भारताने केली ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या व्हर्टिकल स्टिप डाईव्ह आवृत्तीची यशस्वी चाचणी .
         Date: 09-Jul-2019

भारताने केली ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या व्हर्टिकल स्टिप डाईव्ह आवृत्तीची यशस्वी चाचणी .

 

भारताने सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल ब्राह्मोसच्या व्हर्टिकल डीप डाइव्ह आवृत्तीची यशस्वी चाचणी केली. हे जगातील सर्वात वेगवान असे क्षेपणास्त्र आहे. ५०० किमी पर्यंत याची क्षमता आहे असे ब्राम्होस एअरोस्पेसचे सीईओ सुधीर मिश्रा यांनी सांगितले.

 

भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० या लढाऊ विमानावरून याची यशस्वीपणे चाचणी केल्यानंतर आता लढाऊ विमानांवरून लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वाहून नेणारा भारत हा जगातील पहिला देश आहे असे मिश्रा म्हणाले. हे ध्वनीच्या वेगापेक्षा  तीन पट (माक - २.८) वेगाने चालते. सुखोई वर चढविण्यात आलेले हे पहिलेच खूप मोठे असे मिसाईल आहे.

 

ब्राह्मोस जमीन, पाणी तसेच हवेतून डागता येते. क्रूझ क्षेपणास्त्र असल्याने  ब्राह्मोस जमिनीपासून कमी उंचीवरून प्रवास करून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते. तसेच मार्ग बदलून क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांपासून बचाव करून घेऊ शकते. 

 

एजिस कॉम्बॅट सिस्टम ही अद्ययावत यंत्रणा अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांच्या नौदलांकडून वापरली जाते.  त्यात कॉम्प्युटर आणि रडार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शत्रूवर हल्ला करता येतो. या यंत्रणेला आव्हान देण्याची ताकद ब्राह्मोसमध्ये आहे.

 

 

मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम (एमटीसीआर) नावाच्या जागतिक करारानुसार ३०० किमीपेक्षा अधिक पल्ल्याच्या आणि ५०० किलोपेक्षा अधिक स्फोटके वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्रांना मनाई आहे. भारत या कराराचा सदस्य नव्हता. परंतु २०१६ साली भारताला एमटीसीआरचे सदस्यत्व मिळाले. त्यामुळे आता भारत कोणत्याही बंधनात नाही. म्हणूनच भारताने ५०० किमी पर्यंत क्षमतेचे ब्राम्होस बनविले.

 

ब्राह्मोस लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या पसंतीचे ठरले आहे. ९० डिग्रीचे लक्ष्य भेदणारा तो एक महत्त्वाचा विमान वाहक आहे, असे मिश्रा यांनी सांगितले. ब्राह्मोस एअरोस्पेस भारत आणि रशिया सरकारच्या मालकीचा संयुक्त उपक्रम असून याची निर्मिती भारतात केली जाते.

 

आता भारत आणि रशिया ब्राम्होसची क्षमता ६०० ते ८०० किमीपर्यंत वाढवण्याचे तसेच त्याचा वेग माक-६ ते माक-७ इतका (म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा ६ ते ७ पट जास्त ) करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ब्राह्मोसची पुढील आवृत्ती हायपरसॉनिक असेल.

 

व्हिएतनाम, फिलिपीन्स, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, ओमान आदी देश ब्रह्मोस विकत घेण्यास उत्सुक आहेत.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Content Generation)