शौर्यगाथा- ३बडगामची लढाई
         Date: 06-Dec-2021

शौर्यगाथा- ३

बडगामची लढाई


Dakota fighter jet_1  
 

त्वरेने हालचाल करून सैन्य लवकरात लवकर काश्मीरात पोचवण्यासाठी फक्त हवाई मार्ग हा एकाच पर्याय शिल्लक उरला होता. त्यामुळे विमानतळ ताब्यात असणे अत्यंत आवश्यक झाले होते. म्हणूनच , 27 ऑक्टोबर 1947 रोजी, सकाळी साडेनऊ वाजता, श्रीनगर विमानतळावर उतरल्या उतरल्या कर्नल रायनी आधी विमानतळाच्या संरक्षणाची तयारी पूर्ण केली. त्यानंतर सतत थोड्या थोड्या वेळाने अखंड तेथील धावपट्टीवर विमाने उतरत राहिली. साधारण दुपारपर्यंत सगळ्या बटालियन्स (म्हणजे जवळजवळ तीन हजार सैनिक) काश्मीरात पोचलेल्या होत्या. याशिवाय त्यांच्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्रे , शस्त्रास्त्रे, दारुगोळा देखील त्वरित दाखल झाला होता. भारतीय वायुसेना त्यावेळी नुकतीच आकार घेत होती. त्यांच्याकडे काही विमाने होती मात्र ती पुरेशी ठरणार नव्हती. म्हणून यावेळी भारतात अस्तित्वात असणाऱ्या काही खाजगी विमानकंपन्यांची मदत घेतली गेली. त्यांच्याकडे मुख्यत्वे दुसऱ्या महायुद्धात तावून सुलाखून निघालेली डाकोटा- डीसी -3 ही विमाने वापरात होती. या विमानांची मुख्य अडचण अशी होती, की ही विमाने 9300 फुटांपेक्षा अधिक उंची वरून उडण्यास असमर्थ होती, आणि पीरपंजालच्या पर्वतमय प्रदेशातून काश्मिरात पोचण्यासाठी विमाने अधिक उंचीवरून उडवावी लागत असत. याशिवाय श्रीनगरच्या धावपट्टीची लांबी आवश्यकतेहून कमी होती. सर्व विमानांना आपल्या क्षमतेहून अधिक वजनाची साधनसामग्री वाहून आणावी लागणार होती. या सर्व अडचणींना तोंड देत, सतत उडणाऱ्या धुळीच्या लोटांची पर्वा न करता, आणि तरीही कोणतेही नुकसान होऊ न देता अत्यंत जोखमीचे हे काम त्यावेळच्या कित्येक खाजगी वैमानिकांनी जीवाची पर्वा न करता केले. आणि केवळ सुरुवातीचे एक दोन दिवस नव्हे, तर पुढचे कित्येक दिवस हे वैमानिक सतत दिवस-रात्र फेऱ्या मारीत होते, परत जाताना कित्येक काश्मिरी निर्वासितांना भारतात घेऊन जात होते. युदधभूमी किंवा युद्धपरिस्थितीचा कोणताही अनुभव नसताना या वैमानिकांनी दाखवलेले धाडस आणि घेतलेली मेहनत याचे मोल खरोखर करता येणार नाही. त्यांच्यामुळेच भारतीय सेना आपल्या शस्त्रास्त्रांसह अगदी वेळेवर काश्मिरात पोचू शकली, लढू शकली. त्या सर्व ज्ञात -अज्ञात वैमानिकांचे स्मरण केल्याशिवाय ही युद्धगाथा पुरी होऊच शकणार नाही.

या विमानांतून परत गेलेल्या निर्वासितांकडून एकूण टोळीवाल्या हल्लेखोरांची संख्या काही हजार आहे ही बातमी दिल्लीपर्यन्त गेली होतीच. त्यामुळेच केवळ एक बटालियन न आणता संपूर्ण ब्रिगेडच आणायचा निर्णय घेतला गेला होता, आणि त्यानुसार 161 पायदळ(infantry) ब्रिगेडच्या, 4 कुमाऊँ, 1 पंजाब आणि 1 पॅरा कुमाऊँ या पलटणी (battalions), तोफखाना दलाची (artillery) 13 फील्ड रेजिमेंट, चिलखती दलाच्या (armoured infantry) 7cavalry रेजिमेंटच्या चिलखती गाड्या(रणगाडे नव्हे.) त्यावेळी काश्मिरात उतरवल्या गेल्या होत्या.

