱ्या सौदीच्या मुख्य इमामाने (ग्रँड मुफ्ती) यहुदी/ इस्राएलविरोधात कुराणात कोणताही नकारात्मक उल्लेख नसल्याची ग्वाही दिली!!!
 
 
ही प्रादेशिक पुनर्बांधणी एवढ्यावर थांबत नाही. इराणचा वाढता प्रादेशिक प्रभाव एवढा भीतीदायक आहे की सौदी अरेबिया अजुन मोठ्या गतीने इस्राएलच्या प्रभावक्षेत्रात खेचला जात आहे. इराणियन रेव्होल्यूशनरी गार्ड्सचा सीरिया-इराक मधील अभूतपूर्व प्रभाव इस्राएलसाठी धोक्याची घंटा आहे. यामुळेच त्यांना कोणत्याही स्थितीत तिथुन उखडुन टाकण्यासाठी इस्राएल वाट्टेल ते करायला तयार आहे. लेबनीज शिया अतिरेकी संघटना हिजबुल्लाह सतत इस्राएलवर क्षेपणास्त्रांचा मारा करत असते. त्यांना इराणचा सक्रीय पाठींबा आहे यात शंका नाही. यामुळेच आपल्या आसपास इराणी सैन्य उपस्थिती कोणत्याही परिस्थितीत सहन करायची नाही अशी इस्राएलची नीती आहे. याशिवाय पारंपरिक ज्यूविरोधी अरब देशांमध्ये आपला सामरिक, सैनिकी, आर्थिक प्रभाव वाढवण्यासाठी इस्राएल आसुसलेला आहे. आणि इराणची भीती समोर असताना इस्राएल हे कमी वेळात साध्य करू शकतो यात शंका नाही.
 
 
शिया आर्कची सुन्नी अरबांना बसलेली भीती...
 
 
येमेन पासुन अधली मधली शिया जनसंख्या आपल्या कवेत घेऊन लेबनॉन-इस्राएलपर्यंत पोचणारा अर्धचंद्राकृती भाग म्हणजे काल्पनिक "शिया आर्क". याद्वारे इराण आपला सामरिक, सैनिकी प्रभाव पसरवून इस्लामी जगताचं नेतृत्व आपल्या हातुन खेचुन घेईल ही सुन्नी सौदीला असलेली भीती आहे. यामुळे जन्मोजन्म ज्या इस्राएलला पाण्यात बघितलं त्यालाच जवळ घ्यायला सौदी मागेपुढे बघत नाही. येमेनमध्ये शिया हौथी बंडखोरांना रसद पुरवून इराणने तिथली राजवट उलथवुन टाकली. त्याच्या विरोधात सौदीने पाकिस्तानचा निवृत्त सेनाप्रमुख जनरल राहील शरीफ यांच्या नेतृत्वाखाली इस्लामिक मिलिटरी अलायन्स बांधली. आणि या दोघांच्या संघर्षात आजपर्यंत १० लाखांच्या आसपास येमेनी मारले गेले आहेत. शिवाय ज्या हौथीना काही महिन्यात संपवून टाकु असं सौदीला वाटत होतं त्या हौथींनी सौदीला ज्या आर्थिक खड्ड्यात लोटलंय त्याला तुलना नाही. हे सर्व इराणच्या मदतीमुळे शक्य झालं हे सौदी जाणुन आहे.
 
 
इराणविरोधी इस्राएल-सौदी-अमेरिका महाआघाडी...
 
येमेनमध्ये कापलेलं नाक आणि सीरिया-इराकमधील इराणी प्रभाव यातून मार्ग काढण्यासाठी हे तीन देश सध्या इराणला अंगावर घेण्याची तयारी करत आहेत. पण यासाठी टोकाचा सैन्य संघर्ष कोणाच्याही फायद्याचा नाही. त्यामुळे ही नवीन "ऍक्सिस" राष्ट्रे पाकिस्तानच्या जमिनीचा वापर करण्याच्या मनस्थितीत आलेली दिसतात. पाकिस्तानव्याप्त बलुचिस्तानमधुन जैश-उल-अदल सारखे कट्टर सुन्नी इराणविरोधी अतिरेकी गट मोठ्या तयारीनिशी इराणमध्ये घुसवुन सतत रक्तपात करायचा आणि इराणला आपल्याच जमिनीवर सतत अडकवुन ठेवायचं अशी ही नवीन रणनीती आहे. दुसऱ्या बाजुने दोहा वार्तांमध्ये तालिबानला जवळ ठेऊन. हळूच त्यांचा वापर इराणविरोधात करायचा अशीही अमेरिकन रणनीती असु शकते.
 
 
स्वतंत्र बलुचिस्तानची मजबुत शक्यता...
 
