कोरोनाच्या निमित्ताने चीन इटलीला खिशात टाकण्यात यशस्वी.
         Date: 06-Apr-2020
कोरोनाच्या निमित्ताने चीन इटलीला खिशात टाकण्यात यशस्वी.

 

एक वर्षांपूर्वी ' चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह किंवा बीआरआय प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर औपचारिकपणे स्वाक्षरी करणारा जी -७ कंट्रीज मधील रोम हा पहिला देश ठरला आहे,' अश्या ठळक मथळ्याने इटली ची वृत्तपत्रे झळकली होती. इटली-चीन या दोघांसाठी २०२० हे खूप महत्त्वाचे वर्ष ठरले असते. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) चे अध्यक्ष शी जिनपिंग मार्च २०१९ मध्ये इटली येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आले होते आणि वर्षाच्या अखेरीस इटलीचे अध्यक्ष सर्जिओ मट्टेरेला चीनला भेट देणार होते. या भेटीला वर्ष व्हायच्या आत इटलीला अतिशय वाईट अश्या आपत्तीला सामोरे जावे लागले. इटलीची आरोग्य आणि आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोसळली.

 

ज्या कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे त्याचा उगम २०१९ च्या शेवटी चीन मधील वुहान शहरात झाला. चीनच्या चायनीज कम्युनिस्ट पार्टी च्या सरकारने ही बाब अगोदर नाकारली. पुरावे नष्ट केले. नंतर त्यांना हे कबूल करावेच लागले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. हा रोग जगभर पसरायला सुरुवात झाली होती. या रोगाचा चीन नंतर दुसरा बळी इटली होता. ३१ मार्च पर्यंत इटलीमधील ११,५९१ लोक या रोगाचे बळी ठरले तर १,०१,७३९ लोकांची टेस्ट पॉझीटीव्ह आली. त्यापैकी १४,६२० लोक बरे झाले आहेत. या घटनेने इटलीवर आकाश कोसळले आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक आठवडे तेथील जनता लॉकडाउन मध्ये आहे.

 

यासंदर्भात चीनने इटलीला तात्काळ मदत देऊ केली. एकीकडे चीन स्वगृही या रोगाशी सामना करत आहे आणि दुसरीकडे त्याने इटलीला सक्रिय मदतही देऊ केली आहे. आणि हा रोग चीनमधूनच आला आहे आणि तो या रोगाशी लढण्यासाठी इटलीला मदत करत आहे. 

 

या विषाणूंवर हळूहळू चीनने विजय मिळवला असल्याचे आणि चीन मधील बाधितांची संख्या अगदी कमी झाल्याचे चीनने सगळीकडे पसरवायला सुरुवात केली. त्यांच्या डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी अतिशय   कुशलपणे परिस्थिती हाताळली असल्याचे पसरवायला त्यांनी सुरुवात केली. जगाचा आणि इटलीचा विश्वास संपादन करण्यासाठी ही त्यांची एक राजकीय खेळी आहे. भविष्यात इटलीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घेण्यासाठी त्यांची ही एक चाल आहे. फ्रान्सिस्का घिरेट्टी यांनी थोडक्यात सांगितल्याप्रमाणे " इटलीची या रोगाशी सामना करण्याची अकार्यक्षमता, त्यांनी केलेली दिरंगाई आणि प्रसंगाचे गांभीर्य वेळेत समजून न घेणे या बाबी चीनने केलेल्या मदतीमुळे जास्त ठळकपणे जाणवू लागल्या. त्यामुळे इतर युरोपियन देशांची नाराजी इटलीने ओढवून घेतली आणि त्यांनी इटलीला मदत करण्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले."

 

त्यामुळे इटलीमध्ये युरोपविरोधी वातावरण तापू लागले. आणि याविरोधात इटलीमध्ये सोशल मीडियावर "Italexit" हा हॅशटॅग चालू झाला. या देशांनी इटलीकडे पाठ फिरवल्यामुळे लोकांमध्ये तीव्र नापसंती निर्माण झाली. ते आपल्या भावना या हॅशटॅगच्या माध्यमातून सोशल मीडियावर मांडू लागले. याचा परिणाम म्हणून हळू हळू इतर देश आणि युरोपियन युनियनने इटलीमध्ये आरोग्यसेवा पुरवायला सुरुवात केली. त्यांनी इटालियन पेशंटना आपल्या रुग्णालयात जागा देऊ केली. परंतु इटलीच्या लोकांच्या मनात अढी बसली ती बसलीच.