विमानतळाची सुरक्षितता मजबूत करून कर्नल राय तात्काळ बारामुल्लाच्या दिशेने निघाले. बारामुल्लाजवळ पोचल्यावर सभोवतालच्या टेकड्यांवर त्यांनी संरक्षक मोर्चे लावायला सुरुवात केली, मात्र बारामुल्लात हैदोस घालणाऱ्या टोळीवाल्यांना पत्ता लागताक्षणी त्यांनी सेनेवर हल्ला चढवला. त्यावेळी थोडीशी माघार घेण्याचा सूज्ञ निर्णय कर्नल राय यांनी घेतला आणि बारामुल्लापासून सुमारे वीस किलोमीटर मागे पट्टन नावाच्या खेड्याजवळ अधिक योग्य आणि मोक्याच्या जागा पाहून संरक्षक मोर्चे उभारण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र 1 सीख ची ही माघार अतिशय सावध आणि शक्यतो गोपनीयता पाळत होणे आवश्यक असल्यामुळे स्वत: कर्नल राय आणि काही थोडे शिपाई असे आघाडीवर थांबून बाकी सगळ्या पलटणीने नियोजित जागी पोचून मोर्चेबांधणी करावी अशी योजना केली गेली. ही संरक्षक मोर्चेबांधणी पूर्ण होईपर्यंत टोळीवाल्यांना बारामुल्लातच थोपवून धरण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करतानाच एक गोळीबारामध्ये कर्नल राय यांना वीरमरण आले. बारामुल्लाची जमीन पावन करणाऱ्या या आधुनिक बाजीप्रभूला महावीरचक्राने गौरवले गेले आहे. क. रायनंतर मेजर संपूर्णसिंह यांनी कमांड घेतली आणि आता सगळी बटालियन पट्टनजवळ प्रतिकराला सज्ज झाली. पट्टनच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन उंच टेकड्यांवर केलेली सेनेची व्यूहरचना यशस्वी ठरली आणि ही फळी भेदून पुढे जाण्यात टोळीवाल्यांना यश आले नाही.

इकडे विमानतळावर एकामागोमाग एक विमाने उतरण्याचा सपाटा चालूच होता. 161 पायदळ(infantry) ब्रिगेडच्या आणखीही काही पलटणी येत होत्या त्यातच ब्रिगेडियर कटोच स्वत: श्रीनगरला येऊन पोचले. त्यांच्याबरोबर एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ‘डेप्युटी डायरेक्टर ऑफ मिलिटरी इंटेलिजन्स’ ब्रिगेडियर एल. पी. सेन हे देखील आले होते, ते त्याच दिवशी परत दिल्लीला गेले आणि एक ब्रिगेड देखील अपुरी असून काश्मीरमध्ये एक अख्खी डिव्हिजन पाठवावी लागेल असे निवेदनही त्यांनी पंतप्रधान नेहरू आणि भारताचे सरसेनापती यांना दिले होते. मात्र अचानक ब्रिगे. कटोच जखमी झाल्यावर स्वत: से यांनाच काश्मीरमधली सूत्रे हातात घेण्यासाठी पाठवले गेले. या सगळ्या घडामोडींमध्ये बारामुल्लाजवळील आघाडीवर हाती लागलेल्या खबरींनुसार दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कळल्या होत्या. एक म्हणजे या टोळीवाल्यांमध्ये कित्येक प्रशिक्षित पाकिस्तानी सैनिक सामील होतेच, शिवाय या टोळ्यांचे नेतृत्व पाकिस्तानी सेनेचे अधिकारी करत होते. म्हणजेच आता सामना फक्त टोळीवाल्यांशी नसून प्रशिक्षित पाकिस्तानी सेनेशीच होणार होता. सगळ्यात महत्त्वाची दुसरी बातमी म्हणजे बारामुल्लाहून काही टोळ्या बडगामच्या दिशेने गेल्या होत्या.. आणि बडगामहून श्रीनगरचा विमानतळ फक्त 10-15 किलोमीटर्स वर होता! बडगाम टोळीवाल्यांच्या हाती पडू देणे परवडणारे नव्हते. ही खबर मिळताक्षणीच ब्रि. सेन यांनी 4 कुमाऊँच्या दोन कंपन्यांना तात्काळ बडगाम ताब्यात घेऊन मोर्चे बांधण्यासाठी रवाना केले. या कंपन्यांचे नेतृत्व करत होते.. मेजर सोमनाथ शर्मा!

