त्रिपक्षीय नौसैनिक सरावाने चीनला संदेश-भारत-पाकिस्तान सैनिकी संघर्ष भडकल्यास चीनसाठी भारताचे "मलाक्का औषध"
         Date: 09-Sep-2019
त्रिपक्षीय नौसैनिक सरावाने चीनला संदेश-
 
भारत-पाकिस्तान सैनिकी संघर्ष भडकल्यास चीनसाठी भारताचे "मलाक्का औषध"
(ICRR South China Sea/ Senkaku Islands)


 
५ सप्टेंबरला मलाक्काच्या तोंडावर असलेल्या साबांग बंदराला दोन भारतीय युद्धनौकांनी भेट दिल्याने चीनचे कान टवकारले (साबांग बंदराचे स्थान बघण्यासाठी आय.सी.आर.आर. लिंक क्लिक करा.)

 
 
भारत, थायलंड, सिंगापुर यांच्या नौसेना सप्टेंबर १६ ते २० च्या दरम्यान अंदमान येथे संयुक्त युद्धाभ्यास करतील. चिंचोळ्या मलाक्का सामुद्रधुनीतून कोणत्याही अडथळ्याशिवाय सागरी वाहतुक चालू ठेवणं हा याचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. मलाक्का मधुन जागतिक समुद्री वाहतुकीच्या निम्मी वाहतुक या मार्गावर नियंत्रण असलेल्या देशाची जगात सैनिकी शक्ती म्हणुन दखल घेतली जाईल यात शंका नाही. अशाप्रकारच्या नौसैनिक अभ्यासात पुढच्या वर्षी अजुन अनेक देश सामील होणार आहेत.
 
 
आशियातील बहुसंख्य देश चिनी दादागिरीला कंटाळले असल्याने आणि एकट्याच्या बळावर चिनी पाशवी सैन्य शक्तीचा सामना करण्याची यापैकी कुणाच्यातही क्षमता नसल्याने हे सर्व देश दिवसेंदिवस सैनिकी, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या अधिकाधिक प्रबळ होत चाललेल्या भारताच्या छत्रछायेखाली येण्यासाठी उत्सुक आहेत.
 
 
येणाऱ्या काळात भारत आणि इंडोनेशिया या प्रदेशातील सागरी वाहतुक सुरळीत राखण्यासाठी अंदमान-निकोबार आणि बांदा असेहच्या दरम्यान नौसैनिक "जॉईंट टास्क फोर्स" तयार करण्याच्या विचारात आहेत. भारत इंडोनेशिया बांदा असेह येथे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची योजना तयार करत आहेत. प्रत्यक्ष घोषणा झाली नसली तरी यात भारतीय नौसैनिक तळ उभारला जाण्याची शक्यता काही जण व्यक्त करत आहेत.
 
 
प्रस्तावित युद्धाभ्यासात भारतीय विनाशिका (डिस्ट्रॉयर) आय.एन.एस.रणवीर भाग घेईल. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतीय युद्धनौका मलाक्काच्या तोंडावर साबांग बंदरात असतानाच भारतीय विदेशमंत्री जयशंकर इंडोनेशियात होते.
 
 
मलाक्का औषध...
 
येणाऱ्या काळात काश्मीरवरून भारत- पाकिस्तान सैनिकी संघर्ष भडकल्यास चीन पाकिस्तानच्या मदतीसाठी येऊ नये यासाठी भारत मोठ्या प्रमाणावर राजनैतिक- सैनिकी तयारी करत असल्याची ही चिन्हे दिसत आहेत. कारण इंडोनेशियाचे साबांग बंदर मलाक्का सामुद्रधुनीच्या बरोबर तोंडावर आहे आणि साबांग बंदराचा सैनिकी-व्यापारी वापर करण्याबाबतचा करार भारत-इंडोनेशियाच्या दरम्यान गेल्यावर्षी झाला आहे. या अत्यंत चिंचोळ्या मलाक्का सामुद्रधुनीतून चीनची जवळपास सर्व कच्च्या तेलाची वाहतुक होते, ही वाहतुक बंद झाल्यास चिनी अर्थव्यवस्था २ दिवसात आडवी होऊ शकते. कारगिल युद्धाच्या वेळी चीनने पाकिस्तानला मदत करण्याच्या हालचाली सुरु केल्यावर भारतीय नौसेनेने मलाक्काची नाकेबंदी करण्यासाठी हालचाली सुरु केल्याने चीनला पाकची मदत करता आली नव्हती.
 
 
सुखोई बॉम्बर्सचा मलाक्काच्या तोंडावर लाईव्ह बॉम्बिंग सराव
 
गेल्यावर्षीच्या भारतीय वायुसेनेच्या युद्धाभ्यासात सुखोई बॉम्बर्सनी मलाक्काच्या तोंडावर जिवंत बॉम्ब वापरुन सराव केला. याद्वारे भारतीय वायुसेना अंदमान मार्गे मलाक्काला सहज पोचु शकते हा संदेश भारताने चीनला दिला आणि युद्धजन्य परिस्थितीत भारताच्या तुलनेत मजबुत असलेली चिनी नौसेना मलाक्का परिसरात हालचाल केल्यास भारतीय वायुसेनेची सहज शिकार हेही चीनला कळवण्यात भारत यशस्वी झाला.
गेल्या वर्षी भारत- इंडोनेशियात साबांगच्या सैनिकी वापराचा करार झाल्यावर चीनने श्रीलंकन बंदरांचा सैनिकी वापर करण्याची धमकी गेल्यावर्षी भारताला दिली होती यावरुन साबांग- मलाक्का चीनसाठी किती महत्वाचे आहे हे लक्षात येईल.
 
 
त्यामुळे सध्याच्या भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात हा मामुली भासणारा त्रिपक्षीय नौसैनिक युद्धाभ्यास पाकिस्तान आणि चीनला खुप तिखट, मजबुत आणि महत्वाचा थेट संदेश देत आहे यात काही शंका नाही....