चिनी युद्धनौका हिंदी महासागरात- भारताने खडसावले.
         Date: 16-Apr-2020

चिनी युद्धनौका हिंदी महासागरात- भारताने खडसावले.

 

भारतीय नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंह यांनी हिंदी महासागरामधील चिनी जहाजांच्या अस्तित्वाच्या बातमीला पुष्टी दिली. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सात ते आठ युद्धनौका हिंद महासागरात आढळून आल्या आहेत. जागतिक व्यापार मार्गाचे रक्षण करणे आणि तो तयार करणे हा चीनच्या महत्त्वाकांक्षेचा हा एक भाग आहे. " कोणी जर आमच्या प्रदेशात येऊन काही कार्य करत असेल तर त्याने याविषयी आधी आमच्याशी बातचीत केली पाहिजे." असा कडक इशारा अ‍ॅडमिरलनी दिला.

 
" इएनसीचे डोर्निअर स्क्वॉड्रन, आयएएनएस ३११ नियमितपणे एअर स्टेशनवरून सागरी पाळत ठेवण्याचे काम करीत आहे. याशिवाय, बाकी काही विमाने देखील गस्त घालत आहेत. गरज भासल्यास त्वरित तैनात करता येतील अश्या प्रकारे ती सज्ज ठेवलेली आहेत. " असे नौदल प्रमुखांनी सांगितले. त्यांचे हे विधान साऊथ चायना सी मधील चीनच्या विमानवाहू युद्धनौकांच्या उपस्थितीबद्दल उद्देशून होते.

 

गेल्या वर्षी उशिरा प्रसिद्ध झालेल्या जपानी लष्कराच्या अहवालानुसार, भारत आणि उत्तर कोरियाच्या पाठोपाठ चीनचे भूदल हे जगातील तिसरे सर्वात मोठे भूदल असून त्यात जवळपास ९लाख ८० हजार सैनिक आहेत.

 

अहवालानुसार १९८५ पासून चीन आपल्या लष्कराला अधिक अत्याधुनिक करण्याच्या प्रयत्नात गुंतला आहे. सैनिकांची संख्या कमी करून आणि वाहनांचा आकार लहान पण अधिक सक्षम करण्याचा आणि संघटनेत अधिक सुसूत्रता आणण्याचा चीन सतत प्रयत्न करीत आहे. आधुनिक ऑपरेशनल प्रणाली विकसित करीत आहे. अलिकडच्या वर्षांत चीनने आपल्या क्षेपणास्त्र दलांचे वेगाने आधुनिकीकरण केले आहे.

 
indian ocean _1 &nbs

 

चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए ) ही जगातील सर्वात मोठी सेना म्हणून ओळखली जाते. जवळपास दोन दशलक्ष सैनिक या आर्मीत आहेत.

 

पण अलीकडेच भूदलामध्ये भारताने चिन्यांना मागे टाकले आहे. पण २०१५ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेनुसार भारत आता आपली सुरक्षा यंत्रणा अधिक सुटसुटीत आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बलाढ्य करण्याच्या प्रयत्नात आहे.

 

२०१५ मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपले सुरक्षा दल सक्षम करण्यासाठी त्याची संख्या मर्यादित करून त्याला अधिक आधुनिक करण्याची घोषणा केली. आणि नोव्हेंबर मध्ये याची सुरुवातदेखील झाली. नौदल आणि हवाई दल यावर जास्त जोर न देता शी जिनपिंगनी सायबर टेक्नॉलॉजी, अवकाश आणि अद्ययावत शस्त्रास्त्रे यांच्यावर भर दिला.

 

आता चीन त्यांच्या प्रक्षेपित सागरी व्यापार मार्गावर नौदल जहाज तैनात करत आहे. आतापर्यंतच्या जागतिक पायाभूत सुविधांमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा हा एक भाग आहे.

 

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जो मार्शल प्लॅन केला होता त्यालाही शी जिनपिंग यांच्या या योजनेने मागे टाकले आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आणि त्याच्यासोबत लष्कराची आधुनिक पद्धतीने पुनर्बांधणी या दोन महत्त्वाच्या गोष्टींनी जगात खूप मोठे क्रांतिकारक बदल घडून येणार आहेत.

 

प्रादेशिक, आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य यांच्या समतोलामुळे चीन जगाला भारी पडणार आहे. सागरी मार्गावर येन केन प्रकारेण चीन आपला अधिकार गाजवू पाहत आहे. व्यापारी मार्ग सुरक्षित करण्यासाठी  म्हणून नौदल तैनात केले असल्याची बतावणी जरी चीन ने केली तरी त्यांचा अंतस्थ हेतू उघड आहे.

 

भारताच्या हद्दीत चीनने काही हालचाल करायचा प्रयत्न केला तर भारत त्यास प्रत्युत्तर देण्यास संपूर्ण ताकदीनिशी तयार असल्याचे नौदल प्रमुखांनी सांगितले.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk )

 

Source : EXPRESS

 

India issues warning after China antagonises New Delhi with warships in Indian Ocean