वास्तविक यावेळी मेजर सोमनाथ यांचा उजवा हात हाड मोडल्यामुळे प्लास्टरमध्ये होता. त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना दिलेला फील्डवर न जाण्याचा सल्ला डावलून ते काश्मिरात आले होते. 4 कुमाऊँच्या दोन आणि 1 पॅरा कुमाऊँची एक अशा एकूण तीन कंपन्या बडगामला पोचल्या. 1 पॅरा कुमाऊँ बडगामच्या पश्चिमेला एक टेकडीवर चढून टेहळणी करत होती, तर मेजर शर्मा आणि अन्य सैनिकांनी बडगाम गावात शिरून झडत्या घेतल्या. एकूण फारसं काही संशयास्पद आढळलं नाही, म्हणून 1 पॅरा कुमाऊँ आणि 4 कुमाऊँ ची एक यश अडोण कंपन्यांन परत बोलावले गेले. मेजर सोमनाथ एक कंपनी घेऊन बडगाममध्येच थांबले. दुर्दैवाने गावाच्या नाल्याबाहेर बसलेल्या ‘काश्मिरी शरणार्थी’बद्दल कोणालाही संशय आला नव्हता. कामासाठी गावाबाहेर पडणाऱ्या लोकांत मिसळून हे ‘शरणार्थी, मेजर सोमनाथ आणि त्यांच्या कंपनीच्या टेकडीच्या चारी दिशांनी पांगले. आपल्या सभोवती पांगणारे हे लोक काश्मिरी शरणार्थी नसून घुसखोर आहेत आणि त्यांच्या ‘फेरेन‘ मध्ये शस्त्रे लपवलेली आहेत ही गोष्ट दुर्दैवाने मेजर शर्मांच्या शेवटपर्यन्त लक्षात आली नाही. वेढा पूर्ण होताक्षणी घुसखोरांकडून लाइट मशीनगनकहा तूफान गोळीबार आणि मॉर्टर बॉंबस् चा वर्षाव सुरू झाला. शंभर जवान विरुद्ध सातशे घुसखोर अशी तुंबळ लढाई सुरू झाली. मेजर शर्मांनी तात्काळ वायरलेसवरून तातडीची मदत मागितली , मात्र एव्हाना लांबवर गेलेल्या कंपन्या फिरून परत यायला वेळ लागणार होता, म्हणून हवाई मदत मागितली गेली. थोड्याच वेळात विमाने आली आणि त्यानणे घुसखोरांवर स्ट्रॅफिंग केले. त्याने काही शरणार्थी मारले गेले, मात्र वेढा उठला नाही. मेजर सोमनाथ आणि त्यांचे जवान जीव पणाला लावून झुंजत होते. एव्हाना त्यांचे 10-12 जवान मृत्युमुखी पडले होते,जवळजवळ सगळेच जखमी होते. दारुगोळादेखील अतिशय मर्यादित असल्यामुळे एक गोळी एक शत्रू या तत्वावर वेचून वेचून मारणे सुरू ठेवले होते. मेजर शर्मा आपल्या मोडल्या हाताची पर्वा न करता एकीकडे जवानांना मॅगझिन्स भरून देत होते, एकीकडे स्वत: लढत होते. इतक्यातच एक मॉर्टर बॉम्ब मेजर शर्मा यांच्या अगदी जवळ फुटला, आणि त्या बॉम्बचे असंख्य तुकडे त्यांकहा देह फाडून गेले. हाताला प्लास्टर बांधलेला हा बहादूर कंपनी कमांडर अक्षरक्ष: मारिता मारिता मरेतो झुंजला. स्वतंत्र भारताचे सर्वोच्च शौर्यपदक ‘परमवीरचक्र’ पहिल्यांदा मेजर सोमनाथ शर्मा यांना त्यांच्या या वीरश्रीसाठी प्रदान केले गेले. मेजर