तेजस फायटर जेटचा ऑक्सिजन प्लॅन्ट नागरिकांसाठी खुला.
         Date: 25-Apr-2021

 तेजस फायटर जेटचा ऑक्सिजन प्लॅन्ट नागरिकांसाठी खुला.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

देशाचं देशाबाहेरच्या शत्रूपासून रक्षण करण्यासाठी सुसज्ज असलेल्या भारतीय संरक्षण प्रणाली तंत्रज्ञानाने आता देशावर आलेल्या कोरोना व्हायरस नावाच्या शत्रूशी दोन हात करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करायचे ठरवले आहे. तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टसाठी जी " ऑन-बोर्ड ऑक्सिजन जनरेशन सिस्टम” (ओबीओजीएस) आहे तिचं रूपांतर आता नागरिकांच्या उपयोगासाठी केलं गेलं आहे. या महामारीमध्ये सापडलेल्या अत्यवस्थ रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडरचा तुडवडा जाणवू लागल्यानंतर ताबडतोब हा निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी सुरु झाली आहे. तेजससाठी लागणारा ऑक्सिजन बनवणारा प्लॅन्ट आता नागरिकांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवणार आहे. सुमारे १००० लिटर ऑक्सिजन दर मिनिटाला बनवू शकेल अशी या प्लॅन्टची क्षमता आहे.

 

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ने या नाविन्यपूर्ण निर्णयाची माहिती संरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना मंगळवारी दिली. हे तंत्रज्ञान खाजगी उद्योगात परावर्तित करण्यात आले असून उत्तर प्रदेश सरकारने अश्या पाच प्रकल्पांसाठी ऑर्डर दिली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने (एमओडी) मंगळवारी दिली. रुग्णालयातील वाढती गरज पाहता प्रकल्पांची संख्या वाढवली जाऊ शकते असे डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी संरक्षण मंत्रालयाला सांगितले.

 

या भयानक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लसीकरण केलेल्या सेवानिवृत्त लष्करी जवानांचा नागरी प्रशासनाने किंवा राज्य सरकारने उपयोग करून घ्यावा असे संरक्षण मंत्र्यांनी सूचित केले आहे.

 

 DRDO_1  H x W:

 

अती उंचीवरील प्रदेशात जिथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास अडचण होते त्या भागाच्या संरक्षणासाठी जे जवान तैनात केलेले असतात त्यांच्यासाठी विकसित केलेली ऑक्सिजन वितरण प्रणालीचा गरज भासल्यास कोविड रुग्णांसाठी वापर करावा असेही रेड्डी यांनी सुचवले. डीआरडीओने ही प्रणाली विकसित केली आहे. एसपीओ 2 (ब्लड ऑक्सीजन सॅचुरेशन) वर आधारित उत्पादन लवकरच बाजारात उपलब्ध होईल अशी आशा डीआरडीओने व्यक्त केली आहे.

 

डीआरडीओने नवी दिल्लीत कोविड-१९ च्या रुग्णांसाठी पुन्हा एकदा सेंटरची सोय केली असून लवकरच बेडची संख्या २५० वरून ५०० करण्यात येईल. पाटण्यातील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयाचे (ईएसआयसी) कोविड-१९ रुगणालयामध्ये रूपांतर करण्यात आले असून तिथे ५०० बेडची सोय आहे.

 

लखनौ मध्ये ४५०, वाराणसीमध्ये ७५० आणि अहमदाबाद मध्ये ९०० बेड्सचं रुग्णालय चालविण्यासाठी डीआरडीओ युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली. 

 

देशभर पसरलेल्या महामारीचा सामना करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रालय आणि सैन्य दल यांची एक मीटिंग घेतली. संरक्षण मंत्रालयाची आस्थापने, दारुगोळा कारखाने आणि डीआरडीओ या त्रिकुटाने लवकरात लवकर नागरी प्रशासन / राज्य सरकार यांनी ऑक्सिजन सिलिंडर आणि जादा बेड उपलब्ध करुन देण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे असे निवेदन त्यांनी केले.

 

कोविड-१९ सोबत लढता लढता डीआरडीओचे आपल्या महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष झालेले नाही. डीआरडीओने "आत्मनिर्भर भारतसाध्य करण्यासाठी उद्योगाची रचना, विकास आणि निर्मितीसाठी १०८ संरक्षण यंत्रणा आणि उपप्रणाली सुरु केल्या आहेत.

 

खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या उद्योगांसह, डीआरडीओ तंत्रज्ञान १,८०० सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) यात हस्तांतरित केले जाऊ शकते.

 

अजय शुक्ला यांच्या लेखाचा स्वैर अनुवाद.

 

Source : Business standard, google