जर या "ऍक्सिस" देशांना चिनी प्रभावामुळे, पाकिस्तानी भुमीवरुन इराणविरोधात सुन्नी अतिरेकी गट हाताळणं शक्य होत नाही असं दिसलं, तर "ऍक्सिस" देश बलुचिस्तानला स्वतंत्र करण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलतील. इराणच्या सीस्तान-बलुचिस्तान प्रांतात मोठ्या संख्येने बलुच राहतात त्यामुळे त्यावरही बलुच स्वतंत्रतावादी आपला नैसर्गिक दावा सांगतात. यामुळे "ऍक्सिस" ची बलुच योजना योग्य दिशेला जाऊ शकते. यात चीनला जर सिपेक मध्ये केलेली प्रचंड गुंतवणुक वाचवण्याच्या दृष्टीने बलुच लोकांशी जुळवुन घेणं आर्थिक फायद्याचं वाटलं तर चीनही ऍक्सिस राष्ट्रांजवळ सौदेबाजी करू शकतं. आणि एक वेळ अशी येऊ शकते की बलुचिस्तानमधील व्यावहारीक आणि सामरिक नियंत्रण पाकिस्तानच्या हातुन निसटुन तो ऍक्सिस देशांच्या हातात जाऊ शकतो.
 
 
पाकीस्तानची दशा अफगाणिस्तानसारखी होईल का?
 
इम्रान खानच्या अमेरिकन दौऱ्याच्या वेळी भारतीय माध्यमांनी पाकिस्तानचं वर्णन "मॅरेज विथ चायना अँड अफेयर विथ अमेरिकन्स" असं केलंय, ते बव्हंशी योग्यच आहे. नेमकी हीच स्थिती वास्तवात तयार होत आहे. अफगाणिस्तानमधून सोविएत रशियाला हाकलण्यासाठी अफघाण मुजाहिदीन स्वतःच्या जमिनीवर लढले. याकामी अमेरीकन आर्थिक- सैनिकी मदत आणि पाकिस्तानी प्रशिक्षण त्यांना मिळालं. भीषण रक्तपात करून आणि लाखो अफघाण आणि रशियन्सची आयुष्य संपवुन सोविएत शेवटी अफगाणिस्तान सोडुन गेले. या लढाईत अफगाणिस्तानची शब्दशः राखरांगोळी झाली. त्यानंतर युद्धात तावून सुलाखुन निघालेल्या मुजाहिदीन्समुळे अफगाणिस्तान जागतिक जिहादची राजधानी झाली. जलालुद्दीन हक्कानीच्या "हक्कानी नेटवर्क" च्या मुखपत्राचं नाव होतं "मानबाह ऊल जिहाद" म्हणजे जिहादचा स्रोत! खरोखरच अफगाणिस्तान जागतिक जिहाद्यांचे माहेरघर आणि मुख्य केंद्र झाला होता. नेमकी तिच स्थिती ऍक्सिस मुळे पाकिस्तानची होऊ घातली आहे.
 
 
ऍक्सिस देशांनी इराणविरोधात पाकिस्तानी जमिनीवरून मोठा मोर्चा उघडल्यास पाकीस्तानची स्थिती ४० वर्षांपूर्वीच्या अफगाणिस्तानसारखी होईल. आताच पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या मधील डुरंन्ड लाईनवर आणि बलुचिस्तान- इराण सीमेवर हजारो कट्टर सुन्नी मदरसे पसरलेले आहेत. हे मदरसे इस्लामी कट्टरतावाद अतिशय प्रभावीपणे मुलांच्या डोक्यात घुसवत आहेत. पाकच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेत ह्या मदरशांमध्ये शिकलेली कट्टर मुले ही उघड्या पेट्रोल टॅंकपेक्षा कमी धोकादायक नाहीत. या जोडीला पाकिस्तानात घसरलेलं औद्योगिक उत्पादन, वाढते प्रादेशिक संघर्ष, रुंदावणारी वांशिक दरी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वांशिक असंतोष दाबण्यासाठी पाकिस्तानी सेना करत असलेले भीषण अत्याचार यामुळे पाकिस्तान एक राष्ट्र म्हणुन एकत्र राहणं दुरापास्त आहे.
 
 
याचाच परिपाक म्हणुन जे छुपं युद्ध पाकिस्तान इस्राएल- सौदी- अमेरिका यांच्यावतीने मनापासुन किंवा अगतिकता म्हणुन इराणविरोधात सुरु करू पाहत आहे ते युद्ध प्रत्यक्षात इराणविरोधात नसुन पाकिस्तान विरोधात आहे ही वास्तविकता आहे.
 
 
बॅरिस्टर जिन्ना यांनी पाकिस्तानच्या स्थापनेच्या वेळी म्हटलं होतं कि जगातील कोणतीही शक्ती पाकिस्तानचं अस्तित्व आणि संकल्पना पुसुन टाकु शकत नाही; दुर्दैवाने १९७१ ती संकल्पना एकदा प्रखर बंगाली राष्ट्रवादाने पुसली आणि आता परत पश्तुन आणि बलुच राष्ट्रवादी पुसण्याची तयारी करत आहेत! पण कधी, याचं उत्तर येणारा काळ देईल!
 
 
--- विनय जोशी