सोमनाथ पडलेले पाहून घुसखोरांना चेव चढला तर आपल्या बहादूर शिपायांचा खून खौल उठा! आता भारतीय सेनेला संपवून सगळं दारुगोळा हस्तगत करणे सहज शक्य आहे असे घुसखोरांना वाटले, मात्र आपले जवान हा आनंद त्यांना सहजासहजी मिळू देणार नव्हते. आपल्या पराभवाने श्रीनगरचा विमानतळ आणि पर्यायाने सगळं काश्मीरच धोक्यात येणार आहे याची मनोमन जाणीव 4 कुमाऊँ च्या प्रत्येक जवानाला होती. त्यामुळे प्रत्येकजण मरेपर्यंत झुंजणार होता. असाच एक कोवळा शिपाई दिवानसिंग! आपल्या साथीदारसह लढत असताना त्याचा साथीदार मृत्युमुखी पडला. त्वेषाने चवताळलेल्या दिवानसिंगने कसलाही विचार न करता आपली गन घेतली आणि उभा राहून’ कालिका मैया की जय’ अशी गर्जना करून तुफान गोळीबार करायला सुरुवात केली. एकट्या दिवानसिंगच्या गोळीबारामध्ये 20- 25 पठाण पडले आणि अखेर वेढा फुटला.. एकट्या दिवानसिंगच्या अचाट शौर्याने अखेर शत्रूचा वेढा फुटला आणि शेवटी 4 कुमाऊँच्या उरल्या-सुरल्या सैनिकांनी टेकडी सोडली आणि ते वेढयातून निसटले. बडगामवरील हल्ल्याचा वृतान्त कळताक्षणीच ब्रिगे. सेन यानी 1 पंजाबला मगमहून बडगामकडे हलवले होते आणि विमानतळाची डावी बाजू भक्कम करून पुढच्या हल्ल्याची वाट पाहत होते. मात्र पुढचा हल्ला झालाच नाही! कारण दिवानसिंगच्या गोळीबारामध्ये घुसखोरांचा कमांडर खुर्शिद जखमी झाला आणि त्याला बारामुल्लाला परत न्यावे लागले. पठाणांना पुढच्या लढाईचा निर्णय आपल्या कमांडरशिवाय घेता आला नाही, आणि श्रीनगरचा विमानतळ वाचला. आपला म्होरक्या पडला तरी लढाई सोडायची नसते ही तानाजी-सूर्याजीची परंपरा दिवानसिंगसारख्या वीरांनी पुढे नेली. या शूर शिपायाला 'महावीरचक्र' देऊन गौरवले गेले.

बडगांमची लढाई एकाअर्थी निर्णायक ठरली. जर बडगाममध्ये 4 कुमाऊँच्या वीरांनी कडवी झुंज देत घुसखोरांना थोपवले नसते तर श्रीनगर विमानतळ अगदी सहज शत्रूच्या हाती लागला असता, आणि पुढे येणारी रसद आणि कुमक दोन्ही बंद होऊन काश्मीरचा घास घेणे पाकिस्तानला सहज शक्य झाले असते.

बडगामवरचं संकट टळलं तरी अजूनही घुसखोरांचा धुडगूस काश्मिरात चालूच होता. आता त्यांचा पुरता बंदोबस्त करण्याची वेळ आली होती. ब्रिगेडियर सेन दिवसरात्र याच विचारत गढून गेलेले होते. त्यांच्या तल्लख आणि धूर्त बुद्धीने अतिशय मुत्सद्दी डावपेचा टाकण्याची तयारी सुरू केली..लवकरच शालाटेंगचे नाव भारतीय युद्धांच्या इतिहासात अजरामर होणार होते! शालाटेंगच्या अत्यंत कल्पक लढाईविषयी पुढील भागात.

जय हिंद!