 

दरम्यान पीआरसीने लोकांची मने जिंकून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जेव्हा युरोपियन देशांनी इटलीची मदत करण्यास नकार दिला तेव्हा त्यांना बीजिंगनेच संपूर्ण सहकार्य केले. युरोपियन देशांनी मदतीचा विचार सुरु केला तेव्हा बीजिंग इटलीच्या घराघरात पोचला होता. जो गरजेच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र असे बीजिंगने इटलीच्या मनावर ठसविले. चीनने जगासमोर स्वतःची पाठ स्वतःच थोपटायला सुरुवात केली. याचा परिणाम इटलीच्या लोकांवर झाला. ते चीनचे सोशल मीडियावर गुणगान गाऊ लागले.

 
Italy-China_1  

या चित्रात चीन इटलीला मदत करताना दाखवलाय आणि युरोपियन युनियनने मदत न करता निष्ठूरपणे केवळ बघ्याची भूमिका घेतलीय असे कार्टून फेसबुकवर फिरताना दिसत आहे.

 

पीआरसी ने त्यांच्या फेसबुक अकाउंटवर इटलीला देण्यात आलेल्या मदतीविषयी पोस्ट केले आहे. लाँग व्हेंटिलेटर मास्क, प्रोटेक्टिव्ह सूट्स आणि कोरोना व्हायरस टेस्ट साठी लागणारे स्वाब्स इत्यादी गोष्टी चीनने इटलीला दान म्हणून देऊ केल्या आहेत असा तो मेसेज होता. पण प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र आहे. यापैकी अगदी छोटासा हिस्सा चीनने मदत म्हणून देऊ केलाय तर बराचसा भाग इटलीने चीनकडून विकत घेतलाय. चीनने डॉक्टरांचे एक पथक स्पेशल चार्टर विमानाने रोम मध्ये आले आहे.   सोशल मीडियावर इटलीच्या जनतेने चीनच्या मदतीचे तोंड भरून कौतुक केल्यामुळे खरंतर या डॉक्टर्सना इटली मध्ये येणे भाग पडलेय.सोशल मीडियावर इतर युरोपियन देशांविषयी इटलीच्या लोकांचा असंतोष वाढतच चालला आहे. या संधीचे सोने चीनने केले आहे. पीआरसीच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनयिंग यांनी ट्विटरवर इटलीचे लोक "थँक यू चायना" असे म्हणत असल्याचा   आणि रोम मध्ये पीआरसीचे राष्ट्रगीत लावल्याचा एक खोटा व्हिडीओ प्रसारित केलाय.

 

इटली आणि इतर युरोपियन देश यांच्यातल्या दुही चा फायदा चीनने घेतला नाही तर नवलच. चीन इटलीकडे भविष्यातली संधी म्हणून पाहतेय. चीनला आपली प्रतिमा सुधारण्यासाठी इटलीसारखा दुसरा प्लॅटफॉर्म नाही. ही महामारी निर्माण करून पसरवणारा देश ते या महामारीला बळी ठरलेल्या इतर देशांना स्वतःहून सर्वतोपरी मदत करणारा देश अशी स्वतःची प्रतिमा तो बनवतोय. म्हणजे आम्ही सुद्धा या संकटात आहोत तरी दुसऱ्याला मदत करायला कसे तत्पर आहोत हे जगावर बिंबवण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. आणि यात ते सफल झाले आहेत. इटलीचे अनेक लोक चीनला याबद्दल आशीर्वाद देत आहेत. चिनी मॉडेल कसे यशस्वी आहे आणि भविष्यात आपल्याला चीनच्या या मॉडेलचा आणि चीनच्या सल्ल्याचा कसा उपयोग होणारे हे तिथली मीडिया ओरडून ओरडून लोकांच्या मनावर ठसवत आहे.

 

कोविद - १९ मुळे इटलीमध्ये खूपच उलथापालथ झाली आहे. इटलीचा वर्तमान इथून पुढे अकल्पित असणार आहे. खूप मोठे राजकीय बदल घडून येतील. आंतरराष्ट्रीय पडसाद इटलीच्या विरोधात असतील. आणि चीन या संधीचे सोने करेल. चीनचे जे काही नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी  चीनला इटली ही सोन्याची खाण सापडली आहे. यासाठी चीनला इटली मधील काही राजकीय पक्ष जोमदार प्रयत्न करीत आहेत. फक्त हे सगळं कोविद-१९ ची महामारी केव्हा संपतेय त्यावर अवलंबून आहे.  सध्या चीन इटलीला आपल्या मदतीच्या ओझ्याखाली दाबून ठेवतोय. संधी मिळाली की तो त्या मदतीची वसुली करून घेईल.

 

हा लेख जेम्सटाऊन फाउंडेशनच्या चायना ब्रीफवर आधारीत आहे.

 

 - प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

The Chinese Charm Offensive Towards Italy as the Coronavirus Crisis deepens